खरं तर विमानाचा १७-१८ तासांचा प्रवास...भारत अमेरिकेतील बारा तासांची
तफावत भरून काढायला ह्यांना पूर्ण एक दिवस झोपणे आवश्यक होते, परंतु मोजके तास
झोपून लवकरच ह्यांनी भारतीय वेळेला सांभाळून घेतले.
दोन दिवसांनी सासूबाईनी आम्हाला घरी जेवायला बोलावलं....ह्यांच्या
आवडीच्या पदार्थांमध्ये बटाटे वडे आणि आईस्क्रीम ह्यांच्या स्थानाला कधीच धोका
आलेला नाही, आणि त्याबरोबर दुय्यम स्थान सुद्धा ठरलेलं असतं, ते म्हणजे मुलांच्या
आवडीचा रस्सा, आणि सासर्यांच्या आवडीची फ्लोवरची भाजी आणि काकडीची कोशिंबीर....मेनू
जरी सरप्राईज नसेल तरीही प्रत्येक वेळा त्याची चव मात्र अद्वितीय असते....घरात
सुगरण म्हणून प्रसिध्द असलेल्या सासूबाई पाहुणचारात सर्वांना मागेचं टाकतील!
सुट्टीचा वार म्हणून पुण्याहून दीर सुद्धा आलेला. बरोबर पसंत
पडलेल्या मुलीचा फोटो सुद्धा आणलेला त्याने. आवडीचे जेवण आणि चवीला गप्पा....मेनू
छानच रंगलेला!
दिराने मला तिचा फोटो दाखवला आणि मी खुष झाले. फोटो काहीसा
जुना होता. मला तो म्हणाला” फोटो सारखी दिसत नाही ती, थोडी वेगळी दिसते”...मी
म्हटले, “फोटो छानच आहे, करुन टाक लग्न...”
मुलगी एम कॉम शिकलेली, वर पुण्याचीच...सर्व छानपैकी जुळून
आलेलं.
सासू-सासरे सुद्धा आनंदी दिसले मला. मुलांच्या लग्नाची
सासरच्यांना किती घाई असते ते फक्त मुला कडच्यानाच माहित...!
शुक्रवारी मुलीला बघायचा औपचारिक कार्यक्रम ठरला!
ठरलेल्या दिवशी दोन्ही बाजूंची मंडळी मुलगा-मुलगी बघायची
माझ्या सासरी जमली. मुलीचे नातेवाईक मुंबईचेचं असल्याने त्यांना सुद्धा यायला
सोयीचे ठरलेले.
सर्व साधारणपणे सर्व काही जमलेलं असेल तर लग्नाचा योग
लगेचंच जुळून येतो. पत्रिका वगैरे सर्व बघून झालेलं...एक छोटी बैठक सुद्धा आधीचं
घेऊन झालेली पुण्याला असं समजलं!
ठरल्या वेळेला मुलीकडील मंडळी आली. पंजाबी ड्रेसमध्ये आलेली
मुलगी आणि तिच्या बरोबर तिच्या दोन बहिणी व त्यांचे पती...आई, भाऊ वगैरे माणसंसुद्धा
बरोबर आलेली. समवयस्क बहिणींमध्ये मुलगी शोधायला कठीण गेले मला.
कांदे पोहे आणि चहा घेऊन सासूबाईंनी मला पुढे पाठवले, आणि कौतुकाने
सर्वांना माझी ओळख करुन दिली...“ही माझी मोठी सून...”
सर्वांच्या औपचारिक गप्पा रंगल्या. मुलीकडच्या लोकांची नजर
माझ्यावर होतीचं.
मुलगी दाखवणं हा विषय कुणी काढला कि पहिली माझी वधूपरीक्षा
आठवते मला.....!
लग्न नंतर मला हे नेहमी म्हणायचे “आम्ही मुद्दाम लहान मुलगी
बघत होतो. आज्ञेत राहील म्हणून”....काय भन्नाट कल्पना आहे कि नाही?
माझ्याकडील आई-वडील, बहिण, मावशी आणि परिवार आणि ह्यांच्या
कडील काका, आई-वडिल परिवार वगैरे जवळपास अकरा एक ह्यांचीचं माणसं....
एकूण एवढी माणसं मला बघायला जमलेली कि मला अगदी अवघडल्या
सारखं झालेलं. मला वाटलं मुलगा-मुलगी बघायला चार-दोन मोजकी माणसं असतील. पहिली वेळ
बघायची आणि पाहिलं स्थळ होतं माझ....पत्रिका सुद्धा चांगली तेहतीस गुणांनी जमलेली.
ह्यांच्या चुलत बहिणींपैकी एकीने मला लगेचंच ओळखलं. शाळेत
माझ्या पुढच्या इयत्तेत शिकत होती ती लहानपणी!
दुसरी बहिण थोडी मोठी होती आमच्यापेक्षा...
सर्वांच्या माझ्यावर रोखलेल्या नजरा पाहून मी अस्वस्थ होते.
एकमेकाविषयी पूर्ण माहिती कुटुंबीयांनी आधी काढून खात्री केलेली होतीच...मग थोडे
प्रश्न मला विचारल्यावर आम्ही घर बघायला उठलो जागे वरून..
मी उभी राहिल्या बरोबर खोली मधल्या सर्व माणसांनी जागा
बदलल्या. प्रत्येकाची उभा राहायची किवा बसायची दिशा समोरच्या यायच्या जायच्या
दिशेला. पुन्हा बाहेर आल्यावर पुन्हा तेच...
आख्खी रांग ह्या सोफ्यवरून त्या सोफ्यावर बसली. हे असा दोन
तीन वेळा चालू होतं. ते देखील पापणी लवावी इतक्या तेजीने. ते पाहून धक्काच बसला
मला...”हे काय चालू आहे ह्याचं?” मी मनात म्हणाले...
आतल्या खोल्या बघतांना हे आजूबाजूला घुटमळून बायको म्हणून
त्यांना शोभेल का नाही ह्याचा अंदाज लावत असतांना मला दिसले. मग अचानक बाजूला येऊन
खांद्याला माझी उंची किती पोहोचते हे सुद्धा थांबून बघितले...अजूनच अवघडले मी आणि
पटकन बाहेरच्या खोली मध्ये जायला निघाले. हे सर्व कशाला बघायचं आधी पासून अस
सुद्धा वाटत होतं.
वाटेतच ह्यांची छोटी चुलत बहिण माझ्या कानात कुजबुजली ...” तू
पसंत आहेस आम्हाला, मी बघते काय ते...होकार येईल चिंता करू नकोस...” दोन तीन वेळा
तिने मला थांबवून सांगितलं पण ती काय बोलते आहे ह्याकडे माझा लक्षच नव्हतं! काही
समजेना मला...बाहेर बसलेली मोठी चुलत बहिण अजूनही प्रश्नांमध्ये गुंतलेली दिसली...माझा
इतिहास सनावळ्या घेऊन कुठे तरी आधीच पळून गेलेला सर्व प्रकारांत.
आता प्रश्न विचारायची वेळ आमच्याकडच्यांची होती. मला बाजूला
घेऊन सासू बाई हळूच कानात कुजबुजल्या तुला साधं जेवण बनवायला येतं ना? “मनात
म्हटलं उत्तम स्वयंपाकी आहे मी...कशात कमी पडणार नाही....” पण काही केल्या
तोंडातून शब्द फुटेना माझ्या. दोन तीन वेळा विचारून त्यांनी खात्री करुन घेताना मी
नुसती मान डोलावली होकारार्थी....
ह्यांच्या आणि माझ्या आवडीनिवडीत भरपूर साधर्म्य ऐकून
सर्वात जास्त हेच खुश झालेले. झाडांची आवड ऐकून सासरे जोराने म्हणालेच...”माझे काम
वाचले!”
“बराच वेळ थांबलोय, किती वेळ बसणार इथे आपण...चला निघूया
एकदाचं!” मी मनात म्हणत होते...चेहरा बघावा तर अक्षरशः रडकुंडीला आलेला...
लग्नानंतर एक
जाडजूड फाईल सासर्यांनी मला काढून दाखवली..ह्यांना सांगून आलेल्या
मुलींची...माझ्या मावशीने मात्र मला सांगितलेलं, आपल्या घरात सर्वांची लग्न
पहिल्याच वधू-वर परीक्षेत निश्चित झालेली आहेत.
असो!...प्रत्येकाची कहाणी वेगळी म्हणत मुलगी बघायला आतुर
झाले मी....
...दोघांच्या होकारानंतर औपचारिक बैठक झाली आणि साखरपुडा
आणि लग्नाची बोलणी चालू झाली.
मुलीकडच्यांनी मिठाई देऊन तोंड गोड केलं.
लग्न लवकरात लवकर व्हावं अशी मुलीकड्च्यांची सुद्धा इच्छा
होती. मुलीला वडील नव्हते. भाऊ एक दीड महीन्यात युरोपला कामानिमित्त स्थायिक होणार
होता. त्यामुळे मुलीकडील जवाबदारी वाढली.
साखरपुडा पंधरा दिवसांनी करायचं ठरलं आणि लगेच दीड महिन्यात
मुंबईला लग्न...
आम्ही अमेरिकेला आठवड्याभरातच निघणार होतो...आम्हाला
साखरपुडा अथवा लग्न काहीचं मिळणे शक्य नव्हतं...
दोन दिवसांनी दिरांना मी तिला घेऊन घरी बोलावलं. तेवढीच
थोडीफार ओळख म्हणून तरी जायच्या आधी. माझी आठवण म्हणून एक छोटीशी भेटवस्तू दिली मी
तिला.
काका-काकीने आणलेल्या आवडत्या खाऊवर मुलगा जाम खुश झाला.
माझा दीर वयाने माझ्या पेक्षा चार महिन्याने मोठा...दीर,
मुलगा, मित्र सर्व काही मी त्याच्यात बघितले, पण त्याचं लग्न बघू शकले नाही ही खंत
माझ्या मनाला कायम राहिली.
एक सून दूर जाणार होती आणि तेव्हाच दुसरी येणार होती....दोघींच्या
नव्या आयुष्याची सुरुवात...पुन्हा एकदा नव्याने!!
-मधु निमकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा