गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

मायेची आस


घरातून निघतांना आईचा निरोप घेतला. तिला एकटीला ठेऊन जाते असं तिने मला जाणवून दिलं नाही अजिबात, आणि मला तिने आश्वासन दिलं,”मी सर्व सांभाळेन, घराची काळजी करू नकोस” म्हणून! सासरच्यांनी सुद्धा आम्ही आहोत बघायला म्हणून धीर दिला. ह्यांचे काका, मामा, मावशी वगैरे सर्वांनी मला खास निरोप दिला निघायच्या आधी.

घरातील देवाचे आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन घराबाहेर पाऊल ठेवले...

सासरची सर्व मंडळी आमच्या बरोबर विमानतळावर यायला निघाली. कसे तरी दोन घास घरचे पोटात घालून, सामानाच्या सुटकेसा घेतल्या आणि आम्ही विमानतळावर निघालो.

अमेरिका कशी असेल ह्याचे राहून-राहून अप्रूप मनाला वाटत राहिलेलं...बस्स! विमानतळाकडे निघाल्यावर ते सर्व विचार तिथेच थांबले..!

पहिल्यांदाच  विमानतळावर जाण्याची वेळ होती माझी आणि मुलाची...“सर्व व्यवस्थित पार पडे पर्यंत जीवात जीव येणार नाही…” मी मनात स्वतःला समजावत होते.

सर्व काही वरच्याच्या हवाली करुन निघालेली मी. आता काय होईल ते बघू.....

दोनही taxies नी विमानतळ क्षणार्धात गाठले. रात्रीची वेळ असल्याने रस्त्याला वाहतूक ही कमीच होती. इथे रात्री बसून दिवसा अमेरिका गाठायचा विचार होता आमचा!

विमानाचा पहिला प्रवास असला तरीही उत्सुकतेपेक्षा वेगळंच काहीसं वाटत होतं. काहीसं अजीब...

आदल्या दिवशी बाजूच्या काकीनी घरी बोलावल होतं मला. त्यांची सून आणि मुलगा दोघे ‘एयर इंडिया’ मध्ये नोकरीला होती. प्रवासात काही अडचणी येऊ नयेत म्हणून मुद्दाम त्यांनी मला घरी बोलवून घेतलं होतं त्या दोघांशी बोलणी करण्यासाठी.

काकींचा मुलगा मोठ्या हुद्यावर असल्याने त्याने आम्हाला तिकिटं अपग्रेड करुन दिली. ‘जर्मनी’ पर्यंतच्या प्रवासाची त्याने उत्तम व्यवस्था करुन दिली आमची.

मायेची अशी कित्येक नाती मागे टाकून मी निघालेली आज....मन एकदम सुन्न झालेलं माझं...बसं!! काय होत होतं ते सर्व माझ्यासाठी नवीन होतं..

विमानतळाच्या आत शिरल्यावर सामानाचा ताबा घेऊन आम्हा तिघांनाच पुढे निघायचं होतं. सासूबाई आनंदित असलेल्या दाखवीत होत्या परंतु पुढे गेल्यावर काचेतून बाहेर मी बघितलं. आमचा निरोप घेतल्यावर त्या एका जागी गप्प बसलेल्या. मुलावरच्या प्रेमाबरोबरच माझ्या वर सुद्धा त्यांचं प्रेम आहे हे मी जाणून होते.

लग्नात आई वडिलांनी त्यांना केलेलं माझं कन्यादान मी कधीच विसरू शकणार नाही...मुलगी नाही, परंतु मुलीप्रमाणेच त्यांनी माझा सांभाळ केलेला. प्रसंगी माझ्यावरच त्यांचा जीव जास्त आहे असं मला राहून राहून जाणवायचं...कधी कुचकी बोलणी नाही का काही भांडण नाही. लाड नाहीत विशेष, पण त्यांच्या प्रेमाची पद्धतच काहीशी वेगळी होती. काहीश्या कडक शिस्तीच्या म्हणून भीडदास्त होती त्यांची बाकी कुटुंबियांमध्ये. वागण्यात दिखावेबाजपणा असा काहीच नव्ह्ता. ‘माणसाला समजून घेणं म्हणजे नेमकं काय?’, ते मी त्यांच्याकडूनच शिकले.

कधीतरी मूड मध्ये असाच्या तेव्हा म्हणायच्या देखील मला....”मला भीती होती माझ्या सारखी स्वच्छ आणि नीट-नेटकी सून मिळेल का नाही....”असं म्हणून हसायच्या पटकन. कधी पटकन आठवून सांगायच्या “आज तू अमुक एक पदार्थ करतेस तो  कर पाहू...मी सर्व समान आणलेलं आहे घरी. मी येते मदत करायला.”

गणपतीमध्ये तर माझं खास काम असायचं; त्यांनी सांगितलेल्या मेनुने घरच्यांना खुश करायचं...खवय्ये म्हणून प्रसिद्धी असलेल्या परिवारात माझ्या पाककलेला खास राखीव स्थान असायचं आणि मागील वर्षी मी काय करुन वाढलं असेल ते पुढील वर्षी सुद्धा मंडळी विसरलेली नसायची.

स्वयंपाक्याची ऐन वेळी फजिती उडवायला घरातील तरुण मंडळी अगदी तयारीतच असायची. परंतु खोड्या फक्त मी सोडून बनवलेल्या पदार्थांच्याचं केल्या जायच्या. खोड्या म्हणजे ‘जो पदार्थ भरपूर बनवलेला असेल तो कमी घ्यायचा आणि जो कमी आहे असा अंदाज आला कि तो मुद्दाम फस्त करुन टाकायचा नी मग हसून म्हणायचं तुम्ही कमी केलात’...एक वेगळीच गम्मत होती त्या सर्वात...मग काय जेवायला पंचपक्वान्न करुन सुद्धा गोडी असायची ती ह्या मंडळींच्या थट्टा मास्कारींचीच...

मनात आलं, घरी समारंभांना येणारी माणसं माझ्या विषयी त्यांना विचारून विचारून हैराण करतील. साखरपुड्याच्या दिवसापासून त्यांच्या (सासूबाईच्या) मैत्रिणी सुद्धा (सर्व वयाच्या मैत्रिणी) माझ्या खास दोस्त बनलेल्या. त्यांना मी घरी पाऊल ठेवल्यावर समोर हवीच असायची. त्यामुळे सर्वात मोठी कसोटी आमचा निरोप घेतांना त्यांचीचं होती. उगाचच नाती जुळून येत नाहीत जगात!

निरोप घेतांना आमच्या दोघींच्या डोळ्यात पाणी आलेलं आम्ही लपवू शकलो नाही.

पुढील काही वर्षं सणवार मला रिकामेपणाने खायला उठणार हे कुणी सांगायची गरज नव्हती.

“मला तुम्हा सर्वांची खूप खूप आठवण येईल...” असं माझं मन त्यांना मुक्याने सांगत होतं.

जगातली कुठलीही धनदौलत हे प्रेम विकत घेऊ शकत नाही....त्या प्रेमाला मी काही काळ का होईना पारखी होणार होते.

सैरभैर झालेल्या मनाला आवर घातला....समोर एका मागून एक तपासणीचे, माहितीचे डेस्क्स येत होते.

आता मागचा विचार करण्यासारखी परिस्थिती नव्हती. लोक काही ना काही तपासायला मागत होते आणि हे त्यांना काय हवे नको ते कागद काढून दाखवत होते.

एक असच काऊनटर आलं आणि मी भानावर आले. ह्यांनी माझ्याकडे असतील नसतील ते सर्व पाकिटातील पैसे मागितले. ह्यांना काय बोलायचं आहे ते मला समजलंच नाही आधी. ‘मनी एक्सचेज’ करण्यासाठी हे माझ्याकडील पैसे मागत होते.

मला म्हणाले,”जवळ पैसे ठेऊ नकोस, त्याचा तिथे उपयोग होणार नाही आहे.”

समजायला लागल्यापासून पाकिटात पैसे असल्याशिवाय कधी दिवस गेला नसेल माझा...ह्यांच्या नकळत एक-दोन नोटा आणि काही पैसे मी सांभाळून ठेवले माझ्याकडे. शेवटी लक्षुमीचं ती माझ्यासाठी....परदेशातील न बघितलेल्या डॉलर ला तिची सर कशी काय येणार होती?

एवढ्यात ह्यांना सासर्यांचा फोन आला, सर्व सुखरूप पार पडत आहे ना? आम्हाला तुम्ही दिसत नाहीत. आम्ही निघतो म्हणून.

मंडळी घरी परत निघाली आणि आम्ही तिघे एका दीर्घ प्रवासावर... दूर देशाच्या, सातासमुद्रापलीकडील ‘अमेरिका’ नावाच्या नवीन देशात आपलं नशीब आजमावायला!

--मधु निमकर
(दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात १४/०७/२०१३)

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा