बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१३

अमेरिकेतील माणसे आणि माणुसकी...


 

अमेरिकेच्या वातावरणात adjust होणं फारसं अवघड काम नव्हतं. त्यात आमच्या बरोबर अजूनही काही ३-४ परिवार ह्यांच्या कंपनीमधून कॉलनीमध्ये भारतातून स्थलांतरित झालेले. त्याचबरोबर बरेच नवीन भारतीय चेहरे सोसायटीमध्ये रहात असलेले देखील मला आढळले. त्यात काही भारतीय स्त्रिया छोट्या मुलांना घेऊन फेरफटका मारत असायच्या, तर काही नवविवाहिता होत्या. पटकन समोर येऊन माझी ओळख करून घ्यायच्या. कधी जिममध्ये भेटायच्या. हळू हळू भरपूर बायकांजवळ ओळख आणि मैत्री झाली. बहुत करून कामानिमित्तानेच पाच-सहा वर्षासाठी अमेरिकेत राहायला आलेली ही सर्व मंडळी. मुले जरा शाळेत जाण्यायोग्य झाली की आई वडिलांना तिथे भारताचे वेध लागायचे.

नवरे दिवसा कामावर जायचे आणि आजूबाजूच्या बायका ग्रुप करून मग दुपारी कधी ‘टी पार्टी’ किवा ‘potluck’ च्या निमित्ताने एकत्र जमायच्या, कधी दिवाळी आणि नवीन वर्षान सारखे सण एकत्र साजरे करायच्या. व्यवसाय, नागरिकत्व, आर्थिक परिस्थिती, सोशल स्टेटस सर्वांचे सारखे. परंतु आपण बरं का आपला ग्रुप बरा असाच सर्वांचा पवित्रा आढळतो.

एका वर्ष पासून राहणारी सुलभाच काय, आठ-आठ, दहा-दहा वर्षे एकलकोंडेपणाने घालवणारी कितीतरी कुटुंब मला तिथे भेटली. त्याचं कारण फक्त त्यांचा कुठला ग्रुप नाही..

माझी तेथील एक बंगाली मैत्रीण मला नेहमी घरी बोलवायची. म्हणायची, ”इथे येणार्या प्रत्येक माणसाची माणुसकी एका वर्षात संपते.” तिचे बोलणे ऐकून मी निशब्द व्हायचे....विचारात पडायचे म्हणजे नक्की काय अनुभव येतात येथील लोकांना...असो!!

इथे सुलभाची प्रकृती बिघडत चालली. पित्ताशायाच्या खड्यांचा तिला त्रास होता. शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. वर्षाची लहान मुलगी बोलू सुद्धा शकत नव्हती आणि पाच वर्षाचा शाळेत जाणारा मुलगा. प्रोजेक्ट सुरु होत असल्याने स्वप्नीलला सुद्धा रजा घेणं शक्य नव्हतं.

माझ्याकडे ती आशेने आली आणि मला तिने सर्व सांगितलं. म्हणाली,” माझी शस्त्रक्रिया आहे, मला तुझी मदत हवी आहे. तू नाही म्हणालीस तर मला भारतात जाऊन शस्त्रक्रिया करावी लागेल.”

कुठलाही पुढचा मागचा विचार न करता मी तिला होकार दिला. तरीही पुन्हा पुन्हा विचारून तिने अनेकदा खात्री करून घेतली.

शस्त्रक्रियेचा दिवस ठरला. दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेने तिचं पित्ताशय काढून टाकण्यात आलं. पहिले तीन दिवस स्वप्नीलने घरी राहून तिची काळजी घेतली. मग ,मात्र त्याचा प्रोजेक्ट चालू होत होता. मुख्य सूत्र त्याच्याच हातात असल्याने त्याला सुट्टी मिळणे शक्य नव्हते.

ठरल्याप्रमाणे चवथ्या दिवशी मी सकाळी उठून सुलभाच्या घरी गेले. तिला उठायला बसायला परवानगी होती. स्वतः पुरते ती जेमतेम उठू बसू शकत होती. अश्यावेळी समान शोधण्यापेक्षा स्वतःच्या घरूनच जेवण करून नेण मला सोयीचं वाटलं. गेल्यावर प्रथम तिला हलका आहार देण्याचा मी प्रयत्न केला. परंतु अवयवाच्या त्यागाने दुखावलेल्या तिच्या शरीराने जणू सत्याग्रह मांडलेला. अंथरुणातून उठण्याची परिस्थिती नाही आणि पोटात एक अन्नाचा कण टिकून रहायला मागत नाही, अशी तिची अवस्था होती. अतिशय विव्हळत, वेदना सहन करत प्रत्येक वेळी तिला अंथरुणातून उठावं लागत होतं. एका मागून एक सिलसिला चालूच होता, थांबायचं काही नाव नव्हतं. ओपेराशनच्या रुग्णाला इतक्या बिकट स्थितीत हॉस्पिटलवाले घरीच कसे जाऊ देतात ह्या गोष्टीची मला मनातून खूप चीड आली. दुसरीकडे सुलभाची वाईटात वाईट अवस्था बघून हातावर हाथ धरून तमाशा बघत बसण्याशिवाय माझ्याकडे काही पर्यत नव्हता.

ऑपरेशनमुळे आलेली कमजोरी आणि चार दिवसाचा उपास ह्यामुळे सुलभापेक्षा मीच कोसळणार का काय अशी मला भीती वाटू लागली. तिच्याकडे बघून माझे हात पाय गळून गेले. डॉक्टरने सांगितलेलं औषधपाणी सर्व चालू होते. पण गुण कसला येत नव्हता. संध्याकाळी स्वप्नील आला, परंतु माझा घरी जाण्यासाठी पाय निघेना. त्याने तिला सूप प्यायला दिलं. पण ते सुद्धा तिच्या पोटात टिकलं नाही. माझा पाय निघत नाही हे बघून सुलभाने मला निरोप दिला. माझ्या घरच्यांना सुद्धा माझी गरज होती.

शेवटी काहीच न सुचून मी तशीच घरी गेले.

दुसर्या दिवशी तिची तब्बेत आणखीन खालावली. माझा धीर सुटला...वाटले हि काही वाचत नाही. एवढी लहान मुलं, कसा होणार त्यांचं. शेवटी म्हणाले काहीही झालं तरी मी हिला लवकरात लवकर बरी करणारच....

मोठ्या निर्धाराने मी बरेच काही प्रकार करून बघितले, आणि हळू हळू तिच्या तब्बेतीने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्या काळात एकही मिनिट मी जीवाला विश्रांती दिली नाही. तिचे वेदनेने विव्हळणे आता थोडे कमी झाले. अन्न पचू लागल्याने सुद्धा जीवाला थोडा आराम द्यायची उसंत मिळाली तिला.

चार पाच दिवस ऑपरेशनचे असेच निघून गेले. सुलभाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. तिला सावरलेली बघून मी सुद्धा समाधानी झाले.

आठवडाभरात खूप आराम पडला तिला आणि मी निरोप घेऊन पुन्हा माझ्या घरात लक्ष घालायला मोकळी झाले.

तिच्या माहेरचं आणि माझ्या आजोळचं आडनाव एकचं असल्याने मला कायम तिच्या रूपाने माझी बहिण भेटल्याचा आनंद व्हायचा.

मुलाची शाळा सुरु झाली. एक दीड मैलावरच शाळा आहे. दहा बारा मिनिटे फक्त चालायला लागेल म्हणून आम्ही जास्त मनावर घेतलं नाही. शाळेची बस मात्र उपलब्ध नव्हती ही खंत होती.

सुरुवातीला एक चांगली गाडी पुरेशी झाली ह्या विचाराने दुसरी कार आम्ही घ्यायचा विचार केला नव्हता. मला ड्राईविंग सुद्धा धड येत नव्हतं. भारतात जेमतेम लायसन मिळवण्यापुरते ड्राईविंग शिकलेली मी. त्यामुळे दुसरी गाडी हा विचारानं पलीकडचा मुद्दा होता.

पुढे पुढे पावसापाण्यात लहान मुलाला घेऊन कॅलिफोर्नियाच्या रस्त्यातून शाळेकडे चालणं त्रासदायक होऊ लागलं.

एक दिवस अशीच शाळेतून मुलाला परत घेऊन येतांना एका सिग्नल जवळ सुलभा समोर तिची मोठी van घेऊन उभी दिसली. चेहऱ्यावर पूर्ण अनोळखी भाव. तिने माझ्याकडे बघितले आणि अश्याप्रकारे हावभाव केले जणू ती मला ओळखतच नाही. माझ्या मनाची खात्री पटली नाही म्हणून मी बाजूच्या मैत्रिणीला (आमच्या दोघींच्या नवर्यांच्या कंपनीतील स्नेह्याची बायको) विचारले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पुढे पुढे ह्या गोष्टीची सवय करून घेतली मी.

हि आहे अमेरिकेतील माणसे आणि माणुसकी...

ह्याला घमेंड म्हणावी की असुरक्षितता हा एक वादाचा मुद्दा आहे. परदेशात तुमच्या उपयोगाला पडलेल्या माणसाला तुम्ही ओळख देखील दाखवण्या इतका कृतज्ञपणा नाही दाखवलात तर तुम्हाला मित्रच काय माणूस देखील म्हणू नये कुणी..

“आपल्या तव्यावर दुसरा पोळी भाजू पाहतो आहे” हि मानसिकता केवळ संकुचित मनोवृत्तीच्या माणसांजवळच आढळू शकते.

परदेशात जाण्याचा निर्णय मी स्वतःतले बळ ओळखून घेतला होता, कुणाच्या उपकाराने बांडगुळाप्रमाणे जीवन जगायची स्वप्ने नक्कीच घेऊन मी अमेरिकेला आले नव्हते.

-    मधु निमकर

(दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात ६/१०/२०१३)

 

 

 

                                                  



                  

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

आठवणीतली 'Manchester'ची सहल...




 अमेरिकेत राहायला गेल्यावर पहिल्या काही दिवसातच ‘Manchester’ च्या mendocino गावच्या किनारपट्टीवरील ‘KOA KAMPGROUND’  ह्या ठिकाणाला तीन दिवसाच्या सहलीला जायचं नक्की झालं!

प्रशांत महासागराच्या किनारपट्टीला लागून असलेलं कॅम्पिंगसाठी, तसेच समुद्र किनारपट्टीचे टुरिस्ट ठिकाण म्हणून  कॅलिफोर्नियातील ‘Manchester’ हे अतिशय प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. समुद्रकिनारा, beach walking, tide pooling, abalone diving, दोन लाईटहाउस, anderson valley, तसेच प्रेक्षणीय mendocino गाव व उंचच्या उंच रेडवूडची जंगले हे तेथील विशेष मानलं जातं. जंगलात टूरिस्ट लोकांसाठी कॅम्पिंग किचन, recreation  हॉल सुद्धा उपलब्ध आहे. कॅम्पिंगची जागा भाड्याने आरक्षित करायची सोय टुरिस्ट लोकांसाठी  केलेली आहे. जंगल असलं तरी हिंस्त्र श्वापदांपासून ते मुक्त आणि सुरक्षित असं ठिकाण आहे.

तिथे जाण्यासाठी, तसेच कॅम्पिंगसाठी आम्हाला सामानाची मोठी खरेदी आवश्यक होती. कुटुंब मावेल इतका मोठा तंबू, battery वर चालणारा लामण दिवा, मोठी टोर्च, अंथरायला ताडपत्री, अन्न शिजवायला gas वगैरे बेसिक खरेदी आम्ही केली. तिथे छोटे portable सिलेंडर विशेषतः सहल किंवा कॅम्पिंगसाठी वापरले जातात. राहिलेल्या  सामानाची सर्व तयारी स्वप्नील-सुलभा आणि त्यांचे मित्र करणार होते. त्यात शीतपेटीतून काही फ्रोजन फूड, पेय वगैरे खाण्या-पिण्याच्या गोष्टी आणि इतर आवश्यक ते रेशन होते.  

सहलीच्या चार दिवस आधी “कॅम्पिंगच्या ठिकाणी रात्री तापमान ३ डीग्री पर्यंत खाली जाणार आहे, गरम कपडे आवश्यकच आहेत” असे मला आधीच १०० वेळा सुलभाने बजावू सांगितलेले.

तिने दिलेली सूचना मी मनावर घेतली परंतु ह्यांची खात्री पटेना. उन्हाळ्याच्या दिवसात कसले तीन डीग्री तापमान खाली जाणार? असा त्यांनी अंदाज बांधलेला. नको त्या सामानाचे उगाच ओझे कशाला म्हणून मला त्यांनी थंडीचे कपडे घेऊच नकोस म्हणून बजावले.


स्वप्नीलच्या मोठ्या गाडीतून दोन्ही कुटुंब एकत्र जायचं आमचं ठरलं. त्यामुळे सर्वांना समान मर्यादित ठेवणं योगायोगाने आलंच... उन्हाळा असल्याने रात्री तापमान इतके खाली जाईल हे शहरातील उकाड्यात अशक्य वाटले तर नवल नाही..

अमेरिकन पद्धतीनुसार सकाळी घराबाहेर पडायच्या आधी दिवसाचे तापमान बघणे. ऋतूमानानुसार आठवड्याच्या  तापमानाचा, पावसापाण्याचा अंदाज घेणे हि जणू घरोघरी प्रथाच आहे...अमेरिकन वेधशाळा इंटरनेटवर तासागणिक दर पंधरा दिवसांचे तापमान एकदम अचूक देते. आपण फक्त ठिकाणाचे नाव टाकायचे, सर्व तपशील यथायोग्य रंगरंगोटी सहित तुम्हाला क्षणार्धात वेब साईटवर सादर केला जाते.असो!

अखेर कॅम्पिंगच्या दिवशी गाडीमध्ये बसतांना ह्यांनी माझ्या सामनातील गरम कपडे मला घरी ठेवायलाच लावले. सुदैवाने जीन्स आणि जेकेटच्या आत लपवत मी एक छोटा स्वेटर ह्यांना दिसणार नाही अश्या प्रकारे घातलेला, आणि मुलाला सुद्धा थंडी लागणार नाही अश्याप्रकारे कपडे एकावर एक घालून ठेवलेले. तितकेच काय ते सौरक्षण आमच्याकडे शाबूत राहिले.

‘San Jose’ ते ‘Sanfrancisco च्या उत्तरेकडील ‘Manchester’च्या जंगलापर्यंतचे २०० मैलाचे अंतर ४-५ तासात आम्ही पार केलं. तंबू वगैरे उभारे पर्यंत रात्र झालीचं!

सुटका झाल्याप्रमाणे मुलं खेळायला निघून गेली व आम्ही तिघी स्वयंपाकात गुंतलो. एकीकडे ह्या लोकांनी कॅम्पफायरलावला. त्यामुळे वातावरण निर्मिती छान झाली. मुलांची जेवणे झाली. सर्वजण वातावरणाचा आनंद घेत होते. पुरुष मंडळीही हळू हळू पार्टीमध्ये गुंतलेली. होता-होता गर्द झाडीमध्ये अंधाराबरोबर थंडी वाढू लागली.

जंगलाचा काळाकुट्ट अंधार, वाढणारी थंडी.....प्रवासाचा थकवा घालवायला प्रत्येक जण आपापल्या तंबू जवळ प्रस्थान करू लागले.....खाली जात अखेर तापमान रात्री तीन डीग्रीच्या खाली पोहोचलेच...तोंडातून बोलतांना वाफा येऊ लागल्या..

भारतीय वेधशाळेप्रमाणे अमेरिकन वेधशाळांचे अंदाज कधीच चुकत नाहीत, आमच्यावर एक मोठा आयुष्याचा धडा घ्यायची वेळ होती ती....भरीत भर म्हणून कि काय सर्वांनी आपापल्या तंबूच्या खिडक्या कपडा आच्छादून बंद केल्या आणि आम्हाला सांगायला ते विसरून गेले.

मग काय...बाहेर तीन डीग्री तापमान आणि तंबूच्या आतही तीन डीग्री तापमान...बरोबर असलेली blanket वगैरे सुद्धा थंडी पासून रक्षण करायला अपुरी पडली आम्हाला. हातमोज्याच्या मधून देखील थंडी बाधू लागली. माझी गारठून कुल्फी जमायला लागली. मुलाला पुरेसे कपडे घातल्याने ‘हूड’मध्ये तो शांत झोपी गेलेला. ह्यांना सुद्धा थंडी विशेष लागत नव्हती. परंतु रात्र जशी जशी वाढत गेली, तशी तशी थंडीने देखील माझ्या सहन शक्तीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. अगदी हाडाच्या टोकापर्यत थंडी पोहोचणे म्हणजे काय हे मला त्या क्षणी पुरते समजले. गोडगुलाबी नाही तर जीवघेणी थंडी!!...हात पाय पुरते गारठले...शरीराचा आणि मनाचाही थरकाप उडवणारी थंडी!!!!

थंडीने इतके इतके बळी ह्या वर्षी गेले अश्या बातम्या अनेकदा वाचलेल्या मला आठवते. तो काय प्रकार असू शकतो ते मला त्या वेळी समजले. मनातून दुख सुद्धा होत होतं. एका सध्या थंडी पुढे आपलं काही चालू नये ह्या गोष्टीने काहीशी लाजिरवाणी अवस्था झाली!

बाहेर गाडीचा हीटर लावून स्वप्नीलच्या मित्राची बायको ३-४ महिन्याच्या लहान बाळाला घेऊन थंडी बाळाला बाधू नये म्हणून गाडीत बसलेली.  कुणाला बोलायला देखील अवघड जावं अशी वेळ होती. माझ्याकडे सांगायला काहीही सबब नव्हती. आपल्यामुळे लोकांची गैरसोय व्हावी हे मनाला पटतही नव्हतं. शेवटी निराश होऊन मी मनात म्हटले,” मी उद्याचा दिवस काही बघत नाही.आणि दुसर्या क्षणी रात्र कधी सरते ह्याची तंबूत थरथरत वाट बघत बसले. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही आमचा. माझ्यासाठी तर सर्वात मोठी रात्र होती ती. वाचेन किवा नाही ह्या द्विधा अवस्थेत रात्र एकदाची पार पडली. सूर्याचे आगमन झाले नसल्याने अजूनही चांगलीच थंडी जाणवत होती. सकाळी जवळच्या मार्केटमध्ये जाऊन गरम कपडे आणायचे नक्की करुनचं तंबू बाहेर पडलो आम्ही.

आमच्या प्रमाणेच बाकी दोन्ही कुटुंबे रात्रभर झोपली नव्हती. फक्त त्यांची कारणे भिन्न होती.

लहान बाळाला अशी थंडी चांगली नाही म्हणून स्वप्नीलच्या मित्राने माघारी फिरण्याचा निर्णय घेतलेला. सुलभाचीही प्रकृती खूप बिघडलेली. काहीश्या आजारपणाने तिला रात्री उलट्यांचा त्रास सुरु झालेला. म्हणून स्वप्नीलने देखील घरी परत जायचा विचार बोलून दाखवला.

सामानाची लवकरच बांधाबांध करुन आम्ही घरी परतलो...

दुर्दैवाने मला पुन्हा तिथे जायची कधी वेळ आली नाही!

एक मोठा धडा पहिल्याच सहलीला आम्हाला मिळालेला....निसर्ग आपले रूप दाखवणारच, परंतु माणसाने ते समजून घेतले, स्वीकारले तरचं त्याला आनंद मिळतो. 

-मधु निमकर

(दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात २२/०९/२०१३)

 

रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

कॅलिफोर्नियातील पहिली पहाट


घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला..

पहाटेला नेहमीच्या वेळेला जाग आली मला..कॅलिफोर्नियातील पहिली पहाट!!

ही अमेरिकेची पहाट पहा कशी ते....दरवाजाला बेल नाही, दुधवाला नाही, पेपर पाहिजे तर सोसायटी बाहेर पैसे टाकून मशीन मधून तुम्ही स्वतः विकत घेऊन जाऊ शकता.  किवा एखाद्या वृत्तपत्राला तीन ते सहा महिन्यांचे पैसे भरून दररोज घरी मागवू शकता.

घनकचर्याचे व्यवस्थापनही  सोसायटीच्या ठराविक भागामध्ये केलेले. तुम्ही स्वतः रोज कचरा नेऊन तिथे टाकायचा आणि वर त्याचे पैसे सुद्धा सोसायटी तुमच्याकडून वसूल करणार.

सकाळ सकाळ एक चीटपाखरू देखील झाडावर नाही...त्यातचं कुठून तरी मोटर चालवायचा मोठा आवाज आला. सोसायटीमध्ये मशिनच्या सहाय्याने गवत कापणे तसेच मशीनने हवा घालून कचरा, झाडांचा पाला-पाचोळा  गोळा करण्याचे काम दोन तीन मेक्सिकन माणसं करतांना दिसली. कुणी एक माणूस घरासमोरील स्विमिंग पूल स्वच्छ करायचं काम करत होता. एक दोन अमेरिकन बायका हातात गरम कॉफीचा मोठा ग्लास घेऊन ऑफिसला जायच्या घाईत स्वतःच्या गाडीकडे जातांना दिसल्या. बसं हीच काय ती सकाळ!

तासाभरात गवत कापणार्याचा आवाज थांबला आणि पूर्ण शांतता पसरली. लाकडी इमारत असल्याने घरात जोरजोरात उड्या मारणं, वेळीअवेळी घरात जोराने गाणी लावणं ह्याला मज्जाव होता. आणि जर का कुणी ह्या नियमांचं पालन केलं नाही तर ९११ हा अमेरिकन पोलिसांच्या हेल्प लाईनचा नंबर फिरवून नियम मोडणाऱ्या माणसाला कुणीही पोलिसी खाक्या दाखवू शकत असे.  

असो...! माझं प्रथम कर्तव्य आणि अधिकार, माझं नवीन स्वयंपाकघर ताब्यात घेण्यासाठी अगदी मी तयारीतच होते. घरी काही भांडी ह्यांनी आधीच walmart मधून आणून ठेवलेली. सर्व प्रथम मी पहिला चहा केला. इलेक्ट्रिकच्या शेगडीवर अमेरिकन दुधाचा केलेला पहिला गरमागरम घरचा चहा!!

संध्याकाळी सुलाभाचा फोन आला. “स्वयंपाक घरातील सामान घ्यायला जायचं आहे. तयार राहा...”

चार साडेचार मैलावर भारतीय माणसाला लागणाऱ्या सर्व वस्तूंची उपलब्धी असलेल्या “भारत बाजार” नावाच्या एका मोठ्या इंडिअन स्टोर मध्ये आम्ही सर्व गेलो. लोणची पापडापासून ते धूप-दिवाबत्ती पर्यंत, आणि इडली पात्रा पासून खलबत्त्या पर्यंत, पोंडस पावडर पासून ते विको क्रीम पर्यत सर्व काही त्यात उपलब्ध होते. ते सुद्धा भारतीय ब्रान्डसचेच.

दुकानाच्या मध्यभागी मोठीच्या मोठी रेफ्रीजेरेटरची रांग होती. त्यात सर्व फ्रोजन पदार्थ ठेवलेले होते. रोज लागणाऱ्या नभाजलेल्या रोटी, पराठे, रुमाली रोटी, इडली, डोसा, उपमा, रगडा pattice, विविध प्रकारचे सामोसे....नाना विविध प्रकार होते आत. रेडी भाज्या सुद्धा फ्रीज मध्ये तसेच कंपनीच्या ब्रांडखाली पाकीटा  मधून उपलब्ध होत्या. गरम म्हणून फक्त सामोसे उपलब्ध होते, आणि काही एक दोन मिठाया. एकट्याने राहणाऱ्या नोकरदार, तसेच विदयार्थी वर्गासाठी खास करुन सोयीस्कर सर्व प्रकार तिथे उपलब्ध होते.

ह्या शिवाय भाजीपाला, रेशन, खाऊ, डबाबंद मिठाया, वगैरे सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध होते.

सुलभा मला म्हणाली,”आपला एक रुपया तो इथला एक डॉलर...” डॉलर आणि रुपयाचा हिशोब पहिल्या दिवशी करायला खूप भारी वाटला. परंतु लवकरच  डॉलर आणि रुपयाच्या कात्रीमधून मी स्वतःची सोडवणूक करुन घेतली.

घरी पोहोचल्यावर विकेन्डला तीन दिवसांच्या कॅम्पिंगला जायचा सर्वांनी बेत आखला. आम्ही दोन कुटुंब आणि स्वप्नीलचे अजून एक मित्र आणि त्यांचा परिवार..

...कॅलिफोर्निया विषयी बोलायचे झाले तर ते अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रशांत महासागराच्या किनाऱ्याला स्थित अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे. अमेरिकेच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ५० शहरांपैकी ८ शहरे कॅलिफोर्निया राज्यात मोडतात. ‘साक्रामेंटो’ ही कॅलिफोर्नियाची राजधानी!

भौगोलीक माहितीप्रमाणे कॅलिफोर्नियाच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, दक्षिणेला मेक्सिकोचे बाहा कॅलिफोर्निया हे राज्य, उत्तरेला ओरेगॉन तर पूर्वेला नेव्हाडाअ‍ॅरिझोना ही राज्ये येतात.

१९व्या शतकाच्या मध्यापर्यंत कॅलिफोर्निया हा मेक्सिकोचा भाग होता. १८४६-१८४८ दरम्यान झालेल्या मेक्सिकन-अमेरिकन युद्धानंतर हे राज्य अमेरिकेकडे सुपूर्त करण्यात आले व ते ९ सप्टेंबर १८५० रोजी अमेरिकन संघात विलिन करून घेण्यात आले. ह्याच काळात कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणींचा शोध लागला. अमेरिकेच्या इतर भागातून व सर्व जगभरातून स्थलांतर करणार्‍या लोकांचे लोंढे येथे येऊ लागले.

माझ्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका पुण्याच्या मराठी मैत्रिणीच्या आजीला अमेरिकेत काही सोने सापडले होते. त्यात तिने तिथे ११ घरे विकत घेतली, आणि त्याच्या भाड्यात ती ऐशारामात जगली..

 लॉस एंजेल्स’ ह्या कॅलिफोर्नियाच्या महानगरीतच  हॉलिवूड’ सिनेसृष्टी आहे. तसेच कॅलिफोर्नियाचे नैसर्गिक सौंदर्यही  जगाच्या कानाकोपर्यातील पर्यटकांचे आकर्षण बनलेले आहे . वसंतात येथील झाडांना जणू पाने येतंच नाहीत. थेट फुलेच येतत जणू! रस्त्याच्या कडेला वाढणारे गवत म्हणजे सुद्धा बगीचेच..

जगप्रसिध्द सिलिकॉन व्हॅलीमधील तंत्रज्ञान उद्योगांमुळे आज कित्येक भारतीय संगणक अभियंते तिथे वर्षानुवर्षे स्थायिक आहेत. आणि ते देखील खास करुन दक्षिणात्य आणि मराठी! भारतीयान बरोबर चीनी लोकही बऱ्यापैकी स्थायिक म्हटले पाहिजेत इथे. आणि कामगार वर्गात विशेषतः मेक्सिकन.

आज कॅलिफोर्नियाने अमेरिकन अर्थव्यवस्थेतील १३ टक्के वाटा उचलला आहे. त्याचे जीडीपी $१.८१२ सहस्त्रअब्ज इतका समजला जातो.

प्रगती प्रमाणे तुलानात्माक महाग सुद्धा आहे हे शहर. खास करुन जागांचे आणि काही प्रमाणात वस्तूंचे भाव.

इथले वैशिष्ट्य म्हणजे शहराचे सुशोभीकरण...प्रत्येक ऋतू प्रमाणे इथे सुशोभीकरणासाठी फुलांची झुडपे बदलली जातात. त्यामुळे असा कुठलाही ऋतू नाही ज्यात तुम्हाला येथील वास्तू फुलझाडांनी सुशोभित दिसणार नाहीत. आणि ही गोष्ट फक्त कॅलिफोर्नियामध्येच नाही तर संपूर्ण अमेरिकेतच दिसून येते. स्वच्छ मोकळी प्रदूषण रहित हवा, नीटनेटकेपणा, मोकळे रस्ते, ह्यामुळे तिथे राहण्याचा मोह आवरत नाही.

-मधु निमकर
(दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात ०८-०९-२०१३)
 

 

                                                     

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

स्वप्नाचं घर


साधारण ८ ते १० तास भरघोस कापसाच्या शेतातून अलगद आम्हाला उचलून नेत विमान जणू मध्येच आकाशात स्थिरावलेलं. विमानाचा पायलट काही ठराविक वेळेने बाहेरील तापमान, प्रदेश, तसेच विमानाची गती ह्यांचा तपशील सर्वांना देत होता, तर कधी समोर विमानाच्या उड्डाणाची दिशा, मार्ग, हवेचा दाब इत्यादी माहिती टेलीविजन वर दाखवत होता.

खिडकीतून बाहेर बघतांना बसल्या बसल्या मनात आलं, “स्वर्ग म्हणतात तो कुठे असेल बरं! लहानपणापासून आपण आकाशाकडेच बोट दाखवत आलेलो होतो. कुठे तरी स्वर्गलोकीच दर्शन एकदा तरी व्हावं.....!”

मध्येचं जगाचा पिता, सूर्यदेव आपल्या अस्तित्वाची साक्ष ढगा आडून देत होता, तर त्याला फेऱ्यांची गुंफण घेत ढग त्याच्या अवती भवती नाचून त्याला माझ्या दृष्टीपासून दूर नेत होते. जणू सूर्यावर फक्त आमचा हक्क आहे....”हेच तर ते देव आणि अप्सरा नाहीत ना?”

शेवटी प्रकाशाचा छंद दूर सारून हवाई सुंदरीने स्वतःकडे आमचे लक्ष वेधले...शाकाहारी जेवण, तसेच चहापान वगैरे सोपस्कार व्यवस्थित भारतीय पद्धतीने पार पडले.

‘frankfurt’ (जर्मनी) ते ‘लॉस अन्जेलिस’ (अमेरिका) प्रवास पार केल्यावर पुन्हा एकदा विमान बदलायचे होते.

एक दिवसाच्या उशिराने आमचे विमान अर्थातच चुकले होते व पुढील विमानाची व्यवस्था दुसर्या दिवशी करण्यात आलेली. पुन्हा एक दिवसाचा तळ लॉस अन्जेलिस (अमेरिका) मधल्या एका हॉटेल मध्ये ठोकला आणि दुसर्या दिवशी ‘san francisco’ (अमेरिका) च्या विमान तळावर आमचा हवाई प्रवास संपला.

अमेरिकेच्या भूमीला अखेर माझे पाय टेकले.....

“घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य

त्या तृषार्त भूवर आले नव चैतन्य,

उन्माद चढे, तो दर्प दर्वळे भोती

थरथरा कापली वर दर्भाची पाती”

कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे अशीचं काही माझ्या मनाची अवस्था झाली होती...आनंदाचा परमोच्च बिंदू मनाने गाठलेला. साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी संपूर्ण झाली होती........

प्रवासाच्या शेवटी नवीन ओळख झालेल्या भारतीय आणि अमेरिकन परिवारांचा मी निरोप घेतला. त्यातील काही लोकांनी माझी आठवण पुढे बरेच दिवस काढली. एका अमेरिकन ‘मॉम’ ने माझ्या मुलाला लोकरीच्या धाग्यासदृश्य दिसणाऱ्या तांब्याच्या तारेने गुंडाळून स्वतः तयार केलेला मायक्रो ‘पांडा’ आणि एक छोटी ‘मधमाशी’ भेट केली. तीन मुलांना हसत खेळत सांभाळणारी अमेरिकन आई (मॉम) हस्तकलेत आणि मुलं सांभाळण्यात अतिशय कुशल दिसली. मला भारतीय पदार्थांविषयी चवीने सांगणाऱ्या एक अमेरिकन टिचरने देखील माझ्याकडून नवीन भारतीय पाककृती शिकण्याचं आश्वासन घेऊन माझा निरोप घेतला.

सामानाची लगेज मधून जमवाजमव करुन बाहेर येताच एका भारतीय व्यक्तीने चटकन हसत पुढे येऊन आमचे स्वागत केले. माझ्या नवऱ्याचा मित्र ‘स्वप्नील’ आम्हाला विमानतळावरून घेऊन जायला आलेला. चांगला तासभर आधी येऊन उभा राहिलेला आमच्यासाठी स्वतःची van घेऊन.

‘san francisco’ ते ‘फ्रीमोंट’ शहर, साधारण ४० मैलाचे अंतर आम्हाला पार करायचे होते. स्वच्छ रस्ते आणि सुव्यवस्थेने संपन्न अमेरिकेचे दर्शन मी काचेमधून एक टक  पाहत बसले....

She lived at the end of a little dirt road
In a house where secrets go untold
Barefoot in a cotton dress, dark hair in a tangled mess
And a head full of crazy dreams
She said

I'm going to California
A place where the sun always shines
I'm goin to California
And I'm leavin everything behind

You can't help, but feel a little bit touched
When your daddy loves you a little too much
You can wish on four leaf clovers, but all the fields have been plowed
over
And there's nothin left to do but fly away

I'm going to California
A place where the sun always shines
I'm goin to California
And I'm leavin everything behind

Stars burn like candles on that two-lane highway
She made her wish, and disappeared on her 18th birthday
And she said

I'm going to California
A place where the sun always shines
I'm goin to California
And I'm leavin everything behind

I'm goin to California
And I'm leavin everything behind

Oh California
I'm goin to California

असा कॅलिफोर्निया मला आत्ता दिसणार आहे....

अंतर बरंच असलं तरीही प्रवास कुठेच कंटाळवाणा नव्ह्ता. गाडी झपाझप आंतर कापत आम्हाला दूर घेऊन जात होती, जिथे माझं स्वप्नांचं घर माझी वाट पाहत होतं.   

बोलता बोलता हम रस्त्यावरून गाडी एका गल्लीमध्ये शिरली आणि एका प्रवेशद्वारापाशी येऊन उभी राहिली. क्षणार्धात ते प्रवेशद्वार बाजूला सरकलं आणि काही सेकंदातच ती एका घराजवळ येऊन थांबली.

आम्ही सर्व एका घरात शिरलो. लाकडी बिल्डींगमधल्या flat ला गर्द झाडीमुळे थोडा अंधार होता. बाकी आपल्या घरासारखेच वाटणारे काहीसे घर होते. कागदी पेल्यानं मधून पाणी घेऊन ‘सुलभा’ स्वागताला पुढे आली. काहीसं विचीत्र् वाटलं मला त्यामुळे पाणी पितांना. आपल्याकडे वाढदिवसांना वगैरे आपण थर्माकोलचे पेले वापरतो अन्यथा तो योग्य शिष्ठाचार समजत नाही. विचार करता-करताच समोर गरमा-गरम उपमा आला. तीन दिवसांनी मिळालेल्या घरच्या अन्नाची गोडी फार वेगळी लागली. डोळ्यात पाणी आले घरचे अन्न खाऊन माझ्या. स्वतःची कीव करावीशी वाटली खरे तर...

तीन दिवसांपासून धड काहीही झालं नव्ह्ता जीवाचं. शेवटी स्वतःच्या घरी गेल्यावरच जीवात जीव येणार हे साहजिकच होतं. आता माझी एकही क्षण थांबायची तयारी नव्हती. घरी बनवलेल्या, तीन दिवसांनी मिळालेल्या गरम चहाचे घोट घश्या खाली उतरवले आणि आमच्या घरी जायला निघालो.

सुलभाच्या घरापासून हाकेच्या अंतरावर गवतातून नागमोडी वाट माझ्या घराकडे जात होती. लाकडी जिन्याने तीन मजले चढून माझं घर होतं. शेजार-पाजार कुणीच नाही!

घराच्या आत दरवाज्या समोर अमेरिकन पद्धतीचे स्वयंपाक घर होते. बाजूला डायनिंग एरियामध्ये टेबलावर फळे व्यवस्थितपणे मांडलेली. स्वयंपाक घरातील भल्या मोठ्या फ्रीजमध्ये मोठा दुधाचा कॅन भरलेला होता. घर अगदी टापटीप दिसलं.

सुलभाने माझ्या स्वागताला सर्व सामग्री ह्यांच्या सांगण्याने आणून ठेवलेली.

रात्र होत चाललेली. तीन दिवसांचा आमचा लपंडाव तिला चांगलाच भोवलेला. रोज आमच्यासाठी जेवण बनवून ठेवायची ती, आणि रोज आमचं येणं पुढे जायचं...

“रात्री मस्तपैकी इंडिअन हॉटेल मध्ये जेऊया,” असं सांगून प्रेमाने आमचा निरोप घेऊन स्वप्नील-सुलभा आपल्या दोन बच्चे कंपनीला घेऊन गेले.

आमच्या ‘निनाद’ला खेळायला एक हक्काचा मित्र मिळालेला आणि मला काळजी घेणारी मैत्रीण. अजून काय पाहिजे होतं आम्हाला ह्या स्वातंत्र्यदेवतेच्या गावात.....

-मधु निमकर
(दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात २५/०८/२०१३)