गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

आई


पंधरा दिवसांचा आठवडा झाला....माझी लगीनघाई बघण्यासारखी होती...ह्यांनी घरातील एक जुना वजनाचा काटा शोधून काढला. आणि मी कपाटातून मिळतील ते कपडे...घरभर रंगीत कपड्यांचा जणू बाजारचं भरलेला! भन्नाट गर्दी सामानाची आणि पाय ठेवायला जागा नाही खोलीत....शेवटी मुंबई ती मुंबईचं!!

अमेरिकेवरून परत आणलेल्या दोन bags उघडून मी बघितल्या....त्यातील एक अमेरिकन टुरिस्ट अगदी जशीच्या तशी होती...आणि दुसरी भारतीय बनावटीची, थोडी स्वस्त म्हणून घेतलेल्या bag ची पाठ मोडलेली....तरीही ती बाकी नेण्या-आणण्याच्या कामासाठी कामचलाऊ म्हणून ठीक अशीचं होती.

कपाटातील माझे कपडे शक्य तितके दोन्ही bags मध्ये टाकले तर काय, दोन bags मलाच कमी पडल्या....म्हटलं,” मग बघूया काय कमी करायचे सामानातले ते. आत्ता असुदेत...!!”

आता पुन्हा एकदा आमच्यासाठी टुरिस्ट bags आणि गरम कपडे खरेदीला गेलो. सर्व काही हवे नको ते घेऊन आलो. त्याबरोबर मोठ्या bags सुद्धा चांगल्या चार घेऊन आलो....पाहिजे तितकं समान नेऊ शकू ह्या विचाराने मन अगदी निर्धास्त पुन्हा एकदा झालं!

स्वयंपाक घरातील कमीत कमी वजनाचे मोजके सामान मी न्यायला उचलले. बाजारात जाऊन एक छोटा bag मध्ये जाईल असा कुकर आणि एक स्टीलचा पोळपाट व बारीक लाटणे विकत घेतले, ज्यामुळे वजन कमी भरेल आणि न्यायला सोप्पे पडेल....दिवाळीचा फराळ बनवायला लागणारा सोऱ्या, कातरणे पासून ते छोट्या पणत्या सुद्धा उचलल्या.

घरातील देवघर हलवू शकत नाही म्हणून देवाच्या छोट्या छोट्या मूर्ती बरोबर घेतल्या, तेवढच देव बरोबर नेल्याच मनाला समाधान म्हणून...त्यात खास करुन गणपतीचा समावेश तर केलाच...घरच्या गणपतीला सेवेचं दिलेलं वचन तिथे सुद्धा मोडता कामा नये हे चांगलं लक्षात होतं माझ्या...बरीच मोठी तयारी होती माझी, पण घर म्हणून माझ्या दृष्टीने ती आवश्यकचं होती.

‘कॅलिफोर्नियाची थंडी फार’ म्हणून थंडीसाठी ब्लान्केटस आणि पांघरूण सुद्धा पुरेशी बरोबर घेतली. गरम कपड्याना गुंडाळून  भांडी सुद्धा अगदी सांभाळून नेली जातील ह्याची मला खात्री होती. सामान bag मध्ये भरतांना ह्यांनी मला सांगितले,” विमान तळावर सामान उतरवतांना bags फेकल्या जातात सामान सांभाळून घे बरोबर...!”आमच्या bag च्या मोडक्या पाठीचा थोडाफार अंदाज मला तिथेच आला..

घरचे सर्व समान जमेल तितके बांधून घेतले. खाद्य पदार्थ एक तर संपवलेले किवा बांधून घेतलेले. फुकट जाणारे पदार्थं देऊन टाकायला सांगितले घरच्या लोकांना. गेल्यावर चूल पेटवायला (जेवण करायला असा अर्थ घ्यावा) लागणारे थोडे-फार  रेशन एका bag मध्ये होतेच. थोडी वाचन करायला पुस्तकं सुद्धा घेतली, लहान मुलांची अंकलिपी सुद्धा मुद्दाम घेतली. मराठीची पुस्तकं शोधून शोधून घेतली पुढील इयात्ताची कि परत येऊ तेव्हा अभ्यास यावा ह्या हेतूने...

सर्व नवीन जुन्या bags भरून झाल्या. तरीही अर्ध्या bag मध्ये जागा शिल्लक राहिली होती. वजन सुद्धा भरपूर भरायचं बाकी होतं. अर्ध्या राहिलेल्या bag मध्ये ठेवायला समान मिळणार नाही मला असा होणारच नाही....म्हणून मी बाहेर जाऊन येताना मिळेल ते घेऊन bag मध्ये भरत होते. ह्यांनी बघितले ते आणि मला ओरडले...”उगाचचं कशाला इथून भरून समान नेत आहेस? तिथे घेऊया लागेल ते ”...परंतु मला ते पटेना...शेवटी आपण बाहेरगावी जातांना घरून सर्व घेऊन जाणेच पसंत करतो ना?....तसेच काहीसे....

सासूबाईंनी चिवडा लाडूची खास शिदोरी दिलेली बरोबर खायला. त्यातील थोडी जवळ ठेवली वाटेत खायला. थोडी निघताना खाल्ली.

तिथे विशेष पाश्चिमात्य कपडे घातले जातील म्हणून साड्या व काही पंजाबी (ह्यांनी घेऊचं नको सांगितले तरीही..) मोजके बरोबर घेतले मी. म्हटलं,” फारतर घालणार नाही गेल्यावर अजून काय?” हे म्हणाले, “कुणी घालत नाही तिथे असे कपडे.” असे म्हणून माझ्या कपड्यांच्या bag ची समस्या ‘हलकी’ झाली. बाकी कुणाची समस्या इतकी ‘भारी’ नव्हतीच मुळी कि काही तोडगा काढावा लागेल.

घरील सर्व राहिलेलं समान-सुमान उचलून मी सरळ बंद डब्यानमध्ये ठेवून दिलं. शोपीस वगैरे उचलून कपाटामध्ये ठेवून दिले किवा त्याला बंद कव्हर घातली ज्यामुळे धूळ जाणार नाही. फर्निचरवर घालायला जुन्या चादरी वापरल्या, जुनी रद्दी काढून टाकली, केरकचरा सर्व साफ करुन स्वच्छ केलं घर....असं नाही म्हणाले कि आता हे घर बंद राहून घाण होणार मग कशाला साफ करा वगैरे....

शोकेसच्या फळ्या रिकाम्या ठेवल्या ज्यामुळे त्या माझ्या घरच्यांनी माझ्या गैरहजेरीत सहजपणे साफ ठेवल्या.

हे सर्वात महत्वाच्या कामात गुंतलेले होते....ह्यांनी सोसायटीवाल्यांना कळवलं, gas वाल्यांना कळवलं, सर्व महत्वाच्या लोकांना लेखी पत्राने कळवून कायदेशीर जवाबदारी पार पाडली आम्ही.

नको त्या बँकांची खाती आम्ही बंद करुन व्यवहार मर्यादित नी सुटसुटीत केले. एक पूर्ण bag फक्त कागदपत्रांसाठी ह्यांनी राखीव ठेवलेली होती. विमान तळावर हजार कागद लागतील ते सर्वच्या सर्व हाताशी मिळावेत म्हणून ह्यांनी ते स्वतः च्या ताब्यात घेऊन ठेवलेलं होतं. आणि ते शेवट पर्यंत परत येईपर्यंत त्यांनी कुणाही जवळ दिले नाही.  

अमुक एक कागद पाहिजे म्हटलं कि हे लगेचच काढून द्यायला तयार असलेच पाहिजेत....

मग तो मुलाच्या जन्म तारखेचा दाखला असो, लग्नाचे प्रमाणपत्र असो, पासपोर्ट व्हिसा असो, डॉक्टर्स चे रेकॉर्ड्स असोत नाही तर अन्य काहीही नोकरी निमित्त असो....

शेवटी प्रत्येक गोष्टीला योग्य नियोजन हे अत्यंत महत्त्वाचे असते...

ह्या खेरीज घरी सुद्धा प्रत्येक गोष्टी जागच्या जागी ठेवून गेले असल्याने अडचणीच्या वेळी कामे करणे सोपे गेले.

आज इतके वर्षांनी परत येऊन सुद्धा माझं घर जुनं किवा बंद घर म्हणून कधीचं कुणाला वाटलं नाही कारण त्याचं योग्य ते  केलेलं जतन....त्याचं पूर्ण श्रेयं माझ्या मातोश्रींना म्हणजेच आई ला जाते.  वेळात वेळ काढून ती नोकरीवरून कधी येता-जाता माझ्या घरी येऊन माझा घर राहतं ठेवलं. बँकांचे व्यवहार बघितले, अन्य व्यवहारही जातीने बघितले आणि घराचं घरपण टिकवल! वर प्रत्येक सामान व्यवथित स्वच्छ आणि नीटनेटक ठेवलं...अगदी ठेवून गेले होते तसेच्या तसे!

-मधु निमकर
(दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात ३०/०६/२०१३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा