“घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय
झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला.. “
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला.. “
पहाटेला नेहमीच्या वेळेला जाग आली मला..कॅलिफोर्नियातील पहिली
पहाट!!
ही अमेरिकेची पहाट पहा कशी ते....दरवाजाला बेल
नाही, दुधवाला नाही, पेपर पाहिजे तर सोसायटी बाहेर पैसे टाकून मशीन मधून तुम्ही
स्वतः विकत घेऊन जाऊ शकता. किवा एखाद्या
वृत्तपत्राला तीन ते सहा महिन्यांचे पैसे भरून दररोज घरी मागवू शकता.
घनकचर्याचे व्यवस्थापनही सोसायटीच्या ठराविक भागामध्ये केलेले. तुम्ही
स्वतः रोज कचरा नेऊन तिथे टाकायचा आणि वर त्याचे पैसे सुद्धा सोसायटी तुमच्याकडून
वसूल करणार.
सकाळ सकाळ एक चीटपाखरू देखील झाडावर नाही...त्यातचं
कुठून तरी मोटर चालवायचा मोठा आवाज आला. सोसायटीमध्ये मशिनच्या सहाय्याने गवत
कापणे तसेच मशीनने हवा घालून कचरा, झाडांचा पाला-पाचोळा गोळा करण्याचे काम दोन तीन मेक्सिकन माणसं
करतांना दिसली. कुणी एक माणूस घरासमोरील स्विमिंग पूल स्वच्छ करायचं काम करत होता.
एक दोन अमेरिकन बायका हातात गरम कॉफीचा मोठा ग्लास घेऊन ऑफिसला जायच्या घाईत स्वतःच्या
गाडीकडे जातांना दिसल्या. बसं हीच काय ती सकाळ!
तासाभरात गवत कापणार्याचा आवाज थांबला आणि
पूर्ण शांतता पसरली. लाकडी इमारत असल्याने घरात जोरजोरात उड्या मारणं, वेळीअवेळी
घरात जोराने गाणी लावणं ह्याला मज्जाव होता. आणि जर का कुणी ह्या नियमांचं पालन
केलं नाही तर ९११ हा अमेरिकन पोलिसांच्या हेल्प लाईनचा नंबर फिरवून नियम मोडणाऱ्या
माणसाला कुणीही पोलिसी खाक्या दाखवू शकत असे.
असो...! माझं प्रथम कर्तव्य आणि अधिकार, माझं
नवीन स्वयंपाकघर ताब्यात घेण्यासाठी अगदी मी तयारीतच होते. घरी काही भांडी ह्यांनी
आधीच walmart मधून आणून ठेवलेली. सर्व प्रथम मी पहिला चहा केला. इलेक्ट्रिकच्या
शेगडीवर अमेरिकन दुधाचा केलेला पहिला गरमागरम घरचा चहा!!
संध्याकाळी सुलाभाचा फोन आला. “स्वयंपाक घरातील
सामान घ्यायला जायचं आहे. तयार राहा...”
चार साडेचार मैलावर भारतीय माणसाला लागणाऱ्या
सर्व वस्तूंची उपलब्धी असलेल्या “भारत बाजार” नावाच्या एका मोठ्या इंडिअन स्टोर
मध्ये आम्ही सर्व गेलो. लोणची पापडापासून ते धूप-दिवाबत्ती पर्यंत, आणि इडली पात्रा
पासून खलबत्त्या पर्यंत, पोंडस पावडर पासून ते विको क्रीम पर्यत सर्व काही त्यात
उपलब्ध होते. ते सुद्धा भारतीय ब्रान्डसचेच.
दुकानाच्या मध्यभागी मोठीच्या मोठी
रेफ्रीजेरेटरची रांग होती. त्यात सर्व फ्रोजन पदार्थ ठेवलेले होते. रोज लागणाऱ्या
नभाजलेल्या रोटी, पराठे, रुमाली रोटी, इडली, डोसा, उपमा, रगडा pattice, विविध
प्रकारचे सामोसे....नाना विविध प्रकार होते आत. रेडी भाज्या सुद्धा फ्रीज मध्ये
तसेच कंपनीच्या ब्रांडखाली पाकीटा मधून उपलब्ध
होत्या. गरम म्हणून फक्त सामोसे उपलब्ध होते, आणि काही एक दोन मिठाया. एकट्याने
राहणाऱ्या नोकरदार, तसेच विदयार्थी वर्गासाठी खास करुन सोयीस्कर सर्व प्रकार तिथे
उपलब्ध होते.
ह्या शिवाय भाजीपाला, रेशन, खाऊ, डबाबंद
मिठाया, वगैरे सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध होते.
सुलभा मला म्हणाली,”आपला एक रुपया तो इथला एक
डॉलर...” डॉलर आणि रुपयाचा हिशोब पहिल्या दिवशी करायला खूप भारी वाटला. परंतु
लवकरच डॉलर आणि रुपयाच्या कात्रीमधून मी
स्वतःची सोडवणूक करुन घेतली.
घरी पोहोचल्यावर विकेन्डला तीन दिवसांच्या कॅम्पिंगला
जायचा सर्वांनी बेत आखला. आम्ही दोन कुटुंब आणि स्वप्नीलचे अजून एक मित्र आणि
त्यांचा परिवार..
...कॅलिफोर्निया विषयी बोलायचे झाले तर ते अमेरिकेच्या
पश्चिमेकडील प्रशांत महासागराच्या किनाऱ्याला स्थित अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या
असलेलं राज्य आहे. अमेरिकेच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ५० शहरांपैकी ८ शहरे
कॅलिफोर्निया राज्यात मोडतात. ‘साक्रामेंटो’
ही कॅलिफोर्नियाची राजधानी!
भौगोलीक माहितीप्रमाणे कॅलिफोर्नियाच्या
पश्चिमेला ‘प्रशांत महासागर’, दक्षिणेला
‘मेक्सिकोचे
बाहा कॅलिफोर्निया’ हे राज्य, उत्तरेला
‘ओरेगॉन’
तर पूर्वेला ‘नेव्हाडा’
व ‘अॅरिझोना’
ही राज्ये येतात.
१९व्या शतकाच्या मध्यापर्यंत कॅलिफोर्निया हा
मेक्सिकोचा भाग होता. १८४६-१८४८
दरम्यान झालेल्या मेक्सिकन-अमेरिकन युद्धानंतर हे राज्य
अमेरिकेकडे सुपूर्त करण्यात आले व ते ९
सप्टेंबर १८५० रोजी अमेरिकन संघात विलिन करून घेण्यात आले. ह्याच
काळात कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या
खाणींचा शोध लागला. अमेरिकेच्या इतर भागातून व
सर्व जगभरातून स्थलांतर करणार्या लोकांचे लोंढे येथे येऊ लागले.
माझ्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका पुण्याच्या मराठी
मैत्रिणीच्या आजीला अमेरिकेत काही सोने सापडले होते. त्यात तिने तिथे ११ घरे विकत
घेतली, आणि त्याच्या भाड्यात ती ऐशारामात जगली..
‘लॉस
एंजेल्स’ ह्या कॅलिफोर्नियाच्या महानगरीतच ‘हॉलिवूड’
सिनेसृष्टी आहे. तसेच कॅलिफोर्नियाचे नैसर्गिक सौंदर्यही जगाच्या कानाकोपर्यातील पर्यटकांचे आकर्षण बनलेले
आहे . वसंतात येथील झाडांना जणू पाने येतंच नाहीत. थेट फुलेच येतत जणू!
रस्त्याच्या कडेला वाढणारे गवत म्हणजे सुद्धा बगीचेच..
जगप्रसिध्द सिलिकॉन व्हॅलीमधील तंत्रज्ञान
उद्योगांमुळे आज कित्येक भारतीय संगणक अभियंते तिथे वर्षानुवर्षे
स्थायिक आहेत. आणि ते देखील खास करुन दक्षिणात्य आणि मराठी! भारतीयान बरोबर चीनी
लोकही बऱ्यापैकी स्थायिक म्हटले पाहिजेत इथे. आणि कामगार वर्गात विशेषतः मेक्सिकन.
आज कॅलिफोर्नियाने अमेरिकन अर्थव्यवस्थेतील १३ टक्के वाटा उचलला आहे. त्याचे जीडीपी $१.८१२ सहस्त्रअब्ज इतका समजला जातो.
प्रगती प्रमाणे तुलानात्माक महाग सुद्धा आहे हे शहर. खास करुन जागांचे आणि काही प्रमाणात वस्तूंचे भाव.
इथले वैशिष्ट्य म्हणजे शहराचे सुशोभीकरण...प्रत्येक
ऋतू प्रमाणे
इथे सुशोभीकरणासाठी फुलांची झुडपे बदलली जातात. त्यामुळे असा कुठलाही ऋतू नाही
ज्यात तुम्हाला येथील वास्तू फुलझाडांनी सुशोभित दिसणार नाहीत. आणि ही गोष्ट फक्त
कॅलिफोर्नियामध्येच नाही तर संपूर्ण अमेरिकेतच दिसून येते. स्वच्छ मोकळी प्रदूषण
रहित हवा, नीटनेटकेपणा, मोकळे रस्ते, ह्यामुळे तिथे राहण्याचा मोह आवरत नाही.
-मधु निमकर
(दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ:
स्वातंत्र्यदेवतेच्या गावात ०८-०९-२०१३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा