शुक्रवार, २७ मार्च, २०१५

महिला सुरक्षित आहेत का?



‘निर्भया’च्या डॉक्युमेन्ट्रीच्या निमित्ताने आणि ‘जागतिक महिला दिनाच्या’ निमित्ताने महिला आणि सामाजिक मानसिकता ह्यावर बरीच चर्चा झाली. निर्भायाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जगातील पुरुषप्रधान संस्कृती, तसेच भारतीय संस्कृती महिलांकडून काय अपेक्षा करते ह्यावर बरीच काथ्याकूट झाली, आणि ह्या सर्व गोष्टींचे निष्पन्न म्हणण्यासारखं काहीही झालं नाही.
प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारतात महिला सुरक्षित नाही, बलात्कारी लोकांचा देश वगैरे विशेषणे लावण्याचा प्रयत्न देखील झाला. त्यानिमित्ताने मला देखील भूतकाळातील मी पाहिलेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या गावातील गोष्टींच्या आठवणींना उजाळा मिळाला!
सर्वप्रकारे जगाच्या पुढे असलेल्या अमेरिकेची देवी, म्हणजेच ‘स्वातंत्र्य देवता’ (statue of liberty) हातात व्यक्तिस्वातंत्र्याची मशाल घेऊन अमेरिकेला व बलशाली असल्याने जगाला प्रकाशाची वाट मोकळी करून द्यायला उभी आहे.
मग काय चालू आहे या स्वातंत्र्य देवतेच्या गावात? आहेत का तेथील महिला भारतापेक्षा सुरक्षित?  
ह्याचे उत्तर नक्कीच नाही.....तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, पुरुषांची मानसिकता कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत तिच असते. त्याचा तुमच्या जात, धर्म, रंग, नागरिकत्व, काही अंशी वय ह्याचा देखील काही संबंध नसतो.
मी आधी सांगितल्याप्रमाणे माझी मैत्रीण मोनिका...तिच्या पासूनच सुरुवात करायला लागेल! गांधीजींच्या शिस्तीत वाढलेली गुजराती डॉक्टरची ही सुंदर मलगी. दिसायला स्मार्ट परंतु अभ्यासात मागे, तरीही एक उत्तम गृहिणी, माता, विश्वासू मैत्रीण! दहा वर्षे अमेरिकेत राहून सकाळी ५ च्या अंधारात मला विश्वासाचा हात देऊन मोर्निंग वॉकला घेऊन जाणारी मोनिका...जिमच्या दारावर अनेकवेळा पाहटे त्रास देणारे भुरटे चोर, गुंड तरुण ह्यांना बिनधास्त परतवून लावणारी पण तिचं! पुढे अनेकवेळा पहाटे अमेरिकेच्या सुनसान अंधाऱ्या रस्त्यांवरून एकटीने गाडी हाकीत ‘मिशन पीक’चा उंच डोंगर बिनधास्त करणारी पण तिचं. वाटेत रेस लावायला मागे लागलेल्या अमेरिकन पुरुषांना योग्यप्रकारे मार्गी लावणारी पण तीच. उंची पाच फुट पण नाही, इंग्रजी भाषा बोलायला अवघड, परंतु निडर, निर्भय अशी स्त्री.
आमच्या कॉलनीत रोज संध्याकाळी पाय मोकळे करायला मी जायचे. अशी देखील दिवसा उजेडी सुनसान असलेली सोसायटी माणसांच्या गजबजाटात कधी सणावारी पूल पार्टी करतांनाच फक्त दिसायची. त्यामुळे इमारतींच्या मागील बाजूंनी जाणार्या पायवाट अगदीच सुन्न असायच्या. घरात माणसं आहेत का नाही ह्याची देखील चाहूल लागायची नाही. माणूस म्हणून अस्तित्व सांगणारी गोष्टं म्हणजे पपई आणि पीचच्या झाडाच्या जवळ किर्रर रातकिड्यांच्या आवाजात, अगदी मागच्या बाजूला कसला तरी गैरव्यवहार चालवा त्याप्रमाणे एका घरात खूप पक्षी, प्राणी भरलेले असायचे. पिंजर्यातल्या पक्षांचे ओळखीचे आवाज बाहेर ऐकू यायचे. जवळून जातांना उग्र दर्प देखील यायचा. काहीसे चेटूक किवा तस्करी करणार्यांचा एकूण भास व्हायचा...
दृष्टी आड सृष्टी म्हणावी त्याप्रमाणे मोनिकाच्या संगतीत राहून भीती म्हणजे काय हे मी पण विसरून गेलेले...
मला अशी एकटीला फिरतांना पाहून माझी दक्षिण भारतीय मैत्रीण मला नेहमी ओरडायची. अमेरिकेत वेडसर वागणारी लोक आहेत, तू अशी एकोशीच्या भागात फिरत जाऊ नकोस एकटीने. तुला धोका आहे. कधी मेलेले पाणसाप देखील वाटेत बाजूला पडलेले दिसायचे, त्यावेळी मात्र माझं शहरी मन आतून थोडं घाबरायचं! मग तो रस्ता दोन दिवस सोडून पुन्हा त्याच वाटेने पाय वळायचे सर्व विसरून!
दाक्षिणात्य मैत्रिणीचे घर अगदी गेटच्या जवळच होते. संध्याकाळचे ४:३० वाजले की जवळच्या बिल्डींगमधील पेइंग गेस्ट राहणाऱ्या मुलांचं टोळकं बियर वा तत्सम उत्तेजक पेय घेत बंद galleryमध्ये रिकामटेकडे उद्योग करत बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या बायकांची छेड काढत बसलेली असायची. दंगा, पार्ट्यांमध्येच त्यांची संध्याकाळची सुरुवात व शेवट व्हायचा!
मी ऐकलेला तेथील एक महिलांच्या सुरक्षिततेचा किस्सा इथे आज शेअर करावासा वाटतो. अमेरिकेत राहणाऱ्या माय-लेकींचा हा किस्सा आहे. रोज रात्री नाईट ड्युटी करायला जाणाऱ्या तरुण मुलीला तिची आई कारने आणायला जायची. रात्रीचे दोन वाजता ह्या नेहमी ये-जा करणाऱ्या स्त्रिया काही वाईट लोकांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. एक दिवस त्या दोघींचा बलात्कार करून प्रेते नग्न अवस्थेत रस्त्याच्या मध्ये टाकलेली आढळली, त्यांची वस्त्रे झाडावर भिरकावून दिलेली सापडली.
व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता अमेरिका, तेथील कामगार वर्गातील लोक बिनधास्त पैसे देऊन बाईच्या मागे लागलेली सुद्धा मी पाहिलेली आहेत. अगदी सतरा-अठरा वर्षाचा कोवळा मुलगा साठीच्या बाईच्या गळ्यात हात घालून रस्त्याने चाळे, लगट करून जातांना देखील मी बघितलेलं आहे. अर्थातच ती बाई वेश्याचं होती ह्यात शंका नाही. हा शहरी भागापेक्षा दूर असलेल्या ठिकाणी माझ्या बघण्यात आलेला किस्सा सांगितला..
ह्याच प्रमाणे सभ्य, आणि सरळ अमेरिकन लोकांची देखील तिथे नक्कीच कमी नाही. चारित्र्यवान स्त्री-पुरुष देखील तिथे सर्रास दिसतात, किंबहुना जास्तीच दिसतात.
कुठल्याही बागीच्यानमध्ये, व सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक कपड्यात मी अमेरिकन बाईला बघितलेले नाही. कुठलाही अमेरिकन पुरुषदेखील रस्त्याने येणार्याजाणार्या बायकांची छेड काढतांना मला आढळला नाही. अगदी साधी कुठलाही मेकप, भपका नसलेलीच तेथील स्त्री दिसते, परंतु नीट-नेटकी.
प्रत्येक टीनेजरच्या बगलेत स्वतःची मैत्रीण, विवाहीताच्या हातात छोटं मुल व बरोबर बायको व जे एकटे असतील ते स्वतःच्या कामात मश्गुल!
हीच आहे अमेरिका..
देश कुठलाही असो....चांगले आणि वाईट ह्या नाण्याच्या दोन बाजू असतात. गुन्हा प्रत्येक ठिकाणीच आहे. स्त्री ही अमेरिकेतली असो व अन्य जगातली, स्वतंत्र आहे पण सुरक्षित आहेच असे नाही!!
-  
 --  मधु निमकर. (दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, १५ मार्च २०१५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा