सर्व bags ची वजन करुन विमानात पाठवून दिली आम्ही. आणि बोर्डिंगची वाट बघत
बसलो. विमान एक तास उशिरा जाणार होते....विमानतळावर शेजार्यांची सून सुद्धा आम्हाला
भेटायला आलीचं होती, त्याने अजून माझ्या मनाला धीर आला....सामानाची ताबडतोब
व्यवस्था लावायला तिने आम्हाला खास मदत केली.
विमानतळावर बोर्डिंग ची सूचना जाहीर केली गेली. दरवाजात ‘महाराजा’ नाही पण ‘एयर
इंडिया’ची हवाई सुंदरी आमच्या स्वागताला उभी होती. आम्ही साहेबांचे पाहुणे म्हणून आधीच
सर्वांना सूचना मिळालेली होती.
बिझनेस क्लासच्या तिकिटाचा प्रवास त्यात ‘एयर इंडिया’ची खास मेहमान नवाजी.... मग
काय, खाऊन पिऊन मस्त ताणून दिलं आम्ही सर्वांनी आणि डोळे उघडले ते थेट जर्मनीच्या
‘Frankfurt’ विमानतळावर उतरायला.... सर्व श्रमाचा थकवा एका रात्रीमध्येचं माझा
निघून गेला!!
‘मुंबई ते Frankfurt (जर्मनी)’,‘Frankfurt (जर्मनी)’ ते ‘लॉस अन्जेलीस
(अमेरिका)’ आणि नंतर ‘लॉस अन्जेलीस (अमेरिका)’ वरून ‘San Francisco(अमेरिका)’ असा हवाई
प्रवासाचा मार्ग होता.
ठरल्याप्रमाणे विमान जर्मनीला उतरले. दीड तासातच आमचे विमान पुन्हा उड्डाण घेणार होते. किती छानच
वेळ गेला. वाटलं गेले ते सर्व कष्ट मागे...आता फक्त थोडा वेळ मग बसं अमेरिकेला
पोहोचणार!
आता विमानतळावरचा वेळ जाता जाईना! इतक्यात काहीशी बातमी जाहीर झाली. विमानात
काही छोटा मोठा बिघाड आहे आणि विमान त्यामुळे ३-४ तासांनी उशिरा निघणार आहे असे...
ह्यांनी अमेरिकेतील मित्राला फोन करुन आम्हाला काही तास यायला उशीर होणार असल्याचे कळवले. आम्हाला
घरी न्यायला ह्यांचा मित्र गाडी घेऊन विमानतळावर येणार होता. त्याला उगाचच इतके तास
वाट बघत ठेवणे शक्य नव्हते.
थोडे इकडे तिकडे बघत असतांना काही मराठी चेहरे दिसले. महाराष्ट्राच्या
निरनिराळ्या भागातून अमेरिकेलाच प्रवास करत होती ती सर्व मंडळी.
त्या सर्वांमध्ये माझ्याच वयाची एक स्त्री आपल्या आईला व दोन मुलांना घेऊन
बसलेली आढळली. तीन वर्षं अमेरिकेत राहून भारताच्या भेटीला मुलांबरोबर आलेली ती
तरुणी होती. एक मुलगी ७ वर्षांची आणि एक मुलगा साधारण ८ महिन्यांचा. पाठीला
सामानाची bag लावलेली. त्यात मुलाला वाटेत खायला लागणारे पदार्थ, आणि जरुरीचे
सामान ठेवलेले तिने...!
विमानाला उशीर झालेला समजल्यावर तिने गर्दीतून वाट काढत एके ठिकाणी जाऊन
आपल्या नवर्याला फोन केला.
तब्बेतीपेक्षा अवजड समान घेऊन मायलेकी विमानात चढलेल्या आणि त्यात बरोबर दोन
लहान मुलं.
तिच्या आईचा विमानाचा पहिलाच प्रवास आणि त्यात दोघी एकट्या. लहान मुल धरून
तिची आई सुद्धा काहीशी वैतागलेली. त्याचा स्ट्रोलर (बाबा गाडी) सुद्धा होती बरोबर.
आम्हाला बघून तिने (तिच्या आईने) ‘बुडत्याला काडीचा आधार’ अविर्भावात आम्हाला
जे काही नजर कैदेत अडकवले ते अगदी आमचा प्रवास संपेपर्यंत सोडलेच नाही. जरा आम्ही
इकडचं तिकडे जातांना दिसलो तर बोंबाबोंब करायची,” मराठी माणसांनी एकत्र प्रवास
करूया.” अगदी जरा सुद्धा तिने आम्हाला दूर जाऊन दिलं नाही. त्यात मुलगी इकडे तिकडे
फिरत असल्याने अजूनच भांबावून तिने हलूच दिलं नाही आम्हाला! भारतीय संस्कार आपले.
आईच्या वयाच्या बाईंना टाकून जायला वाईट वाटलं मला...
मधुमेहाने ग्रस्त असलेली तिची आई दगदागिने दमून गेलेली. परंतु मुलीला दमून
चालणारे नव्हते, कारण तिच्यावर सर्वांना सुखरूप नेण्याची मोठी जवाबदारी होती!
सर्वांना वाट बघून भूका लागलेल्या. परंतु आम्हाला विमानतळाच्या सुरक्षित भागात
बसवलं असल्याने फक्त शौचालय आणि पाणी ह्या शिवाय कसलीही व्यवस्था आजूबाजूला
नव्हती.
शेवटी सर्व प्रवाशानंसाठी बर्गर आणि शीत पेयाची व्यवस्था ‘एयर इंडिया’ कडून केली
गेली. ते सर्व घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. मोठ्या खोक्यान मधून बर्गर भरून
आणेलेले, परंतु ते सर्व मांसाहारी लोकांसाठी होते. हे जाऊन रिकाम्या हाताने परत
आले. काही शीत पेये मात्र घेऊन आले ते आमच्यासाठी.
ब्राह्मणाघरची मी विशेष मांसाहार कधी आवडीने केलेला नाही...नाहीच म्हणणे जास्त
योग्य ठरेल. विचार करता करता आलेले ते सर्व बर्गर लोकांनी ताब्यात घेऊन फस्त
सुद्धा केले.
बरोबर असलेल्या स्त्री कुटुंबीयांनी सुद्धा ब्राह्मण असून मांसाहाराची सवय
असल्याने मुक्तपणे त्याचा लाभ घेतला.
राहिलेला प्रवास उपासमारीने काढणे शक्य नव्हते आणि पुढील प्रवासाला सुरुवात
होण्याचे लक्षण ही काही दिसेना. एवढ्यात शाकाहारी लोकांसाठी बर्गर येत आहेत असे
जाहीर केले गेले. लगेचंच पुढे जाऊन मी
आवश्यक तितके बर्गर ताब्यात घेतले.
कागदामधून बर्गर उघडून बघितला तो काय....? बर्गर सर्व मांसाहारी होते. आणि
अजून खायला काही येणार नाही ह्याची सुद्धा खात्री पटलेली. बरोबरीच्या सामानात
पोटभरेल असे काहीही मिळणार नाही हे मला चांगले माहित होते. जे काही छोटे मोठे सुके
पदार्थ होते ते पुरेसे पडणार नव्हते.
मग काय...? उघडले बर्गर आणि त्यातील कच्च्या मांसाचे तुकडे काढून टाकून दिले.
राहिलेला पावाचा तुकडा आणि त्यातील चीज वगैरे सामानावर, थोडक्यात बन पाव म्हणणं
जास्त योग्य होईल....त्यावरच आमची त्या दिवसाची संक्रांत आटपायला लागली. कच्च्या
मांसाच्या वासाकडे दुर्लक्ष केले आणि ते पाव संपवले आम्ही. त्यावेळी निव्वळ ‘उदर
भरणा’चा हाच एकमेव मार्ग माझ्याकडे उरलेला.
संध्याकाळ होऊ लागलेली आणि सर्वांचीच मनं धास्तावली. विमान काही दुरुस्त
होईना. पुढे प्रवास कधी सुरु होणार ह्याची काही खबर नाही!
शेवटी निर्णय घेण्यात आला, कि विमान आज पुढील प्रवासाला उड्डाण घेणार नाही.
त्याला आवश्यक तो भाग दुसर्या विमानाने मागवलेला आहे. तो आल्यावरचं पुढील प्रवास
चालू होईल!
नंतरच्या विमानाने आमच्या विमानाचा बिघडलेला भाग येऊन त्या विमानाने आमची
दुसर्या दिवशी रवानगी होणार होती आणि आमच्या विमानाला दुरुस्त करुन आलेल्या
विमानाचे प्रवासी त्यांचा प्रवास पूर्ण करणार होते.
आमचे सामान ह्या विमानातून दुसर्या विमानात सर्व सुखरूपपणे पोहोचेल ना अशी मला
राहून राहून भीती वाटली. पण सुदैवाने तशी काही गफलत झाली नाही.
आम्हाला सर्वांना काही आंतर चालून एके ठिकाणी नेण्यात आले. तिथे आमच्या
तात्काळ जर्मन टुरिस्ट व्हिसा ची व्यवस्था करण्यात आली. तेथील जर्मन लोक एकही
अक्षर इंग्रजी बोलू शकत नव्हते. त्यांच्या सूचना आणि त्यांचे प्रश्न आम्ही कसे
समजून विसा मिळवला ते वरच्या परमेश्वरालाच
ठाऊक!!!!
एक दिवसाचा जर्मनी अनुभवायचा मोठा योग होता म्हणायचा आमचा...
-मधु निमकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा