गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

सुरुवात चांगली तर, शेवट गोडच!


 

नोकरीला राजीनामा दिल्यापासून लोकांना माझी जास्तच आठवण येते असा मला दिसत होतं. त्यात परदेशात जाणार म्हणून कधी विशेष न बोलणार्यांनी सुद्धा जायच्या क्षणापर्यंत मनापासून सोबत केली. नित्यनियमाने सर्वांचे फोने यायला लागले. दिवस ठरवून एक-एकीला भेट देणे चालू होते. प्रत्येकीकडून निरोप घेताना मनातल्या मनात एकच विचार येत होता...”कल हो न हो...न जाणो पुन्हा कधी भेटू...पुढच्या भेटी पर्यंत जिवंत राहू देखील किवा नाही.” नानाविविध विचार मनात घोटाळत होते आणि मी त्या सर्वांना मनातल्या मनात समजवत होते...”ये जीवन हे... ये जीवन हे”

निघायच्या आधी नवर्याने आवर्जून सांगितलेलं आता तरी एक्सपीरीयंस सर्टिफिकेट नोकरीवरून घेऊन ये...नोकरी सोडल्यामुळे चिडलेले बॉस दाम्पत्य मला काहीही केल्या ते देत नव्हते. बहाणे करुन नी खोट्या सबबी सांगून त्यांनी ते द्यायचं नाही हेच ठरवलेलं. एक दिवस डिरेक्टर ला विचारलं तर त्याने सांगितलं “कशाला पाहिजे तुला ते, दुसरी कडे नोकरी करायला का?” मी म्हटलं “माझ्या स्वतः साठी पाहिजे...” मग म्हणाला माझी बायको बाळंतपणाला गेली आहे, ती पुन्हा आली कि ती स्वतःच देईल तुला. (आज पर्यंत ती बाळंतपणावरून परत आली नाही...) माझा नवरा म्हणाला कि देतील ते तुला सर्टिफिकेट, पण आज सुद्धा त्यांचे बहाणे संपत नाहीत. जणू सर्टिफिकेट नाही माझ्या भविष्याची किल्लीच त्यांना सापडली आहे. असे सुद्धा मी अमेरिकेला काही नोकरी करणं शक्य नव्हते, कारण माझ्या विसावर त्याची परवानगी नव्हती. त्यातून खरं सांगायचं तर मलाच जाणवत होतं कि माझी कमी त्यांच्याकडे अजून देखील भरून आलेली नाही. “वो भी क्या याद करेंगे”...

देवाने माणसाला जन्माला घातलं, त्याच्यात भावना निर्माण केल्या, त्यातून समाजाची निर्मिती झाली. कधी दोस्तांचे दुश्मन झाले आणि कधी दुश्मन समजत असलेल्यांनी दोस्तीचे सर्व निकष सीमेपार नेऊन माणुसकी आणि प्रेमाचा बिंदू गाठला.  खरे तर नोकरीवरचे सर्वच मेनेजमेट ला त्रस्त होऊन एक तर नोकरी सोडून गेलेले किंवा सोडायचा बहाणा शोधत होते. म्हणून एकाच वेळी नोकरीवर रुजू झालेल्यां आमच्या सर्वांमध्ये आपुलकी, जिव्हाळा निर्माण झालेला. नोकरीवर असतांना मला कधी समजू न शकलेली मुलगी जणू देवदुतासारखी माझ्यासाठी भक्कम आधार बनली. इतकी कि आजपर्यंत मैत्रीमध्ये तिने कधी खंड पडू दिलेला नाही.

लग्न होऊन सासरी आले ते सोप्पे वाटले तेव्हा....आज जणू भारत नाही मी हे जगच सोडून जात होते...

कॅलिफोर्नियाच्या नॉर्थ फस्ट स्ट्रीट, सैन होजे मधील “होम स्टेड” हॉटेल मध्ये राहणारी आमची ही मंडळीसुद्धा लवकरच अमेरिकेच्या लाइफ मध्ये रुळली, नवीन मित्र झाले. ऑफिसचे कामकाज सुरु झाले. हॉटेल रेल्वे स्टेशन च्या जवळच असल्याने येणंजाणं सोप्पं होतं. ‘लाईट रेल’ ने प्रवास सुखाचा होता. वेंडिंग मशीन ने सव्वा डॉलरचं तिकीट एका वेळेला घ्यायला लागायचं. “गीश” ते “कॉम्पोनंट” असा चार स्टेशन चा प्रवास आणि लगेचंच काही अंतरावर ऑफिस....ऑफिसमध्ये गरमागरम मशीनचा तयार चहा घेऊन दिवसाची सुरुवात व्हायची. दुपारचं जेवण जवळपासच्या हॉटेल मध्ये पायी जाऊन घेणं शक्य होतं. एका मोठ्या कमर्शिअल बिल्डींग मधील पहिल्या मजल्यावर ह्याचं ऑफिस होतं. तिथली सर्व ऑफिसेस अशीच असतात!

कंपनीमध्ये काही अमेरिकन तर काही ह्यांच्या सारखे परदेशी तर काही कामानिमित्त प्रवासकरुन येणारे होते. त्यातील एक दोन ह्यांच्या आधीच्या कंपनीमधील मित्र होते. एक वर्षभरापूर्वी परिवारासकट अमेरिकेला स्थानांतरीत झालेला. आणि दुसरा सुमारे सात आठ वर्षांपूर्वी स्थानांतरीत झालेला. दोघानकडे स्वतःच्या गाड्या होत्या. जो आधी स्थानांतरीत झालेला तो ‘ह्युस्टन’ला स्थायिक होता. ऑफिस दूर असल्याने तो सुद्धा ह्यांच्या बरोबर “होमस्टेड” मध्येच राहत होता. प्रत्येक आठवड्याला तो स्वतःच्या गाडीने प्रवास करुन यायचा. त्यामुळे आजूबाजूला हॉटेलमध्ये जेवायला जायला, मार्केटमध्ये जायला त्याची मदत व्हायची.

एका संध्याकाळी घरी परत येतांना मंडळींना पावसाने गाठलं, आणि कधी नव्हे ते सोबत बर्फ, गारांचा सुद्धा वर्षाव झाला....समोरचे वातावरण क्षणार्धात बर्फाने भरून गेले....झाडे, रस्ते, बस स्टोप्स सर्व बर्फाच्छादित झाले. मुंबईकरांचे चेहरे अंगात कापरे भरवणाऱ्या थंड बर्फानी मोहोरून उठले....बर्फात मजल दरमजल करत हॉटेल पर्यंत येऊनही पाय रेंगाळले सर्वांचे. बर्फाचा अनुभव घ्यायची काहींची तर ती पहिलीच वेळ होती...तसा सहसा बर्फ कधी पडलेला नसल्याने शहरातील प्रत्येक माणसाचा उत्साह ओसंडून वाहत होतं...त्यासर्वांत जेवणाचे हॉटेल बंद वायची वेळ जवळ आलेली सुद्धा कुणाला समजली नाही. जेमतेम रात्रीच्या जेवणाचे पार्सल घेऊन घरी जेवायची सोय झाली.

गडबडीत सर्वांना उरकायला उशीर झाला आणि रंगलेल्या गप्पांनी इंटरनेटवर बोलायला यायला विसरून सर्व झोपून गेले.

मुंबई वरून निघतांना आवर्जून खरेदी केलेली जाकेट, हात मोजे वगैरे कपडे लगेचंच कामी आलेले.

मला अजूनही आम्ही केलेली त्यांची ती गरम कपड्यांची खरेदी आठवते....खास मालाडला मार्केट मध्ये जाऊन खरेदी केलेली आम्ही. दुकानदारांना मी म्हणायची...”काश्मीर की थंड में जितने कपडे चाहिये उतने कपडे दिखादो...”खास देसी स्टाईल कपडे मागायची म्हणा ना! मुद्दाम अमेरिकेचं नाव घेतलं नाही मी दुकानदार उगाचचं फायदा घेतील म्हणून.

एक पूर्ण सुटकेस भरलेली त्या सर्व लोकरीच्या सामानानी ह्यांची. आणि हो त्या बरोबर सुटकेसची सुद्धा खरेदी केली होती.

सुटकेस सुद्धा काय तर “अमेरिकन टुरिस्ट”...पहिल्यांदा इतक्या मोठ्या सुटकेसेसची खरेदी असल्याने महाग वाटल्या आम्हाला...आम्ही म्हटलं “व्हीआयपी“चं बरी...थोडी स्वस्त सुद्धा होती. साधारण वीस ते पंचवीस किलो समान राहील इतक्या दोन मोठ्या चाकवाल्या सुटकेसेस ची आम्हाला आवश्यकता होती. बाकी गरजेचं समान छोट्या कॅबीन बागेतून न्यायचं ठरलेलं. सर्व काही ‘वेल प्लानड’ झालं....”ज्याची सुरुवात चांगली असेल त्याचा शेवट सुद्धा गोडचं होणार ह्याची खात्री पटली मनाला”...अमेरिकेला जायचं ह्या विचाराने इथे आमच्या सुद्धा स्वप्नांच्या दुनियेचा ताबा घेतलेला आत्तापर्यंत!

-मधु निमकर
 (दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात २४/०३/२०१३)
 
 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा