मुंबईच्या हक्काच्या घराची कागदपत्रे मिळवाचं काम अजून फत्ते झालं नव्हतं. एका
छोट्याश्या कागदी चिट्ठीवर पूर्ण घर घेतल्याचा दाखला मिळवायचा होता.
अंधेरी लोखंडवाला सोडल्यापासून ह्यांना मुंबईमधल्या कुठल्याही जागा पसंत
पडेनात. ‘महिंद्रा आणि महिंद्रा’ मध्ये इंजिनियर म्हणून काम करतांना कंपनीच्या जवळपासच्या
परीसरातील उभी रहात असलेली मोठी संकुलने बरीच
चर्चेत आलेली.
पैशांची जमवाजमव करुन त्यातीलच एक जागा बुक केली आम्ही.
जागा अगदी पाहिजे तशी आणि ऐसपैस होती. जागेचा ताबा मिळायला अवकाश होता, परंतु
नक्कीच थांबण्याला लायक अशी जागा होती.
एक दिवस अचानक एजंट चा फोन आला कि तुम्ही दुसरी जागा पसंत करायला या, तुमची
बिल्डिंग बनत नाही आहे. विषय गंभीर होता म्हणून तातडीने त्याचे ऑफिस गाठलं.
“भाभी जी आप की बिल्डिंग बन नही रही है....आप इन में से एक जगह पसंद करलो” असं
म्हणून त्याने आम्हाला त्याचं संकुलातील तयार काही जागा दाखवल्या.
पूर्वीपेक्षा चांगल्या ठिकाणची जागा मिळाली तर कुणाला नको असणार?
बिल्डर व एजंटच्या सहकार्याने (अर्थातच त्यात आश्चर्य ते काय...) सर्व गरजेची
कागद पत्रं पूर्ण केली गेली. वेळेआधी जागा आमच्या हाती आल्याने आम्ही सुद्धा खूप
खुश झालो...
आजूबाजूच्या संकुलनांतील बिल्डिंगीची कामे अजून चालूच होती....ती पूर्ण
झाल्यावर तर ‘सोने पे सुहागा’ म्हणावे किवा मोठी लॉटरी लागावी इतके भाग्यवान ठरलो....
त्याचे कारण सुद्धा तसेच होते.
आमचे संकुल अगदी मोक्याच्या ठिकाणी होते. सहावा मजला असून सुद्धा आमची बिल्डिंग
थोडी रस्त्यापासून दूर होती. आवाज गोंगाट प्रदूषण कसलाच त्रास नव्हता. त्यात
घराच्या खिडकी समोर बाजूच्या कॉलन्याची लागून आलेल्या
लागोपाठ तीन गार्डन्स....अगदी दुग्धशर्करा योगचं म्हणाना!
प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात तीनही कॉलन्याची चढाओढ आमच्या कॉलनी बरोबर
लागलेली असायची. आणि उत्साह म्हणाल तर कुणाची तुलना होणार नाही इतका. असो!
स्विमिंग पूल, क्लब हाउस सर्व सोयींनी सुसज्ज असं हे आमचं नविन घर होतं. चोवीस
तास पाणी, लिफ्ट सर्व काही. त्यात घरात आलेला नवीन पाहुणा आणि त्याच्या नी आमच्या
सामानांची जमवाजमव हयात दिवस कसे निघून गेले समजलेच नव्हते आम्हाला.
मुलगा मोठा होत असतांनाच मी माझं पोस्ट-ग्रेजूएशन उरकून घेतलं. नोकरी केली.
मुलगा शाळेत जायला लागला.
जीवनाला खूप वेग होता आणि त्याला कुठेच रोखायला शक्य नव्हते.
बोलता बोलता चांगली आठ नऊ वर्षं निघून गेली.
दरम्यानच्या काळात जागेची कागदपत्रे कचेरीत दोन चार खेपा घालूनही ह्यांना
मिळाली नाहीत. परंतु मालकीची जागा आहे ह्या विचाराने ते निश्चिंत होते. आर्थिक नी
कचेर्यांची सर्व कामे ह्यांच्या ताब्यात असल्याने मला त्यात लक्ष घालायची कधीच गरज
पडली नाही.
परंतु आता तशी परिस्थिती नव्हती. आता आम्हाला ते दस्तऐवज हवेच होते ते सुद्धा
लगेचंच. वितभर कागदाचा तुकडा आणि काही
छोटी मोठी कागदपत्रं एवढा ऐवज ते मिळवायला पुरेस होते.
‘होल एड सोल’ आता मीच असल्याने मला त्या कामात लक्ष घालणे अपरिहार्याने होते. मुलगा
लहान होता, नीट खायचा नाही...वाटेत कुरकुर करेल, त्याला प्रवासाचा त्रास होईल वगैरे
विचार सारखे मनात येत होते. उन्हाळा सुद्धा खूप कडक लागलेला. मग काय, मुलाला
जेवायला घालून व थोडा आवडीचा खाऊ बरोबर बांधून घेऊन रिक्षाने थेट ठिकाण गाठलं एक
दिवस.
ठिकाणावर पोहोचल्यावर जागेची ओळख पटली. आम्ही दोघे तिथे आधी आलेलो होतो. सरकारी
कचेरी अवाढव्य होती...भरपूर खोल्यांमधून लोकांची मोठी वर्दळ चालू होती. कोंदट
गुदमरवणार्या एका छोट्या अंधार्या खोली मध्ये मला हवी असलेली फाईल मिळणार होती.
ठिकाणावर पोहोचल्याचा आनंदच काही और होता. अर्धी मजल जणू मारून नेलेली मी.
आत दोन प्रमुख सरकारी कारकून बसलेले आणि त्यांच्या मदतीला दोन तीन कर्मचारी
होते. व्यवस्थित दोन टेबलांवर एक थोडे प्रौढ असे गृहस्थ व बाजूच्या टेबलावर एक
तरुण बाई बसल्या होत्या.
खोली मध्ये जाऊन प्रथम खात्री करुन घेतली नी हातातली पावती त्यातील बाईंसमोर
ठेवली. पावती वरचा मजकूर तपासून त्यांनी कर्मचार्यांना
काही फाईलस शोधायला सांगितल्या व बऱ्याच मुश्किलीने अक्षरांची जुळवाजुळव करीत अखेर
त्यांना पाहिजे ती फाईल मिळाली. त्यातील संबंधित माहिती माझ्या कागदावर आहे नाही
ह्याची खात्री करुन त्यांनी मला सांगितलं. “उद्या या तुमची फाईल शोधून ठेवतो.”
माझे त्या दिवसाचे तिथले काम संपलेले. परत जायला मुलाला रिक्क्षा मध्ये बसवून थेट घर गाठलं. जाण्यायेण्यात जवळपास पूर्ण दिवस
खर्ची पडलेला.
रात्री ह्यांना घडलेलं सर्व फोनवर सांगितलं. हे काहीच बोलले नाहीत त्यावर.
दिवसभरच्या धावपळ दगदगीने कंटाळा आलेला. पुन्हा उद्या तिथेच जायचं होतं आम्हा
दोघांना. काम होईल किंवा नाही ह्याची मनातून अजिबात धास्ती नव्हती कारण फक्त जाऊन
पावती दाखवून आपली कागदं घेऊन यायची गोष्टं काही कठीण म्हणण्यासारखी अजिबातचं
नव्हती. ठिकाण घरापासून खूप दूर असल्याने अर्धादिवस तर उपासमारीतच गेलेला आमचा.
रात्रीचे जेवण कसेबसे उरकून झोपून गेलो आम्ही मायलेक.
कॅलिफोर्निया वाल्यांचे आयुष्य सुद्धा आता रुळावर लागलेलं. अपार्टमेंट मध्ये जरुरीचे
सर्व फर्निचर होते. मोठे अपार्टमेट असल्याने प्रत्येकाला स्वतःची स्वतंत्र खोली
होती.
कॉस्को होलसेल मार्केट व भारत बाजार सारखे इंडियन स्टोर आता चांगले परिचित
झाले होते. घरातील मोठाल्या फ्रीज मध्ये आठ दहा दिवसांचं समान चांगला राहायचं.
दुधाचे चार चार लिटर चे एक दोन कॅन आठवड्याला पुरायचे.
सकाळचा दुध सिरेअल व फळांचा नाश्ता करुन दिवसाला सुरुवात करणे सोप्पे होते.
लाइफ सेट झाली म्हणाना!
- मधु निमकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा