टोल नाके रद्द करावेत असा प्रस्ताव निर्णयाला पोहोचला आहे. परंतु मुळात टोल हाचमुळी नागरिकांवर टाकलेला अतिरिक्त बोजा आहे असं मी समजते...आपण नागरीकांकडून निरनिराळ्या माध्यमांतून कर वसुली करत असतो. हवा, पाणी, स्वच्छ परिसर ह्या ज्याप्रमाणे मुलभूत गरजा आहेत त्याप्रमाणे देशात बांधल्या गेलेल्या रस्त्यांना दुरुस्त करणे, महामार्ग खड्डे विरहित ठेवणे हे पण सरकारचे कामच नाही का?
जो नियमित कर भरतो
त्याच्यावर अतिरिक्त बोझा, व जो भरीत नाही त्याच्याकडून प्रगतीच्या नावाने वसूल
केलेला मोबदला असाच वाटतो मला हा ‘टोल’!
टोल नाके सगळीकडे असतात.
त्याला अमेरिका देखील अपवाद नाही. टोल नाके सापडण्याचे मुख्य ठिकाण म्हणजे
महामार्ग.
गर्दीतून मार्ग काढत
उकाड्याच्या दिवसात लांब रांगा लागलेल्या टोल नाक्यासाठी घरातून निघतांनाच
प्रत्येकजण ह्या टोलचा विचार करतो. इथून गेलो तर एवढा टोल पडेल व त्या मार्गाने
गेलो तर इतका खर्च होईल! ह्याचा अर्थ आपण तो ‘टोल’ नाखुशीनेच स्वीकारतो ना?
“भारत म्हणजे सरकारी
कामांच्या ठिकाणी लागलेल्या लांब रांगा. त्यात अजून भर म्हणून हे महामार्गांवरचे वेळकाढू
टोल नाके...”हे आपले चित्र फिक्स!! फक्त कुठे जाऊ त्या ठिकाणाचे नाव त्याला लावा..
इथे कुठल्याही कामाचा सोप्पा अथवा कठीण मार्ग आपल्याला वेळेचा ‘टोल’ भरल्या शिवाय
मोकळा होत नाही.
भारतात असलेला उकाडा आणि
किचकट कार्यालयीन व्यवहार आपल्याला प्रत्येक गोष्टीकडील लक्ष स्वतःवर वळवण्यास
मजबूर करतो. लांब रांगेतून घड्याळाच्या काट्यांवर डोळे लावत आपण स्वतःच्या सुटकेची
याचना स्वतःशीच करीत असतो, कारण पुढची कामे आपली वाट पहात असतात..ही विचारांची
चलबिचल अहोरात्र मनात चालूच असते, कारण “आपली न संपणारी कामे आणि कमी पडणारा वेळ!”
आज प्रत्येकाला पैसा आणि
वेळ वाचवायचा मार्ग हवा आहे. किंबहुना फक्त वेळ वाचवायला म्हटलं तरीही पुरेसं ठरेल
ते!!
आपण शिकून परदेशात स्थायिक
होतो त्यामागे सिंहाचा वाटा ह्या रहदारीचाच म्हटला जातो. अन्य बरीच करणे त्यापुढे
दुय्यम आहेत कारण ती थोडी फार तरी टाळता येऊ शकतात.
आपल्याकडे नियमात बांधून
घेणे कुणाला मान्य नाही. मग ते रहदारीचे नियम असोत वा कचेर्यांचे नियम...आणि पकडले
गेलो तर दादारीगी आहेच!
परवा एका मोठ्या
सुपरमार्केट मध्ये पाहिलं कॅश counter वर कोण पहिलं जाणार ह्यासाठी खडाजंगी चालू
होती. कुणीही ऐकेना...पुढे घुसणारा धमकावायला लागला तुला माहित आहे का मी कोण आहे
ते? मी ह्या ह्या व्हीआयपीला फोन लावतो...त्यांच्यावर स्टोरमधील कुणीही ताबा मिळवू
शकले नाही. त्यामुळे त्यांची आणि पर्यायी बर्याच लोकांची रखडपट्टी देखील झाली. हे
चित्र तर रोजचेच आहे...निव्वळ ५ मिनिटांच्या कामासाठी इतकं गंभीर वळण घेण्याइतके
आपण ह्या सर्वांना कंटाळलो आहोत का खरंच? ह्याचं उत्तर एकजात ‘होच’ येणार!
ह्या सगळ्याचे देखील मुख्य
कारण वेळ वाचवणे आहे हेच निष्पन्न होते....कामांना उशीर, नको तितक्या खेपा, लंच
टाईम्स ह्या अडचणी आता आपण पुढाकार घेऊन दूर केल्या पाहिजेत.
अमेरिकेत मोठ्या स्टोर्स
मध्ये स्वतःच्या वस्तू स्कॅन करून स्वतः बिले चुकती करायची देखील सोय आहे. परंतु
ज्यांना मदतीची गरज असते त्यांच्यासाठी कॅश counters ची देखील तिथे सोय केलेली
असते!
आपल्या देशात उपलब्ध असलेले
तंत्रज्ञान जो पर्यंत दैनंदिन व्यवहारात सर्रास वापरले जात नाही तो पर्यंत परदेशात
जाणाऱ्या उच्च शिक्षित भारतीयांचा लोंढा थांबवणे शक्य नाही. स्वच्छता, गलेलठ्ठ
पगार ह्या पर्यायाने येणाऱ्या गोष्टी आहेत मग..! आपली संस्कृतीची पाळेमुळे सोडून
सुखाच्या शोधात जाणारा माणूस खुशिखुशीने जात नसतो नेहमी.
आजचा मुख्य मुद्दा
चेक नाक्यांचाच असल्याने आता त्या विषयी बोलूया..
अमेरिकेत विशिष्ट
इंटरनेटच्या साईटवर आपण काही पैसे जमा करून टोलची आगाऊ रक्कम जमा करतो. पोष्टाने
त्याची पोचपावती व एक गाडीवर लावायचा ‘इलेक्ट्रोनिक tag’ आपल्याला घरी पाठवला
जातो. गाडीच्या समोरच्या बाजूला काचेवर सांगितलेल्या
नेमक्या ठिकाणी तो आपल्याला लावायला लागतो.
अमेरिकन
टोलनाक्याच्या वरील बाजूस एक स्कॅनर बसवलेला असतो. तिथे फाटक नसते. तुमची गाडी
भरधाव वेगाने महामार्गावर टोलनाके ओलांडून जाते. तुमच्या गाडीवर लावलेला ‘इलेक्ट्रोनिक
tag’ चेकनाक्यावरील स्कॅनर रिड करतो. तुमच्या
जमा केलेल्या आगाऊ टोलच्या रकमेतून तो टोल वजा केला जातो. ह्या व्यतिरिक्त वैयक्तिक पैसे भरून सुद्धा टोलनाका पास करणे शक्य असते.
इतकेच काय पण ‘शिकागो’ सारख्या डाऊनटाऊन मध्ये तुम्ही उधारीवर सुद्धा टोलनाके पार
करू शकता.
टोलनाके पार करून
तुम्ही त्यांच्या वेबसाईट वर जाऊन केलेल्या प्रवासाचा टोल एका आठवड्यात जमा करू
शकता.
सुरक्षितता आणि
वसुलीसाठी तुमच्या गाडीची नोंद टोलनाक्यावर केली जाते. त्यामुळे तुम्ही टोल
चुकवलात तरी तुमच्या घरी त्याचं बिल येते. वर व्यवहार सुद्धा पारदर्शक राहतो. मग
झालं न कामं? अजून काय पाहिजे....
अमेरिकेत चेकनाके,
पेट्रोलपंप हे मेनलेस म्हणजे माणूसविरहित आहेत. कारण तिथे मनुष्यबळ कमी आहे. हेच
नाही बर्याच गोष्टी तिथे तश्या चालतात. त्या विषयी आपण पुढील स्तंभात बोलूया.
--मधु निमकर. (दै.कृषीवल, मोहोर पुरवणी, १९-०४-२०१५)


