बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१३

अमेरिकेतील माणसे आणि माणुसकी...


 

अमेरिकेच्या वातावरणात adjust होणं फारसं अवघड काम नव्हतं. त्यात आमच्या बरोबर अजूनही काही ३-४ परिवार ह्यांच्या कंपनीमधून कॉलनीमध्ये भारतातून स्थलांतरित झालेले. त्याचबरोबर बरेच नवीन भारतीय चेहरे सोसायटीमध्ये रहात असलेले देखील मला आढळले. त्यात काही भारतीय स्त्रिया छोट्या मुलांना घेऊन फेरफटका मारत असायच्या, तर काही नवविवाहिता होत्या. पटकन समोर येऊन माझी ओळख करून घ्यायच्या. कधी जिममध्ये भेटायच्या. हळू हळू भरपूर बायकांजवळ ओळख आणि मैत्री झाली. बहुत करून कामानिमित्तानेच पाच-सहा वर्षासाठी अमेरिकेत राहायला आलेली ही सर्व मंडळी. मुले जरा शाळेत जाण्यायोग्य झाली की आई वडिलांना तिथे भारताचे वेध लागायचे.

नवरे दिवसा कामावर जायचे आणि आजूबाजूच्या बायका ग्रुप करून मग दुपारी कधी ‘टी पार्टी’ किवा ‘potluck’ च्या निमित्ताने एकत्र जमायच्या, कधी दिवाळी आणि नवीन वर्षान सारखे सण एकत्र साजरे करायच्या. व्यवसाय, नागरिकत्व, आर्थिक परिस्थिती, सोशल स्टेटस सर्वांचे सारखे. परंतु आपण बरं का आपला ग्रुप बरा असाच सर्वांचा पवित्रा आढळतो.

एका वर्ष पासून राहणारी सुलभाच काय, आठ-आठ, दहा-दहा वर्षे एकलकोंडेपणाने घालवणारी कितीतरी कुटुंब मला तिथे भेटली. त्याचं कारण फक्त त्यांचा कुठला ग्रुप नाही..

माझी तेथील एक बंगाली मैत्रीण मला नेहमी घरी बोलवायची. म्हणायची, ”इथे येणार्या प्रत्येक माणसाची माणुसकी एका वर्षात संपते.” तिचे बोलणे ऐकून मी निशब्द व्हायचे....विचारात पडायचे म्हणजे नक्की काय अनुभव येतात येथील लोकांना...असो!!

इथे सुलभाची प्रकृती बिघडत चालली. पित्ताशायाच्या खड्यांचा तिला त्रास होता. शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. वर्षाची लहान मुलगी बोलू सुद्धा शकत नव्हती आणि पाच वर्षाचा शाळेत जाणारा मुलगा. प्रोजेक्ट सुरु होत असल्याने स्वप्नीलला सुद्धा रजा घेणं शक्य नव्हतं.

माझ्याकडे ती आशेने आली आणि मला तिने सर्व सांगितलं. म्हणाली,” माझी शस्त्रक्रिया आहे, मला तुझी मदत हवी आहे. तू नाही म्हणालीस तर मला भारतात जाऊन शस्त्रक्रिया करावी लागेल.”

कुठलाही पुढचा मागचा विचार न करता मी तिला होकार दिला. तरीही पुन्हा पुन्हा विचारून तिने अनेकदा खात्री करून घेतली.

शस्त्रक्रियेचा दिवस ठरला. दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेने तिचं पित्ताशय काढून टाकण्यात आलं. पहिले तीन दिवस स्वप्नीलने घरी राहून तिची काळजी घेतली. मग ,मात्र त्याचा प्रोजेक्ट चालू होत होता. मुख्य सूत्र त्याच्याच हातात असल्याने त्याला सुट्टी मिळणे शक्य नव्हते.

ठरल्याप्रमाणे चवथ्या दिवशी मी सकाळी उठून सुलभाच्या घरी गेले. तिला उठायला बसायला परवानगी होती. स्वतः पुरते ती जेमतेम उठू बसू शकत होती. अश्यावेळी समान शोधण्यापेक्षा स्वतःच्या घरूनच जेवण करून नेण मला सोयीचं वाटलं. गेल्यावर प्रथम तिला हलका आहार देण्याचा मी प्रयत्न केला. परंतु अवयवाच्या त्यागाने दुखावलेल्या तिच्या शरीराने जणू सत्याग्रह मांडलेला. अंथरुणातून उठण्याची परिस्थिती नाही आणि पोटात एक अन्नाचा कण टिकून रहायला मागत नाही, अशी तिची अवस्था होती. अतिशय विव्हळत, वेदना सहन करत प्रत्येक वेळी तिला अंथरुणातून उठावं लागत होतं. एका मागून एक सिलसिला चालूच होता, थांबायचं काही नाव नव्हतं. ओपेराशनच्या रुग्णाला इतक्या बिकट स्थितीत हॉस्पिटलवाले घरीच कसे जाऊ देतात ह्या गोष्टीची मला मनातून खूप चीड आली. दुसरीकडे सुलभाची वाईटात वाईट अवस्था बघून हातावर हाथ धरून तमाशा बघत बसण्याशिवाय माझ्याकडे काही पर्यत नव्हता.

ऑपरेशनमुळे आलेली कमजोरी आणि चार दिवसाचा उपास ह्यामुळे सुलभापेक्षा मीच कोसळणार का काय अशी मला भीती वाटू लागली. तिच्याकडे बघून माझे हात पाय गळून गेले. डॉक्टरने सांगितलेलं औषधपाणी सर्व चालू होते. पण गुण कसला येत नव्हता. संध्याकाळी स्वप्नील आला, परंतु माझा घरी जाण्यासाठी पाय निघेना. त्याने तिला सूप प्यायला दिलं. पण ते सुद्धा तिच्या पोटात टिकलं नाही. माझा पाय निघत नाही हे बघून सुलभाने मला निरोप दिला. माझ्या घरच्यांना सुद्धा माझी गरज होती.

शेवटी काहीच न सुचून मी तशीच घरी गेले.

दुसर्या दिवशी तिची तब्बेत आणखीन खालावली. माझा धीर सुटला...वाटले हि काही वाचत नाही. एवढी लहान मुलं, कसा होणार त्यांचं. शेवटी म्हणाले काहीही झालं तरी मी हिला लवकरात लवकर बरी करणारच....

मोठ्या निर्धाराने मी बरेच काही प्रकार करून बघितले, आणि हळू हळू तिच्या तब्बेतीने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्या काळात एकही मिनिट मी जीवाला विश्रांती दिली नाही. तिचे वेदनेने विव्हळणे आता थोडे कमी झाले. अन्न पचू लागल्याने सुद्धा जीवाला थोडा आराम द्यायची उसंत मिळाली तिला.

चार पाच दिवस ऑपरेशनचे असेच निघून गेले. सुलभाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. तिला सावरलेली बघून मी सुद्धा समाधानी झाले.

आठवडाभरात खूप आराम पडला तिला आणि मी निरोप घेऊन पुन्हा माझ्या घरात लक्ष घालायला मोकळी झाले.

तिच्या माहेरचं आणि माझ्या आजोळचं आडनाव एकचं असल्याने मला कायम तिच्या रूपाने माझी बहिण भेटल्याचा आनंद व्हायचा.

मुलाची शाळा सुरु झाली. एक दीड मैलावरच शाळा आहे. दहा बारा मिनिटे फक्त चालायला लागेल म्हणून आम्ही जास्त मनावर घेतलं नाही. शाळेची बस मात्र उपलब्ध नव्हती ही खंत होती.

सुरुवातीला एक चांगली गाडी पुरेशी झाली ह्या विचाराने दुसरी कार आम्ही घ्यायचा विचार केला नव्हता. मला ड्राईविंग सुद्धा धड येत नव्हतं. भारतात जेमतेम लायसन मिळवण्यापुरते ड्राईविंग शिकलेली मी. त्यामुळे दुसरी गाडी हा विचारानं पलीकडचा मुद्दा होता.

पुढे पुढे पावसापाण्यात लहान मुलाला घेऊन कॅलिफोर्नियाच्या रस्त्यातून शाळेकडे चालणं त्रासदायक होऊ लागलं.

एक दिवस अशीच शाळेतून मुलाला परत घेऊन येतांना एका सिग्नल जवळ सुलभा समोर तिची मोठी van घेऊन उभी दिसली. चेहऱ्यावर पूर्ण अनोळखी भाव. तिने माझ्याकडे बघितले आणि अश्याप्रकारे हावभाव केले जणू ती मला ओळखतच नाही. माझ्या मनाची खात्री पटली नाही म्हणून मी बाजूच्या मैत्रिणीला (आमच्या दोघींच्या नवर्यांच्या कंपनीतील स्नेह्याची बायको) विचारले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पुढे पुढे ह्या गोष्टीची सवय करून घेतली मी.

हि आहे अमेरिकेतील माणसे आणि माणुसकी...

ह्याला घमेंड म्हणावी की असुरक्षितता हा एक वादाचा मुद्दा आहे. परदेशात तुमच्या उपयोगाला पडलेल्या माणसाला तुम्ही ओळख देखील दाखवण्या इतका कृतज्ञपणा नाही दाखवलात तर तुम्हाला मित्रच काय माणूस देखील म्हणू नये कुणी..

“आपल्या तव्यावर दुसरा पोळी भाजू पाहतो आहे” हि मानसिकता केवळ संकुचित मनोवृत्तीच्या माणसांजवळच आढळू शकते.

परदेशात जाण्याचा निर्णय मी स्वतःतले बळ ओळखून घेतला होता, कुणाच्या उपकाराने बांडगुळाप्रमाणे जीवन जगायची स्वप्ने नक्कीच घेऊन मी अमेरिकेला आले नव्हते.

-    मधु निमकर

(दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात ६/१०/२०१३)