रविवार, १ सप्टेंबर, २०१३

भारतीय महिलांची गोष्टं

अमेरिकेत वास्तव्याला असतां सुट्टीमध्ये विश्रांतीसाठी काही दिवस आम्ही “कि वेस्ट” बेटावर गेलेलो. समुद्रकिनार्यावर एके संध्याकाळी फेरफटका मारत होतो....माणसाच्या गर्दीने पूर्ण किनारा भरून गेलेला...बरेच बहुरूपी कलाकार आपल्या विविध कलांचं प्रदर्शन मांडून होते, डॉलरचे गल्ले जमवत होते...अगदी ‘कुंभ का मेला’चं म्हणाना....त्या सर्वांमध्ये एक-दोन चित्रकार लोकांची चित्रे काढण्यात मश्गुल होते...एक कार्टूनिस्ट कोपऱ्यात, गर्दीत लोकांची कार्टून काढतं बसलेला आम्हाला दिसला. भारतात असतांना कधी संधी आली नाही कार्टून काढून घ्यायची म्हणून उत्सुकते पोटी एक कार्टून काढून घ्यायचं ठरवलं आम्ही दोघांनी.
भारतीय जोडपं बघून तो खुश झाला. भारतीय लोकांविषयी एक मोठी आपुलकी दिसली त्याच्या मध्ये....इथलं जेवण, प्रदेश याविषयी तो आमच्याशी भरपूर बोलला. आमचं चित्र काढताना त्याने भारतातल्या बायकांची आठवण काढली. डोळे मिचकावून म्हणाला...”आय स्टील मिस इंडिअन ब्यूटी”.
खरोखर ब्युटी म्हटलं की जगभरात पहिला नाव भारतीय स्त्रीचं येतं.

अनेकविध पुरातन कलाकृतींचा, साहित्याचा अभ्यास केला, तर ती खास करुन स्त्री सौंदर्यामुळे परिपूर्ण झालेली आढळतात. “शरीराचे काहीही प्रदर्शन न करता आपल्या सात्विकतेने पूर्ण जगाला मोहिनी घालणारी म्हणजे भारतीय स्त्री.”

स्त्रीला जगातील सर्वात सुंदर उपमा दिली तरीही लोकांना ती का नको असते असा मग प्रश्न पडतो.

स्त्री गर्भाची हत्या ही भारतातील आजही सर्वात मोठी समस्या समजली जाते. काही जातीमध्ये हुंडा द्यावा लागेल म्हणून स्त्री गर्भाची चाहूल लागताच गर्भपात घडतात. नाही तर कोणती दादी-अम्मा नवजात तान्ह्या बालिकेला घराच्या एखाद्या कोपऱ्यात नेऊन काही तरी घरगुती औषध देऊन किवा प्रसंगी गळा दाबून, श्वास कोंडून मारून टाकते. सर्वांना माहित असतात त्यांचे गुन्हे परंतु ते त्याला ‘गुन्हा’ समजत नाहीत. हुंडाबळी, शोषण हे सुद्धा स्त्रिया अजूनही निमुटपणे माहेरच्यांना त्रास नको म्हणून सहन करतात.

जुन्या काळात किती तरी फिल्मी कलाकारांच्या कथांमधून लहान लहान मुली परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी स्वतःचे आयुष्य झोकून दिलेल्या कहाण्या आहेत आणि आजही ती परिस्थिती बदललेली नाही.

स्त्रीच्या प्रत्येक त्यागाला एक प्रामाणिकपणाची  झालर लाभलेली आहे. किती ही झालं तरी ती आपली कर्तव्य टाकून कधी गेली नाही. “आधी परीवाराच भलं, मग झालच तर आपला विचार”...हा तिच्यातील जन्मजात गुण समजला जातो.

समाजात उत्क्रांती झाली परंतु एक भारतीय स्त्री ही कायम भारतीय स्त्रीच राहिली आणि त्यातच आपली संस्कृती दिसते.

जगात सर्वात जास्त प्रेम देते ती मुलगी, जो पर्यंत वडिलांच्या घरी असते तोपर्यंत ती त्यांची आणि घरातल्या सर्वांची सेवासुश्रुषा करते, पडेल तितकी कामं करते, मिळेल त्या परीस्थित राहते.

मला नेहमी वाटतं ज्यांच्याकडे मुली ते खरे धनवान....नशीबवान लोकांकडे, कदाचित पूर्वपुण्याईने अश्यामुली घरात जन्माला येतात.

मुली आई वडिलांचं आयुष्य समृध्द करतात...कित्येक लोक मी लहान असतांना मुलीला मराठी माध्यमात व मुलाला इंग्रजी माध्यमात शिकवतांना मी पाहिलेलं आहे...अगदी सधन कुटुंबीय सुद्धा त्यात कधी कमी पडलेले नाहीत.

आजही भारतातील काही जमातींमध्ये नोकर ठेवायचा नाही, घरची सर्व कामं घरची स्त्री किवा तिला जमलं नाही तर मुलगी करते.

माझ्या एका मैत्रिणीच्या आईवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्याकडे घरकाम करायला नोकर वगैरे ठेवणं पसंत नाही...म्हणते तशी त्यांच्या जातीमध्ये पद्धतच नाही आहे. दोन-तीन महिने आई घरात बघू शकणार नाही म्हणून हिने आपली नोकरी सोडली, ते सुद्धा फक्त घरात लादी-कटखा करण्यासाठी. अभ्यासात सामान्य असेल तरी खूप शिकायची तिची इच्छा आहे. नुकतच कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आहे तिचं. घरच्यांनी तिच्यासाठी एक मुलगा सुद्धा बघून ठेवला आहे लग्नाला...बस्स, एक दिवस ती आपल्या घरी जाईल आणि जे इथे करते ते तिथे करेल.

बरेचदा स्वतःचे मुलगे लग्नाचे झाले तरीही बायका घरची सूनच राहतात हे हास्यास्पद नाही का? तिला घरातील विशेष स्थान कधी मिळत नाही....अगदी पन्नाशीला आल्या तरी सर्व व्यवस्था असून देखील सासूची परवानगी माहेरच्या समारंभांना जाण्यासाठी मिळत नाही. सुनांकडून सेवा सुश्रुषा उगाचचं करुन घेतली जाते.

टीव्हीवर “क्युकी सास भी कभी बहु थी”...सारख्या पारंपारिक मालिकांना प्रसिद्धीचं खतपाणी देतं कोण? आपल्या सारखीचं सर्व सामान्य माणसं नाही का? का नाही रजनी सारख्या मालिका रोज रोज बनत...लोकांना आवडते ते लोकांना देणं हेचं त्या मागचं कारण असणार....

स्त्रियांनी पुरुषांना तोंड दाखवायचं नाही, चेहरा पदराने किवा बुरख्याने झाकून ठेवावा, ह्या परंपरा जगातून कालबाह्य व्हायला अजून बराचं अवकाश आहे.

दिल्लीमधील अमानुष बलात्कार प्रकरणानंतर सामान्य लोक चांगलेचं बिथरलेत. तेव्हापासून संध्याकाळी कधी बाहेर गेली तर रिक्क्षावाले घरी पोहोचवायला नेहमी मदतीला तयार असतात. अश्यावेळी कुठलीही कुरबुर त्यांनी परिवारासोबत असेन तरीही केलेली नाही. अगदी दुसर्या दिशेला परत जाणाऱ्या रिक्षा सुद्धा त्याला अपवाद नाहीत.

दिल्लीतील त्या माणुसकीला काळिमा लावणाऱ्या घटनेचा निषेध सर्वांनी पाळला. कित्ती तरी लोक त्यातून अजून सावरलेले सुद्धा नाही आहेत..फेस बुक वर काळे चेहरे करुन अजूनही त्यांचा निषेध ते दर्शवतात....स्त्रियांना स्वसंरक्षणासाठी खास उपयोजना, मार्ग, हेल्पलाईन्स, घरी पोहोचवण्यासाठी खास महिला वाहनचालक असलेल्या सार्वजनिक वाहनांची व्यवस्था, संरक्षक प्रगत करण्यात आले.

त्या घटने नंतर दररोज पेपर उघडला कि पाहिली बातमी नजरेस अजूनही पडते ती एक नव्या बलात्काराची....वाचून मनं चर्र होतं.  

मग ह्या समाजात स्त्री ही सुरक्षित कशी म्हणता येईल? शरीराच्या जखमा काळाने भरून येतील पण मनावरच्या जखमांना कोणते औषध द्यायला पाहिजे? त्या भरून यायला कित्येक वर्षं लागतील. कुणी जखमी होऊन मरेल, तर कुणी जखमा घेऊन जगेल.

भारतीय स्त्रियांची बोल्ड प्रतिमा तुम्हाला फक्त फिल्मी पडद्यावरच पाहायला मिळते...आणि रिअल लाइफ मध्ये तीच स्त्री एक सामान्य स्त्री प्रमाणे जगतांना दिसते आपल्याला. त्याच व्यथा नी तोच त्रास.

माझ्याकडे काही वर्षांपूर्वी एक कामवाली होती...एकही अक्षर नवराबायको शिकलेली नाही....हीच बायको पाहिजे म्हणून मुंबईच्या मुलाने गावच्या शोभाच्या घरच्यांकडे हट्टच धरला...लग्नला परिस्तिथी नाही म्हणून सासू-सासर्यांना गुपचूप पैसे सुद्धा देऊ केले...लग्ननंतर शोभा गावी बाळंतपणासाठी ७ महिने राहिली...मुंबईला परत आली तोःपर्यंत नवरा दुसरीशी लग्न सुद्धा करुन मोकळा झालेला....नवर्या जवळ कित्येईक वर्षं बोलणं टाकलं तिने....नवरा मध्येच तरीही भेटायला यायचा तिला, परंतु पैशांची मदत वगैरे काहीही नाही....तिला तीन मुलं झाली नवऱ्यापासून आणि वर त्याच्या आईचा सुद्धा भार ती मुली प्रमाणे सांभाळते आहे....विचारले तर म्हणायची “मी नाही तर कोण सांभाळणार तिला”...एकुलता एक मुलगा होता तो...दुसर्या बायकोला दोन आणि हिची तीन असा सुखी परिवार आहे आता त्यांचा...आज पर्यंत तिच्या डोळ्यात मी कधी पाणी बघितलेलं नाही, कधी घरच्या समस्यांचा गवगवा करुन सहानुभूती सुद्धा तिने मिळवली नाही.

आज फेसबुकवरची आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवटही एखाद्या गोड मुलीच्या फोटोनेच होतो. त्यांना आयुष्यात हसायला फुलायला मदत करा...देवाने माणसाला दिलेली ती देणगी आहे, तिला फुलायला तुमच्या कुंपणाची आणि आधाराची कदाचित गरज आहे.

-मधु निमकर
(दै. कृषीवल, दि. ८ मार्च २०१३, महिला दिनानिमित्त प्रकाशित)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा