शनिवार, ११ एप्रिल, २०१५

ओर्कुटची ओळख





सोशल नेटवर्किंग हा आत्ता जगाचा आत्मा जरी बनला असला तरीही त्याची पायमल्ली खर्या अर्थाने झाली ती ऑर्कुटमुळेच असं माझं स्पष्ट मत आहे!!
ही गोष्ट आहे मी भारतातून अमेरिकेत स्थानांतरीत झाल्यावर लगेचची...
इंटरनेटवर संवाद साधण्याबरोबर सोशल नेट्वर्किंगला सुद्धा त्यावेळी चांगलाच पेव फुटलेला. त्यात माझ्यामते ओर्कुट सर्वात अग्रेसर समजले जात असावे. फेसबुक सुद्धा होतेच. परंतु ओर्कुटवर जो काही जिवंतपणा होता तो फेसबुकवर कधी आढळला नाही, किंबहूना अजूनही नाही असं सुद्धा मी म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही!
माझी कॅलिफोर्नियाची एक मैत्रीण नेहमी सांगायची, “मधु, आपण सर्व एकमेकांशी ओर्कुटवर कायम संपर्कात राहू. आजूबाजूच्या मैत्रिणी आहेत ओर्कुटवर... तू सुद्धा ये!!” वर्षभर मागे लागून शेवटी कुठून तरी अनवधानात मला ओर्कुटचं आलेलं आमंत्रण मी स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने सोशल नेट्वर्किगमध्ये माझा प्रवेश झाला!
अश्याच जुन्या-नवीन मित्र-मैत्रिणींमध्ये एक जुनी मैत्रीण ओर्कुटवर भेटली! माझ्या खास मोजक्या दोस्तांपैकी एक होती ती! त्या मित्रांच्या समुदायातील एकमेव श्रीमंत म्हणायची ती स्वतःला...साधी राहणी आणि उलाढाली स्वभाव ठासून भरलेला तिच्यात!
माझ्यापेक्षा ती एक-दोन वर्षांनी मोठी, परंतु तरीही समवयस्कच..! आता तिला देखील एक मुलगी होती. मी अमेरिकेत होती आणि ती जपानमध्ये एवढाच माझ्या दृष्टीने फरक होता.
आपल्याला जगात कुठेही कितीही मोफत कॉल्स करायला मुभा आहे हे तिने आठवडाभर माझ्यासमोर घोळवलं. परंतु तिने लावलेला कॉल माझ्यापर्यंत एकदाही पोहोचला नाही. त्याचे उत्तर तिचं जाणे!!..असो...माझी मैत्रीण ती, मला तरीही तिचं कौतुकच भारी असायचं!! शिकायची, वाचायची आणि उद्योगांची भरपूर आवड असल्याने विषयाला तोटा नसायचा कधी तिच्याकडे....मग तिने मला तिच्या बंगल्याचे ती दीड लाख येन भाडं भरते असं सांगितलं.
जगातल्या सर्वात श्रीमंत देशात, सर्वात महागड्या शहरात तिचा बंगला होता. त्याचं भाडं देखील तिच्या मते सर्वात उच्च आहे हे ती वारंवार मला सांगे. पैसा असला तरी दुर्दैवातून ती वर आलेली मी तिला बघितलेली. तिने नशीब काढले म्हणून मी खूप खुष होते, आणि ती सुद्धा माझ्यावर तितकीच खूष असायची!
ती राहायची बंगल्यात आणि मी राहायची तीन खोल्यांच्या अपार्टमेंटमध्ये....! दीड लाख येन भाडं होतं तिच्या घराचं आणि माझे आपले पंधराशे डॉलरचे लहान (तिच्यासाठी) घर....तरीही मला तिचा हेवा वाटायचे कारण देखील नव्हते. माझे जे काही होते ते स्वर्गापेक्षा कमीही नव्हते!!
तिचा घरच्या भाड्याचा हिशोब रोज ऐकून-ऐकून मी एक दिवस मिलिंद जवळ  (पती) कौतुकाने त्याचा विषय काढला....
ते ऐकून मिलिंद माझ्यावर चांगलेच डाफरले!!...म्हणाले,”तुला माहित आहे का त्या देशात सर्व हिशोब फक्त येनमध्ये मोजले जातात?? आणि येनची तुलना भारतीय पैशाशी केली जाते. जपानी करन्सीमध्ये येन पेक्षा काही मोठं देखील नाही. डॉलर्स, पौंड अशी काही गोष्ट नाही तिथे. एक येन म्हणजे एक रुपया सुद्धा नाही....तिच्या दीडलाख येन पेक्षा जास्त भाडं आपण डॉलरमध्ये ह्या घरासाठी मोजतो आहोत...”
ह्यांनी लगेच करन्सीजचा मला तोंडी हिशोब मांडून सांगितला....वर म्हणाले,”जा आणि सांग हे तुझ्या मैत्रिणीला!! तुझ्या बंगल्यापेक्षा महाग अपार्टमेंटसमध्ये आम्ही राहतो...हिशोब शिकव तिला जरा!!”
ह्यांनी सांगितलेल्या हिशोबाप्रमाणे तिच्या जगातल्या सर्वात महागड्या देशातील, सर्वात महागड्या शहरातील मोठ्या बंगल्याचे भाडे माझ्या तीन खोल्यांपेक्षा तुलनेत कमी निघालेले...!! (दीड लाख येनची किंमत सुमारे बाराशे डॉलर्स होत होती. आणि मी पंधराशे डॉलर्स भाडे दरमहा भरत होते.)
प्रत्येक बाबतीत तिची स्वतःला वरचढ सिध्द करायची हौस तिला ह्यावेळी भागवता आली नाही.
स्वतःला उच्च शिक्षित, खानदानी, ऐश्वर्यवान, भाग्यवान समजणारी बिचारी ती हा धक्काचं सहन करू शकली नाही..
“अगं नाही गं तसं!! ते शक्यच नाही”...असचं काहीसं बरळत ती तात्काळ निघून गेली!!
नेहमीप्रमाणेच औपचारिक गप्पा समजून मी देखील आपल्या कामात पुन्हा व्यग्र झाले..
ओर्कुटवरच्या माझ्या मित्रांच्या यादीवर मर्यादित अंकामुळे माझं चांगलं लक्ष असायचं. दोन दिवसात माझ्या प्रोफाईल मधून ती निघून गेल्याचे माझ्या लक्षात आले. मी लगेच तिला निरोप पाठवून त्याविषयी विचारले देखील.!!
...चुकून झाले ना डिलीट? असा माझा पहिला निष्पाप प्रश्न तिला होता... तर ती वैतागून म्हणाली, “कशाला हवी ओर्कुटमध्ये मी?...तुझ्याजवळ इमेल आहे ना गरज पडली तर संवाद साधायला? त्यावर निरोप पाठवत जा..!” तिच्या जवळ जास्त वायफळ वाद घालण्यात आता तथ्य उरलेले मला दिसले नाही...
पुरोगामी, उच्च शिक्षित, सधन कुटुंबातील मुलगी, बाल मैत्रीण असून देखील मनात कसल्या चढाओढी घेऊन बसलेली होती ती ते तिलाच माहित! तिच्या ह्यापेक्षा देखील इतर अनेक वैयक्तिक, सामाजिक समस्या मी ऐकलेल्या होत्या. त्याविषयी मी न बोललेलेच बरे! असो!! कुणाला ती भेटली तर जरूर सांगा मी तिची अजूनही आठवण काढते म्हणून!!

--मधु निमकर. (दै. कृषीवल, मोहोर, ५/४/२०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा