गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

अखेर विसा मिळाला!


बस्स! व्हिसाचं काम एकदाचं झालं कि मी सुटले म्हणायची वेळ जवळ येऊन ठेपली!

साग्रसंगीत नोंदणी करुन अखेर व्हिसासाठी आमचा नंबर लागला. भरपूर लोकांची गर्दी असते असं समजलेलं मला. त्यामुळे शक्य तितक्या लवकर व्हिसाच्या इंटरव्यूसाठी पोहोचायचे ठरवले.

इंटरव्यूला लागणारे जरुरीचे सर्व डॉक्युमेंट्स कंपनीने तीन दिवस आधीच व्हिसा ऑफिसमध्ये पासपोर्ट समवेत जमा केलेले.

दोन दिवस आधी ह्यांनी मला अमुक अमुक वेबसाईटवर जाऊन इंटरव्यूची तयारी कर व काय काय प्रश्न विचारले जातात ह्याची कल्पना घे असे सांगितलेले.

त्यावरून बरोबर न्यायच्या सामानात फक्त एक प्लास्टिकची साधी पिशवी आणि पैसे एवढेच न्यायला परवानगी होती. कुठलीही धातूची किंवा इलेक्ट्रोनिक गोष्टं, फोन, अगदी कॅल्क्युलेटर अथवा शस्त्र म्हणून वापरण्यायोग्य कुठलीही वस्तू माझ्याजवळ नको हे देखील मला ह्यांनी बजावून सांगितले होते. वर व्हिसा अमान्य सुद्धा केला जाऊ शकतो ही शक्यता सुद्धा मला ह्यांनी सांगितली. त्यामुळे मानसिक तणाव वाढलेला.

माझ्यासाठी तयारी म्हणून फक्त तीन गोष्टी आवश्यक होत्या. सर्वात महत्त्वाचे मेरेज certificate, लग्नाचा फोटो अल्बम आणि कंपनीने दिलेला I-797 पेटीशन.  

लग्नाचा अल्बम सहपरिवार घेऊन जायचं म्हणजे दिव्यचं होतं, पण “तुझ्यासाठी काहीही...” म्हणत म्हणत कोंबला तो गलेलठ्ठ अल्बम प्लास्टिकच्या पिशवीत आणि निघाले! नेहमी सारखी छोटेखानी शिदोरी सुद्धा बरोबर होतीच.

रात्रभर डोळ्याला डोळा लागला नव्ह्ता. सकाळी लांबच लांब रांगेत नंबर लावतांना हातातील जड अल्बम जास्तच भारी वाटू लागला. कसे तरी सावरत सावरत वेळ पार पडली. बऱ्याच वेळाने सिक्युरिटी मधून यशस्वीपणे आत प्रवेश घेतला आम्ही दोघांनी. बराच वेळ बाहेर उभा असल्याने घामाच्या लागलेल्या धारांना चांगलाच विसावा मिळाला. थंड वातानुकुलीत हॉलमध्ये मध्यभागी असलेल्या दोन खुर्च्यांवर मी आणि मुलगा बसलो.

काचेच्या बंद कॅबिन्समधून काही परदेशी चेहरे डोकावत होते. त्यात माझा यु एस कॉन्सुलेट कुठला आहे ह्याचा अंदाज घेणे शक्यच नव्हते.

प्रवेश घेतांना दिलेलं टोकन मी जपून ठेवलं आणि आमचा नंबर यायची वाट बघत राहिले. आत शिरल्यावर काम व्हायला वेळ लागणार नव्हता ह्याची मला पूर्ण कल्पना होती.

आमचा नंबर काही वेळातच आला. बंद काचेच्या काऊनटर मध्ये एक वयस्क अमेरिकन कॉन्सुलेट  उभा होतं. त्यांनी माझं नाव आणि लग्नाची तारीख विचारली. माझे कंपनीने पाठवलेले कागद चाळतांना अचानकपणे त्याने मला विचारले तुझे पेटीशन कुठे आहे?? तू दिलेलं नाहीस आम्हाला...?अनपेक्षित प्रश्नाने खूप भांबावून गेले मी....जणू एखादा गुगली चेंडू पडून विकेट जावी...अरेरे हे काय झाले?

माझ्याकडची सर्व कागदपत्रे मी त्याच्या समोर धरली. त्याने ती पाहून पुन्हा मला सांगितले तुझे नावाचे पेटीशन पाहिजे....!

माझ्या कागदपत्रांमध्ये असलेले पेटीशन ह्यांच्या नावाने होते. त्याने ते अमान्य केले आणि माझे हवे असे सांगितले......

“असे कसे कंपनीवाले सुद्धा चूक करू शकतात?”

--विचार करत करत कार्यालयाच्या बाहेर मान खाली घालून पडले आणि थेट बाहेरून मेलीसालाच फोन लावला. मला तिने तपास करते म्हणून सांगीतले.

कॉन्सुलेटना हवा असलेला कागद आला...ह्यांचा ओरिजिनल I-797 कागद थेट अमेरिकेवरून कुरिअर ने ह्यांनी आमच्यासाठी पाठवला.

पुन्हा एकदा व्हिसासाठी इंटरव्यूला वेळ घेतली गेली. पुन्हा सर्व तेच....

अनुभवाने थोडं धैर्य आलेलं....भीती कमी झाली होती माझी काहीशी.

हाताच्या बोटांचे ठसे, आमचे फोटो वगैरे त्यांनी काढून घेतले. माझी कागदपत्रे सर्व ठीक वाटली त्यांना. ह्या वेळी त्यांनी मला पेटीशन विचारलेच नाही...कारण माहित नाही.

त्यांना हवे असलेले पेटीशन खरे तर ‘प्रथम व्हिसा’ ज्याच्या नावाने घेतला जातो त्यांना आवश्यक असतो. भारतातून अमेरिकेत कामाला जातांना अमेरिकन कंपनीला त्यांच्या सरकार कडून तशी परवानगी घ्यावी लागते आणि मग ती परवानगी इथे व्हिसा कार्यालयात दाखवून त्यावर स्वतःचा तसेच परिवाराचा व्हिसा मिळवला जातो.

माझा आणि मुलाचं ‘डिपेंडंट व्हिसा’ असल्याने आमच्या नावाचा तो कागद मिळणे शक्यच् नव्हते. कारण आम्ही अवलंबित माणसे होतो.

अखेर मला कॉन्सुलेट नी व्हिसा मान्य केल्याचे सांगितले आणि दुसर्या दिवशी पासपोर्ट इथून इथून मिळवायला सांगितले.

एकीकडे लग्नाच्या अल्बमने हात चांगलाच दुखत होता....परंतु दुसरीकडे डोक्यावरचा भार मात्र चांगलाच हलका झालेला.

तीन वर्षांच्या व्हिसाचे दान पदरात पडल्याने अखेर मला हायसे वाटले....परिश्रमाचे अखेर फळ झाले!

व्हिसाचं काम झाल्याने मेलिसा सुद्धा खुश होती....

आता पुढचं राहिलेलं काम पूर्ण करायला कंपनी आणि मेलिसा सज्ज दिसली. ह्यांचं परतीचं तिकीट आणि आमच्या तिघांची अमेरिकेला रवानगीचं तिकिटं!

आकडेमोड करीत अखेर सर्व तारखा जुळून आल्या.

साधारण दहा दिवसांच्या अंतरावर दोन्ही तिकिटं बुक करण्यात आली.

हे आल्यावर लगीनघाई नको म्हणून सामानाची बांधाबांध चालूच केलेली मी....घरातील शोधून शोधून सर्व bags काढल्या....अगदी लग्नाची bag सुद्धा कामी आली मला.

ह्यांचा फोन आला दोन आठवड्यात न्यायला न्यायला येतो म्हणून...

जणू काही रस्त्यामधले सर्व अडथळेचं दूर झालेले....

अखेर तो दिवस आला आणि मध्यरात्री हे मोठाल्या bags घेऊन दरवाजात उभे राहिले. प्रवासाने काळवंडलेल्या ह्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. bags रिकाम्या होत्या म्हणून ह्यांनी एकट्यानेच येणं पसंत केलं होतं.

ह्यांचे आई वडील, माझे आई वडील, भावंड सर्वच खुश होते.

प्रत्येकासाठी काही ना काही भेट वस्तू आणलेल्या त्या त्यांना-त्यांना देऊन ह्यांनी सर्वांना खुश केले...

त्या सर्वात अजून एक आनंदाची गोड बातमी आमच्यापर्यंत पोहोचली...माझ्या दिराच्या लग्नाची!!

दिराला बऱ्याच वधू संशोधनानंतर एक वधू पसंत पडली होती. खास आम्हाला दाखवण्यासाठी पुण्याला राहणाऱ्या दिराचा मुलगी बघायचा कार्यक्रम मुंबईला ठरला!

--मधु निमकर
 (दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात २/६/२०१३)
 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा