शुक्रवार, १३ मार्च, २०१५

“आय विल बी रीस्पोन्सिबल”



अमेरिकन पालकांचे राहून राहून एक मला पडलेलं कोडं म्हणजे त्यांच्या मुलांना मारायला बंदी असून देखील त्यांची मुलं आपल्या मुलांसारखी गोंधळ घालत आहेत, ओक्साबोक्शी रडत बसलेली आहेत, हट्ट करत आहेत, पालकांची डोकेदुखी बनलेली आहेत (फक्त लहान मुलांविषयी इथे बोलत आहे) असे सामाजिक ठिकाणी मला सहसा आढळून आलेलं नाही. कितीही गर्मी असो, हे आणि ह्यांची मुले आपली कुलचं वाटतात! स्ट्रोलर (बाबा गाडी) मध्ये बसून, कधी आई-वडिलांच्या कडेवर बसून स्वारी मजेत हातातला खाऊ खातांना दिसते. सहसा ते मुलांना कधी भरवतांना देखील आढळणार नाहीत! एवढेच काय, आपली मुलं सुद्धा तिथे रडतांना, किवा भरवतांना भारतीय पालकांना मी विशेष पाहिलेलं आठवत  नाही. हा तिथल्या वातावरणाचा असर म्हणावा आणखीन काय?
मुलं लवकरात लवकर स्वावलंबी व्हावीत हेच त्या मागचे मुख्य कारण असावे. त्यामुळे पालक देखील मुलांचं करून चिडचिडे होत नाहीत व मुलांच्या देखील सुरुवातीपासून त्यांच्याकडून अतिरिक्त अपेक्षा वाढत नाहीत.

अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांना देखील तुमच्या मुलाने गृहपाठ केला नाही म्हणून तिथे जवाबदार ठरवलं जात नाही!

माझा मुलगा कधीतरी असाच गृहपाठ न करता तिथल्या शाळेत जायचा. त्याच्या डायरीमध्ये सुद्धा अभ्यास लिहिलेला नसायचा, त्यामुळे मला समजायचं नाही. मुलगा अभ्यासात ठीक-ठाक म्हणावा इतका नक्कीच होता. कधीही त्याची तक्रार घरी कुठल्या बाबतीत आलेली नव्हती. अभ्यासू मुलांपैकी एक म्हणून वर्गात त्याचं नाव होतं.

“शाळेतील गृहपाठ लिहून घ्यायची काही गरज नाही, आपल्या सर्व लक्षात असते”....अश्या मताचा तो! विचारलं तर सर्व माहित असायचं, पण गृहपाठ लिहून घ्यायची त्याची तयारी नव्हती.
एकूण दोन ते तीन वेळा असाच विसरून गृहपाठ न करता तो शाळेत गेला. ‘मुलांना मारायचं नाही, ओरडायचं नाही, प्रेमाने वागायचं, हवं ते मोकळं वातावरण द्यायचं, त्यांच्यावर कुठला ताण पडता कामा नये, परंतु शिस्त सुद्धा लागली पाहिजे.......?’- आता हे कसब फक्त अमेरिकन्सच आपल्याला देऊ शकतात. वर पालकांना सुद्धा तक्रार सांगायची नाही, तर मुलं सुधारणार कशी?? अगदी गांधीवाद अंगी आणून अहिंसेच्या मार्गाने मुलांना शिस्त लावण्यात अमेरिकन शिक्षक पारंगत असतात. हाच नियम सामाजिक बाबतीतही आपल्याला तेथे आढळतो, आणि हीच अमेरिकेची खरी ब्युटी म्हटली पाहिजे!!

माझ्या मुलाला शिक्षिकेने बसवून त्यावेळी “आय विल बी रीस्पोन्सिबल” (मी जवाबदार बनेन) हे वाक्य प्रत्येक वेळी इतके घोटवून घेतले, त्याच्याकडून वहीमध्ये लिहून घेतले की माझा मुलगा काही समजो अगर नाही, परंतु तो ह्या लिहायच्या शिक्षेला कंटाळून गेला. म्हणतात ना, ‘सोनाराने कान टोचणे’ ते ह्यालाच!!
असो!! भारतात असतांना माझ्या एका मैत्रिणीने निनादच्या वयाच्या स्वतःच्या मुलाला  पहिलीत  हुशार, अभ्यासू असून देखील जवळ म्हणून बाजूच्या घरी ट्युशनला घातले.  
मुलासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून तिने स्वतःचे बिझनेस मधील लक्ष काढून मुलावर केंद्रित केलेले. मुलगा अभ्यासात हुशार होता. तिच्या बरोबर गोष्टीची पुस्तकं देखील वाचायचा, वर्गात चांगले मार्क घेऊन यायचा.
मला देखील तिने निनादला त्या ट्युशनला पाठवायला सुचवले. घरी चार ओळी लिहायला सोंग करणारा ६-७ पाने तिथे मात्र तासाभरात लिहून काढायचा! त्यामुळे मी समाधानी होते.
एक दिवस त्या माझ्या मैत्रिणीला जाग आली. गृहपाठ करतांना मुलाने तिला विचारले, “आई ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून मी धड्यातली कुठली ओळ लिहू? वरची ओळ, का खालची ओळ?”......झाले.....तिचा पारा असा काही चढला!!! आपल्या मुलाने धडे वाचायचे सोडून दिले आहे, तो सर्व प्रश्नाची उत्तरे ट्युशन टीचर सांगेल ती बघून फक्त नक्कल (कॉपी) करायचा हे तिच्या चांगले लक्षात आले. तेव्हा पासून तिने स्वतःचा मुलगा तिथे पाठवायचा बंद केले व मला देखील पाठवू नको म्हणून सांगितले.
तेव्हा पासून मी देखील ‘मुलाला स्वतःचा अभ्यास स्वतः करू दे’ हे मनाला पटवले. जोपर्यंत मुलं स्वतः धडे मन लाऊन वाचत नाहीत, अभ्यास समजून घेत नाहीत, तो पर्यंत त्यांच्याकडून तुम्ही गुणवत्ता अपेक्षित धरू शकत नाहीत.
मुलाचे घाणेरडे अक्षर शिक्षिका रागवेल म्हणून आपण सुधारावे, त्याची चित्रे काढून द्यावीत, प्रोजेक्ट्स करून द्यावेत ह्या गोष्टी बर्याच मी केल्या. परंतु बाकी पालक म्हणायचे त्यांच्या वयाला जे येतं ते स्वीकारायला पाहिजे. मी मदत करून देखील मुलाला त्याचा फायदा कधी देखील झाला नाही. त्यापेक्षा त्याला स्वतःच्या पद्धतीने स्वतःचा शालेय शिक्षणाचा भार पेलू देणे योग्य होते!
मी तर सांगेन आत्ताच्या काळात दिले जाणारे अनाठायी, कठीण वाटणारे प्रोजेक्ट्स पालकांच्या मदतीमुळेच बोकाळलेले आहेत. एकदा शाळांना मुलांची कुवत समजली तर अनाठायी आणि कुवती बाहेरचे विषय देखील देण्याचे धाडस शाळा करायचे सोडून देईल....असो!!


अमेरिकन शिक्षिकेने मुलाला दिलेल्या शिक्षेचा मी सुद्धा स्वीकार केला. “मुलाचा अभ्यास त्याची वैयक्तिक जवाबदारी,” असे म्हणून मी त्याच्या अंगावर अभ्यासाचा भार टाकून मोकळी झाले!! मुलाने स्वतःच्या गृहपाठ, व अन्य गोष्टींची जवाबदारी स्वीकारली! जमले नाही तिथे मदत मागितली, मी दिली! त्यामुळे शाळेत त्याची एकाग्रता वाढली. शालेय शिक्षण ही पहिली जवाबदारी मुलाची येते हे मी अमेरिकेत शिकले!!
-  
 -- -- मधु निमकर. (दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, ३ मार्च २०१५)









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा