अमेरिकेला येऊन आता ह्यांना दोन महिने पूर्ण झालेले. परंतु प्रत्येक दिवस कामाच्या दृष्टीने महत्वाचा होता. इथे आल्यावर परदेशात स्थानांतर करण्याऱ्या प्रत्येकाच्या मनातील पहिला प्रश्न म्हणजे त्यांच्या मुलांची नी कुटुंबियांची सुव्यवस्था...
अमेरिकेत मुलांना शालेय शिक्षण मोफत आहे. तसेच ती ज्या
भागात राहतात तेथील शाळांना त्यांना प्रवेश देणे सक्तीचे आहे. परंतु शाळेत नाव
घालायच्या आधी शाळेचं रेटिंग बघणे आवश्यक असते. त्याच्या ग्रेड्स इंटरनेट वर उपलब्ध
असतात, त्यांचा विचार करणे आवश्यक असते.
शाळेच्या ग्रेड्सवर घरे किंवा अपार्टमेंटची भाडी किंवा त्यांचे
भाव कमी-जास्ती होत असतात. शाळेवर वस्ती अवलंबून असते म्हणावे किवा वस्तीवर शाळा
हा एक मोठा वादाचा मुद्दाच आहे!
अमेरिकेला स्थायिक
झालेल्या दोघा मित्रांपैकी ऑफिसच्या जवळ राहणाऱ्या मित्राच्या जवळच अपार्टमेंटमध्ये
राहायचं सर्वांनी निश्चित केलं.
एकाने त्यात परिवाराला न
आणण्याचा निर्णय सांगितला. त्याच्या बायकोला मुलाची शाळा बदलली तर मुलाच्या
अभ्यासावर परिणाम होईल असा वाटत होतं. तसचं घरी सुद्धा वृद्ध व्यक्तींची देखभालीची
जवाबदारी म्हणून तिने न यायचा निर्णय घेतलेला. आठवड्याच्या दिवसांना ऑफिसच्या
जवळच्या हॉटेलमध्ये व सुट्टीला नातेवाईकानकडे तो राहायचा. जमेल तसं बाहेर
जेवून-खाऊन त्यांनी राहायचं ठरवलेलं.
साधारण दोन महिने हॉटेलमध्ये राहिल्यानंतर विचारपूर्वक
सर्वांनी थोडे दिवस एकाच अपार्टमेंटमध्ये राहायचे ठरवले. त्यामुळे भाड्याचे पैसे
सुद्धा सर्वांमध्ये विभागले गेले. कामावरच्या लोकांकडे थोडी चौकशी केल्यावर
राहायचा एरिया निश्चित केला.
मुंबईला हक्काचा flat असल्याने
आम्ही इथे निश्चिंतच होतो. ह्यांनी त्यात मला एक काम दिलं. आमच्या घराची
नोंदवल्याची कागदपत्रे सरकारी कचेरीतून घेऊन यायची जवाबदारी.
एक दिवस ह्यांनी फोनवर
मला एका फाईलचं वर्णन करुन त्यातील एक छोटी कागदाची पावती शोधायला सांगितली. मिळाल्यावर ती
घेऊन वांद्र्याच्या एका ऑफिसमध्ये जाऊन घराची कागदपत्रे घेऊन यायला सांगितले. मला
काहीच समजलं नाही त्यातलं प्रथम. पण जवाबदारी समजून ते काम मी पूर्ण करायचं ठरवलं.
त्याचं वेळी मला अजूनही
एक काम करायचं होतं. ते म्हणजे माझा नी मुलाचा पासपोर्ट काढायचं. खास दोनही कान
दिसतील असा फोटो पाहिजे अशी सक्ती असल्याने नवीन फोटो काढणे अपरिहार्य होते.
पासपोर्टसाठी लागणारा
फॉर्म, फोटो व आवश्यक त्या सर्व गोष्टी मी जवळच्या पासपोर्ट कार्यालयात जमा केल्या
आणि वाट बघत राहिले कधी पासपोर्टचं काम पूर्ण होऊन तो माझ्या हाती पडतो आहे.
काही लोकांनी मला सांगितलं
आमचा पासपोर्ट पंधरा दिवसात तयार होऊन घरी आला. तर काहींनी सांगितलं दीड महिना तर
काहींनी सांगितलं सहा महिने लागले.
पासपोर्टच्यासाठी घरी पोलीस चौकशीसाठी येतील व मग काही दिवसात
तुमच्या हाती तो पडेल अस पासपोर्ट ऑफिसवाल्यांनी सांगितलं मला.
कामाला उशीर नको म्हणून थोड्या दिवसांनी मी
पोलीस ठाण्याला चौकशीसाठी एक दोन हजेऱ्या लावल्या व त्यांना आमचा पासपोर्टचा अर्ज
मिळाल्याची खात्री करुन घेतली.
वेळ महत्वाची ह्या साठी कि मुलाची इथली शाळा
संपली होती व लवकरात लवकर तिथली शाळा चालू व्हायच्या आधी पासपोर्ट व व्हिसाचं काम
करुन अमेरिका वेळेत गाठण आवश्यक झालं होतं.
तेथील पाहिजे त्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी
वेळेत मुलाला शाळेत दाखल करणे हे सर्वात महत्त्वाचे काम होते. शाळेत प्रवेशासाठी
टक्केवारी, देणगी हा प्रकार नव्हता. परंतु कुठलीही दिरंगाई उपयोगाची नव्हती.
ठरल्याप्रमाणे पोलिसांनी वेळेवर घरी चौकशीसाठी
हजेरी लावली व आमच्या माहितीची पूर्ण शहानिशा करुन घेतली.
आता वाट बघण्याशिवाय काही उपाय हाती राहिला
नाही.
एक दिवस आमच्या बिल्डिंगमधली मैत्रीण मला लिफ्ट
मध्ये भेटली....आणि तिने माझी विचारपूस केली तेव्हा माझा पासपोर्ट तयार व्हायची मी
वाट बघते आहे असं तिला समजलं. ती मला म्हणाली “मी तुला त्याची माहिती काढायला मदत
करते. माझ्या काही ओळखी आहेत.”
सुंठी वाचून खोकला गेला तर कुणाला नको असणार?
तत्काळ मी माझी आणि माझ्या मुलाची आवश्यक ती माहिती तिला दिली.
तिने सांगितलेलं नाव बहुतेक कुठल्या तरी मोठ्या
नेत्याचं होतं. त्याचा काहीही फायदा झाला नाही. पोलिसांनी मला भेटल्यावर
सांगितलं...”अहो! आम्हाला ह्या ह्या व्यक्तीनंकडून फोन आला होता तुमच्यासाठी. तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर हा
कागद बघा आम्ही तुमचा पासपोर्टचा फॉर्म पाठवून दिलेला आहे. आता आमच्या हातात ते
काही नाही. आम्ही तुमचा अर्ज थांबवून ठेवलेलाच नाही आहे..”
सर्व काही ठरलेल्या वेळेप्रमाणेच चालू होते, पण
एकटीने सर्व पार करायचं ह्या विचारांनी मन जास्तच सतर्क झालेलं.
त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांनी माझा व मुलाचा
पासपोर्ट आमच्या हाती पडला व एक मोठं महत्वाचं काम पूर्ण झाल्याबद्दल हायसं वाटलं.
तत्काळ माझ्या व मुलाच्या व्हीस प्रोसेसिंगचं
काम ऑफिसवाल्यांनी चालू केलं.
व्हीसाचं काम बघणारी मेलिसा लवकरच मैत्रीण बनली
माझी. जवळच्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका ह्यांच्या सहचार्याजवळ तिने बरेच काही
कागद माझ्याकडे भरायला पाठवले. दोन वेळा ऑफिसला सुद्धा त्यासाठी भेटी दिल्या, कुठे
कुठे सही राहिली म्हणून अजून काही कामासाठी वगैरे वगैरे..
एकदाची व्हिसा प्रोसेसिंगची क्रिया चालू
झाली.....
एकीकडे हे फोन वर मला मार्गदर्शन करत होते, तर
दुसरीकडे मेलिसा माझ्याकडून पटापट कागद पत्रांची तयारी करुन घेत होती. विश्वासाने
ती जे काही सांगेल ते डोळे झाकून मी ऐकत गेले, सह्या करत गेले आणि व्हिसा
प्रोसिस्सिंगसाठी अखेर रेडी झाला.
--मधु निमकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा