गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

जमवाजमव आणि जुळवाजुळव


सामानाने भरलेली टक्सी विमानतळाकडे धाऊ लागली आणि माझं मन भूतकाळाकडे.

तशी परदेशात जाण्याची चाहूल बरीच आधी मला लागली होती. माझी  आंतरराष्ट्रीय  कंपनीतील नोकरी घरच्या जबाबदारीमुळे सोडतांना खरं तर वाईट वाटलेलं, परंतु आय टी कंपनीत असलेल्या पतींनी, “कुठल्या ही क्षणी नोकरी सोडायची तयारी ठेव, मला कंपनी बाहेर पाठवत आहे लवकरच “,अशी सूचना दिलेली. बेंगलुरू का जर्मनी हयातील चुरस बरेच दिवस रंगलेली असतांना बाजी मारली ती अखेर अमेरिकेने.

एक दिवस फोन करुन मिस्टरांनी अचानकपणे मला विचारलं, “अमेरिकेला येणार का? नोकरीवरचे बदलीसाठी अमेरिकेला जाणार का विचारत आहेत.” आयुष्यात नवीन आव्हानं धडाडीनं घ्यायची प्रेरणा वडिलांकडून अनेक वेळा घेतली होती. त्यामुळे निर्णय घ्यायला वेळ अजिबात फुकट घालवला नाही. “हो” म्हणून टाकलं लागेचंच.

इन्शुरन्स, पासपोर्ट,व्हिसा वगैरे ची कामे जोरात चालू झाली. खरं तर आम्हाला अवकाश होता तिथे जायला, कारण आमच्या आधी हे जाऊन आमची व्यवस्था केल्यावर आम्हाला नेणार होते. म्हणून तयारीची धामधूम प्रथम ह्यांचीच चालू होती. कंपनीतली कामं वाढलेली आणि जायची गडबड सुद्धा तितकाच जोर धरून होती. ह्यांचा पासपोर्ट तयारच असल्याने डायरेक्ट ‘एच वन’ व्हिसा साठी प्रक्रिया चालू केल्या गेल्या. ‘एच वन’ म्हणजे काम करण्याचा व्हिसा आणि त्याच्यावर अवलंबित लोकांचा ‘डीपेंडेंत व्हिसा’ तो आमचा.

कंपनी तर्फे असल्याने काम वेळेतच पूर्ण झालं आणि यजमानांनी एक दिवस आपल समान भरून अमेरिकेला प्रस्थान केलं सुद्धा.

हे एकटे पुढे गेले. सुरुवातीचा आठवडा कंपनीतर्फे हॉटेलमध्ये राहायची सोय केली होती. ते हॉटेल असलं तरी घरच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीनी, भांड्यांनी सुसज्ज असा छोटेखानी घर म्हणावं असंच होतं.

विमानतळावर ह्यांच्या बरोबर त्यांच्या कंपनीमधली दोन माणसं सुद्धा विमानात चढली होती. त्यातील एक ह्यांचा बालमित्र (कॉलेज चा दोस्त) निघाला आणि दुसरा मात्रं अनोळखी होता. योगायोगाची गोष्टं म्हणजे तिघेही एकाच वयाची माणसं. एकाच वर्षी जन्मलेली आणि एकाच कंपनीत काम करणारी. तिघांचाही अमेरिकेचा हा मोठा आणि पहिला प्रवास होता. कंपनीने सर्वांची व्यवस्था एकाच हॉटेल मध्ये आठवडाभरासाठी केली होती. नंतर प्रत्येकजण स्वतःची व्यवस्था बघणार होता.

अमेरिकेला पोहोचल्यावर ह्यांनी मला फोनवर ह्या दोन सहचार्यानविषयी  सांगितले आणि थोडे हायसे वाटले, कारण स्वयंपाकाशी संबंधित कुठल्याही गोष्टीशी ह्यांचा दूर दूर पर्यंत संबंध कधीच आलेला नव्हता. वाटलं त्या दोघांची कदाचित थोडीफार मदत होईल सुरुवातीला. “लग्नानंतर नवरोबांना कधीच कामं पडू देणार नाही”, असा प्रेमाने मी वचन दिलेलं. ते आठवलं नी डोक्याला हातं मारला....”ह्याचं तिथे एकट्याने कसं होणार?” ह्या विचारानेच.

तशी एक्स्प्रेस तयारी दोन दिवस आधी मी करुन घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु विदयार्थी कच्चा आहे ह्याची मला खात्री होती.

लहानपणापासून घरातील सर्वांत कामचुकार व्यक्ती म्हणून नावलौकिक मिळवलेले हे, त्यात माझी भर पडल्याने एक दोन कामं राखीव होती ते सुद्धा हातातून मोकळी करण्यात हे यशस्वी झालेले.

मोठ्या प्रयत्नाने चहा आणि मेगी बनवायला यशस्वी ट्रेनिंग दिलेलं मी. अहो बनवायचं तर सोडाचं पण बनवलेलं सुद्धा हात लाऊन घेतील का नाही ह्याची शाश्वती नव्हती ह्यांची. अनुभवाने सांगत आहे.

फार काळजी वाटली त्या वेळी मला त्यांची. अगदी आठवलं की लग्नाच्या वेळी लोक कन्यादान करतात जावयाला, नी मुलगी नवर्याची होल एन सोल बनून जाते. हा एक खरं तर पुत्र दानाचाच प्रकार म्हटला पाहिजे...फक्त फरक एवढाच कि मुलगी सासरी जाते, आणि दुसरीकडे नवर्यामुलाची जवाबदारी आई सुनेला देऊन टाकते....कायमची!

आता अमेरिकेची पुढील खबर घेऊया! त्रिदेवांपैकी ह्यांच्या मित्राला सुद्धा ह्यांच्या इतकंच स्वयंपाकघर प्रिय होतं. काय समजायचं ते समजला असाल आत्ता पर्यंत मंडळी तुम्ही! अहो, ह्यांच्या इतकी बेसिक सुद्धा नव्हती हो त्याने केलेली. मोठ्या घरचा मुलगा होता तो...त्यात म्हणजे बायकोने कधी नोकरी केली नव्हती, मग कशाला जेवण-खाण करायची वेळ येणार होती त्याच्यावर?

जो पोट देतो तो ते भरायची सुद्धा सोय करतो. भारतीय हॉटेल्समध्ये जेऊन जेऊन मंडळी कंटाळली. कंपनीची हॉटेलमध्ये राहायची मुदत सुद्धा संपत आलेली.  तरीही पुढील काही दिवस सर्वांनी त्याचं हॉटेल मध्ये राहायचं ठरवलं. ह्यांचा तिसरा मित्र कायम फिरतीची नोकरी करणारा निघाला. उत्तम का काय हे सांगू शकत नाही, पण त्याला जेवण कसा बनवायचं नीट माहित होतं.

तीन ब्राह्मचार्यांचा संसार सुरु झाला मग. एक वेळेला बाहेर जेवायचं नी एक वेळ घरी मारून न्यायची.

इंडियन स्टोर मधून स्वयंपाक करायला आवश्यक ते सर्व उचलून आणलं आणि दिनचर्या चालू झाली. तिथे रेडी पराठे छान मिळतात. संध्याकाळची एक वेळ सहजपणे मारून नेली जायची.

दररोज नाही पण मध्येच कधीतरी ह्यांचा फोन यायचा. ‘आंतरराष्ट्रीय कॉल’ म्हणून फार वेळ नाही बोलायचो. खरं तर काय बोलायचं नी काय विचारायचं ते सुचायचंच नाही त्या वेळी. एक मोठं कोडं होतं तिथलं आयुष्य म्हणजे आमच्या साठी ज्याची काहीही कल्पना करू शकत नाही.

आय टी चा जॉब म्हणजे रग्गड काम हे समीकरण तिथेही सार्थक होतं. भरपूर काम आणि घरी जाऊन थोडीशी विश्रांती.

घरी आल्यावर सुद्धा हॉटेलमधल्या इंटरनेटच्या वेळा विभागलेल्या  असायच्या सर्वांच्या. आळीपाळीने इंटरनेट सर्व वापरायचे.

आयुष्यात होस्टेल मध्ये ज्यांनी शिक्षणं घेतली असतील त्यांना कदाचित ते थोडं सोप्पं जाऊ शकेल पण नवख्या माणसाला नाही.

ह्या सर्व गोष्टींची कल्पना मला पोहोचल्यावर एक वर्षांपर्यंत ह्यांनी लागून दिली नाही. कधीही फोनवर सुद्धा त्याचा अंदाज आला नाही मला.

देव जेव्हा आपल्याला एखादी बाजू कमकुवत देतो तेव्हा त्याची त्रुटी दुसरी कडून भरून काढतो असे म्हणतात. त्याचाच मला हा प्रत्यय आला.

 -मधु निमकर

 (दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात २४/०२/२०१३)

                                                              

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा