नवीन आठवड्याला नव्या जोमाने कामाला सुरुवात झाली. पुन्हा ती छोटी पावती घेऊन
सरकारी कचेरी गाठलीच.
छोटा वितभर कागद म्हणजे एक बंद रुपयाची नोटच नसते. त्यापेक्षा सुद्धा खूप मोठी
किमती वस्तू असू शकते ह्याचे मला प्रत्यंतर आले.
मोठ्या व्यवहाराच्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्याची ती एक छोटी
परंतु महत्वाची साक्षीदार होती.
कचेरीतल्या कर्मचार्यांना पहिली प्रत व पावती दाखवून जोड प्रत हवी म्हणून
सांगितली. माझी मागणी (?) ऐकून अचानक काहीश्या आविर्भावाने त्यांनी जणू माझा
शिकवणीचा वर्गाच घेतला. हे ऐकून जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी असावी,
परंतु सत्य तेच आहे!
कायदेशीर बाबी पूर्ण केल्यावर दहा वर्षांनी कसले सल्ले एइकुन फायदा होता सांगा
ना?
सरकारी कचेरीत नाही तर ह्या वेळी मी जणू एका कोर्टात उभी होती. समोरच्या
सरकारी कर्मचार्याने माझ्या पावतीची लगेचंच दाखल घेतली आणि मला तिथेच
तत्त्वज्ञानाचे डोस पाजायला सुरुवात केली.
म्हणाले,” तुम्ही अश्याप्रकारे घर बदलूच शकत नाही. प्रोब्लेम आहे!...असा
करतंचं नाहीत.” “तुम्ही बिल्डिग बदललीत, मजला बदललात, आणि flat सुद्धा
बदललात.....कायदा असं असं सांगतो.”
हे ऐकून मी स्तब्ध झाली. सामान्य घरची माणसं, प्रामाणिकपणे आयुष्य जगत आलो
इतके दिवस....आणि त्यात ह्यांचा तर सभ्यातेसाठी लोक आयुष्यभर दाखला द्यायचे. काय
बोलत आहेत हे लोक तेच मला समजेना. आणि त्याहून ही जास्त म्हणजे काय करायचे हे
सुद्धा सुचेना!
घरी परत आले आणि ह्यांच्या जवळ बोलायचं ठरवलं. सर्व प्रकरणाची शहनिशा करुन
घेतली पुन्हा.
दुसर्या दिवशी त्यांनी पुन्हा आपसांत बोलत मला दुसर्या ऑफिस मध्ये पाठवलं.
सांगितलं हे ह्या ह्या ऑफिस मध्ये आहे.
दुसर्या एका ऑफिसमध्ये गेले आणि तिथून मग दूर असलेल्या तिसऱ्या ऑफिसमध्ये
सुद्धा...
नटसम्राट मधले अप्पासाहेब बेलवलकर आठवले...”कुणी घर देता का घर म्हणणारे...”
“अरे मालकीचं आहे घर आमच्या...असं कसं शक्य आहे कुणी बोलणं? कायदेशीर बाबी
पूर्ण करुन मोठ्या कंपनी कडून कर्ज देखील घेतलेलं त्या घरावर आम्ही. ते कसे काय
शक्य आहे??.....”
फार उदासीनता आली मनाला...
माझ्यावर सोपवलेलं काम मी पुरं करू शकले नाही. शिकल्या सावरलेल्या बाईकडून इतक
सुद्धा छोटं काम होऊ नये ह्याची मला स्वतःला लाज वाटू लागली.
वाटलं हे म्हणताहेत ते खरे आहे का खोटं? पण मला कागद मिळाले नाहीत तर? काहीही
करुन मला कुणाची तरी मदत घेतली पाहिजे.
दोन तीन इस्टेट एजंट ची दुकानं सुद्धा पालथी घातली त्यासाठी. त्यांना विचारलं
तुमचं कुणी सरकारी दफ्तरात ओळखीचं असेल त्याच्याकडून माहिती काढून सांगा जरा.
पुरवणी आहे ना नक्की ह्याची तरी खात्री यावी. (जुनी गोष्ट म्हणून सर्व विसर पडलेला
मला सुद्धा)
आमचा जागा घेतलेला एजंट मला सापडला नाही दुर्दैवाने...त्याने तो धंदा बंद
केलेला....नाही तर त्याला पहिलं विचारलं असतं मी..
प्रत्येकाने ठराविक रक्कम लागेल असं सांगितलं. दुकानाप्रमाणे रक्कम बदलत होती.
एका मोठ्या इस्टेट एजंट च्या दुकानात घाबरत घाबरत गेले एक दिवस. चकचकीत ग्रानाईटने
चमचमणार्या वातानुकुलीत बंगलाचं होता तो. मला एकदम आतील खोलीत बसलेल्या बाईंची भेट
घालून दिली. थोडा वेळ थांबायला सांगून तिने कुणाजवळ तरी बोलणं केलं. मला म्हणाली
“सव्वा लाख रुपये मागत आहेत कामाचे. काम होईल.” “सव्वालाख तिच्या साठी लहान रक्कम
असेल माझ्यासाठी नव्हती. आणि सव्वा रुपया सुद्धा लाच द्यायची माझी इच्छा नव्हती.”
माझ मन हे सर्व ऐकून खरचं दुखावलं गेलं. उगाचंच कुणाला त्रास देणार्याला
सोडायचं नाही असा मनाने मी निर्धार केला. त्यांना पैसे देऊ केले तर माझ्या
प्रामाणिकपणा विषयी मीचं शंका घेतल्या प्रमाणे होईल ह्या विचारांनी स्वतःला पुन्हा
उभा केलं मी. त्यांना वाटते तितकी आम जनता नाही मी. माझ्या मध्ये नक्कीच त्यांना
वठणीवर आणायची ताकत आणि हिम्मत आहे ह्याची मला खात्री होती. (त्या शिवाय खरं तर
दुसरा पर्याय सुद्धा शिल्लक दिसला नाही मला)
काहीतरी मनाशी ठरवून पुन्हा दुसर्या दिवशी त्यांची शेवटला पाठवलेली कचेरी
गाठली.
आतील जबाबदार व्यक्तीला भेटायची इच्छा व्यक्त केली. आणि त्यांना सांगितलं मला
माझी प्रत तुमची माणसं देत नाही आहेत. मी एक पत्रकार आहे. मी तुमचे हे सर्व लोकांसमोर
आणेन!
सरळ भाषेत सांगितलेली त्यांच्या कामाची गोष्ट त्यांना लगेच समजली. त्यांनी
कचेरीवाल्यांना फोन लावून सांगितलं, “ही व्यक्ती तुमची मैत्रीण आहे. तिला ते कागद
द्या.” मदतीने पहिल्या कचेरीत गेल्यावर काही सेकंदातच माझा कागद समोर असलेल्या
छोट्या खणातून काढून माझ्या हातावर ठेवला गेला.
काही कागदावर सही करायला मला पुन्हा दूरच्या ठिकाणी जायची वेळ आली. त्या
व्यक्तीने आपल्या हाताखालील कर्मचार्यांना पुन्हा आदेश दिले...”तुमची मैत्रीण आहे
ती...तिला मदत करा!”...मैत्रीण मैत्रीण पुटपुटत माझं काम अखेर पूर्ण केलं गेलं.
हे जेव्हा आम्हाला न्यायला आले होते तेव्हा सासुबाईनी ह्यांना सांगितलं तिने
खूप त्रास घेतला... त्यांना माझा वाटणारा अभिमान त्यांच्या डोळ्यातून दिसत होता.
लोकमान्य टिळकांची कथा आठवते मला आज... एकदा वर्गात शिक्षक नसतांना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच
टाकली होती. अपेक्षेप्रमाणे हा कचरा
पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणाऱ्यांची नावे
विचारली. पण जेव्हा कुणीच स्वतःहून
पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी
सर्व मुलांना टरफले उचलायला सांगितले. पण टिळकांनी टरफले उचलायला
नकार दिला. ते म्हणाल, "मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही".
बरोबर आहे...हाच आदर्श ठेवून मी अखेर जिंकून
दाखवलं!
-मधु निमकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा