दुसरा दिवस उजाडला....बसं आज पुन्हा कालचं राहिलेलं काम पूर्ण करायचं ठरवलेलं.
कस तरी उरकून घराबाहेर पडलो आम्ही दोघे. भर दुपारी बारा वाजता सर्व सामानसुमाना
सकट तीन चाकी रथातून आमचे राजे खुशीने जायला तयार होते. अगदी दोन पावलं सुद्धा
चालायला आवडायचं नाही मुलाला. कॉलनीच्या बाहेर पडल्यावर लाडात नेहमीच्या ठेक्यात
“लीक्षा...” म्हणून लेकाने हात करुन रिक्षा थांबवली आणि आमचा प्रवास सुरु झाला.
वाहनांची गर्दी चुकवत चुकवत आम्ही ठिकाणावर पोहोचलो तर काय ऑफिसवाल्यांची
जेवणाची वेळ झालेली. निमुटपणे वाट बघण्याच्या वर काही गत्यंतर नवतं. चांगला एकाचा
दीड तास गेला त्यात.
आतील लोकांना जेवणामुळे सुस्ती आली तर बाहेर वाट बघणार्यांच्या पोटात
कावळ्यांची बाळंतपणं सुद्धा पार पडली. अर्थातच मुलाला घेऊन ‘मे’ च्या उन्हात फिरणं
शक्यच नव्हतं. मग कावळे असुदेत नाही तर घारी. मुलाची सुद्धा चुळबुळ चालू होती. भुकेशी
कायमचं वाकडं असल्यामुळे त्याने विशेष त्रास दिला नाही.
शेवटी देवाची मेहेरबानी झाली आणि आमचा नंबर लागला.
मला हवा असलेला दस्तऐवज जवळच्याच पाच मिनिटांवर असलेल्या दुसर्या कार्यालयात मिळेल
असं सांगण्यात आलं. नको असतांना सुद्धा चालत चालत रस्ता शोधात दुसर्या कार्यालय
पर्यंत येऊन पोहोचलो दोघे आम्ही.
ते कार्यालय देखील मी आधी पाहिलेलं आठवतंय मला. तरीही खोल्या नवीन होत्या,
आतील माणसं नवीन होती. त्यांनी पुन्हा काही पुस्तकं, ‘पुरातन ग्रंथ’च म्हणायला
पाहिजेत खरे तर उघडून चित्रगुप्ताने तुमचे भविष्य तपासावे त्याप्रमाणे संदर्भ
तपासले आणि निष्कर्ष दिला कि मला हवी असलेली फाईल पहिल्या ऑफिस मध्येच मिळेल.
आत्ता पर्यंत बराच वेळ निघून गेलेला. लहान मुलाला घेऊन बाहेर थांबणं आता शक्य
नव्हतं. ठरवलं पुन्हा उद्या येऊन बघते.
रिकाम्या हाताने घरी परत आलो आम्ही दोघे. विचारायला नी सांगायला कुणीही नव्हते
माझ्याकडे. थोडा विचार करुन दुसर्या दिवशी पुन्हा जायचं ठरवलं.
दिवसभर फिरून मुलाचे हाल झालेले...झोप झाली नाही त्याची, धड जेवण सुद्धा देता
आला नाही त्याला, फक्त काही बिस्कीट संपवली होती त्याने जेवण ऐवजी. घरी गेल्यावर
त्याचा आम्हा दोघांना त्रास झाला.
पुन्हा दुसर्या (तिसऱ्या) दिवशी आपली नेहमीची दिनचर्या चालू...एक्शन रिप्ले!
पुन्हा तेच कार्यालय नी पुन्हा तीच माणसं. परंतु ह्या वेळी जाता क्षणी माझं
काम झालं. काही तरी फोनवर बोलणी झाली आणि माझी फाईल त्यांनी आपल्या समोरच्या पेटी
मधून चटकन काढून हातावर ठेवली.
गोष्टी इतक्या सोप्या होत्या हे बघून मला आश्चर्य वाटलं. मनात जास्त काही
विचार न करता घर गाठलं नी एक सुटकेचा निश्वास टाकला एकदाचा!
दस्तावेज मिळाले हे ऐकून ह्यांना आनंद होईल अशी खात्रीच होती मला. अखेर बरेच
वर्षं रखडलेल काम पूर्ण झालं होतं. इतकी सोप्पी गोष्टं करायला ह्यांनी प्राधान्य
दिल नाही हे एकदा मनात आलं, परंतु सरकारी काम म्हटलं कि सर्व गोष्टी माफ असतात. मर्यादेच्या बाहेर त्या
प्राप्त करणं शक्य होत नाही हे चांगलं अनुभवलेलं मी पदोपदी, त्यामुळे ह्यांच्या
विषयी काहीच तक्रार करायचं कारण नव्हतं.
सवडीप्रमाणे ह्यांनी फोन केला. ह्यांना काम पूर्ण झाल्याचे सांगितले, तेव्हा
मला त्यांनी सांगितले,” ही झाली आपल्या पहिल्या न झालेल्या जागेची कागदपत्रं. आता
पुन्हा जा आणि आपल्या राहत्या जागेची कागदपत्राची पुरवणी घेऊन ये….”
परीक्षेत अनपेक्षितपणे आपलं उत्तर चुकीचं आल्यावर जसं वाटतं तसचं काहीसं मला
झालं. मी पुन्हा पुन्हा ती कागदपत्रे तपासून पहिली आणि त्यावर लिहिलेला पत्ता
पुन्हा पुन्हा तपासला.
ह्यांनी सांगितलेलं अगदी बरोबर होतं. मला पुन्हा कचेरीला भेट देणं गरजेचं
होतं. एखादा खबरी पोलिसांना जशी गुप्त माहिती देतो तसे काही झाले माझे. काहीही
झाले तरी हे काम झाल्याशिवाय अमेरिकेला न गेलेलं बरं...अन्यथा त्याचा भविष्यात
मोठ्ठा त्रास होईल ह्याची खात्री पटली.
शेवटी बाई माणसं घाबरट असतात हेच खरं! वाटलं, “हे असते तर काम लवकर झालं असतं...”
व्यावहारिक दृष्टीने काम अजून बाकी होतं. पुन्हा सर्व पसारा आवरून, किवा
स्वतःला सावरून म्हटलेलं बरं....नवे काम (?) आता पूर्ण करायला जायचे होते.
दोन चार दिवस आराम करुन पुन्हा काम सुरु करायचं ठरवलं. नाही तर फिरून फिरून
मुलाची तब्बेत बिघडेल अशी भीती होती मला. मी तो आठवडा संपायची वाट बघायचं ठरवलं.
जमिनीत टाकलेल्या बीजाप्रमाणे विसा प्रोसेसिंगचे काम हळू हळू आकार घेत होते.
त्यामुळे सध्या तरी माझं पूर्ण लक्ष घरावरच होतं..
अमेरिकेत जातांना मुलांना लागणाऱ्या लसीकरणाची यादी ह्यांनी माझ्याकडे दिलेली होती.
जन्मापासून त्याला दिलेल्या आवश्यक लसींची यादी बालरोगतज्ञयाना दाखवून काही राहिले
नाहीना हे तपासून त्यांचे बाळाचे लसीकरण पूर्ण केलेल्याचे प्रमाणपत्र दरम्यानच्या
काळात जाऊन घेतले. त्याच्याशिवाय मुलांना शाळेत दाखला दिला जात नाही असा
अमेरिकेतील शाळांचा नियम आहे.
भारतातील शाळेत पुढील वर्षी आपला मुलगा जाणार नाही हे माहित नसून देखील पहिल्या
तीन महिन्यांची फी भरून टाकली मी. त्यामुळे त्याची पुढील वर्षाची त्या शाळेत सोय
निश्चित झालेली.
परंतु अमेरिकेत गेल्यावर त्याला शाळेत प्रवेश नक्की मिळेल ना ही रुख-रुख
जीवाला कायमची लागून राहिलेली असायची.
ना ह्या शाळेत जायचं होतं तरी शाळेत प्रवेश घेतलेला, ना अमेरिकेतल्या शाळेत
जायचं निश्चित होतं तरी तिथे प्रवेश घेता आला....शेवटी मुलाच्या भविष्याचा प्रश्न
होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा