सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

आठवणीतली 'Manchester'ची सहल...




 अमेरिकेत राहायला गेल्यावर पहिल्या काही दिवसातच ‘Manchester’ च्या mendocino गावच्या किनारपट्टीवरील ‘KOA KAMPGROUND’  ह्या ठिकाणाला तीन दिवसाच्या सहलीला जायचं नक्की झालं!

प्रशांत महासागराच्या किनारपट्टीला लागून असलेलं कॅम्पिंगसाठी, तसेच समुद्र किनारपट्टीचे टुरिस्ट ठिकाण म्हणून  कॅलिफोर्नियातील ‘Manchester’ हे अतिशय प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. समुद्रकिनारा, beach walking, tide pooling, abalone diving, दोन लाईटहाउस, anderson valley, तसेच प्रेक्षणीय mendocino गाव व उंचच्या उंच रेडवूडची जंगले हे तेथील विशेष मानलं जातं. जंगलात टूरिस्ट लोकांसाठी कॅम्पिंग किचन, recreation  हॉल सुद्धा उपलब्ध आहे. कॅम्पिंगची जागा भाड्याने आरक्षित करायची सोय टुरिस्ट लोकांसाठी  केलेली आहे. जंगल असलं तरी हिंस्त्र श्वापदांपासून ते मुक्त आणि सुरक्षित असं ठिकाण आहे.

तिथे जाण्यासाठी, तसेच कॅम्पिंगसाठी आम्हाला सामानाची मोठी खरेदी आवश्यक होती. कुटुंब मावेल इतका मोठा तंबू, battery वर चालणारा लामण दिवा, मोठी टोर्च, अंथरायला ताडपत्री, अन्न शिजवायला gas वगैरे बेसिक खरेदी आम्ही केली. तिथे छोटे portable सिलेंडर विशेषतः सहल किंवा कॅम्पिंगसाठी वापरले जातात. राहिलेल्या  सामानाची सर्व तयारी स्वप्नील-सुलभा आणि त्यांचे मित्र करणार होते. त्यात शीतपेटीतून काही फ्रोजन फूड, पेय वगैरे खाण्या-पिण्याच्या गोष्टी आणि इतर आवश्यक ते रेशन होते.  

सहलीच्या चार दिवस आधी “कॅम्पिंगच्या ठिकाणी रात्री तापमान ३ डीग्री पर्यंत खाली जाणार आहे, गरम कपडे आवश्यकच आहेत” असे मला आधीच १०० वेळा सुलभाने बजावू सांगितलेले.

तिने दिलेली सूचना मी मनावर घेतली परंतु ह्यांची खात्री पटेना. उन्हाळ्याच्या दिवसात कसले तीन डीग्री तापमान खाली जाणार? असा त्यांनी अंदाज बांधलेला. नको त्या सामानाचे उगाच ओझे कशाला म्हणून मला त्यांनी थंडीचे कपडे घेऊच नकोस म्हणून बजावले.


स्वप्नीलच्या मोठ्या गाडीतून दोन्ही कुटुंब एकत्र जायचं आमचं ठरलं. त्यामुळे सर्वांना समान मर्यादित ठेवणं योगायोगाने आलंच... उन्हाळा असल्याने रात्री तापमान इतके खाली जाईल हे शहरातील उकाड्यात अशक्य वाटले तर नवल नाही..

अमेरिकन पद्धतीनुसार सकाळी घराबाहेर पडायच्या आधी दिवसाचे तापमान बघणे. ऋतूमानानुसार आठवड्याच्या  तापमानाचा, पावसापाण्याचा अंदाज घेणे हि जणू घरोघरी प्रथाच आहे...अमेरिकन वेधशाळा इंटरनेटवर तासागणिक दर पंधरा दिवसांचे तापमान एकदम अचूक देते. आपण फक्त ठिकाणाचे नाव टाकायचे, सर्व तपशील यथायोग्य रंगरंगोटी सहित तुम्हाला क्षणार्धात वेब साईटवर सादर केला जाते.असो!

अखेर कॅम्पिंगच्या दिवशी गाडीमध्ये बसतांना ह्यांनी माझ्या सामनातील गरम कपडे मला घरी ठेवायलाच लावले. सुदैवाने जीन्स आणि जेकेटच्या आत लपवत मी एक छोटा स्वेटर ह्यांना दिसणार नाही अश्या प्रकारे घातलेला, आणि मुलाला सुद्धा थंडी लागणार नाही अश्याप्रकारे कपडे एकावर एक घालून ठेवलेले. तितकेच काय ते सौरक्षण आमच्याकडे शाबूत राहिले.

‘San Jose’ ते ‘Sanfrancisco च्या उत्तरेकडील ‘Manchester’च्या जंगलापर्यंतचे २०० मैलाचे अंतर ४-५ तासात आम्ही पार केलं. तंबू वगैरे उभारे पर्यंत रात्र झालीचं!

सुटका झाल्याप्रमाणे मुलं खेळायला निघून गेली व आम्ही तिघी स्वयंपाकात गुंतलो. एकीकडे ह्या लोकांनी कॅम्पफायरलावला. त्यामुळे वातावरण निर्मिती छान झाली. मुलांची जेवणे झाली. सर्वजण वातावरणाचा आनंद घेत होते. पुरुष मंडळीही हळू हळू पार्टीमध्ये गुंतलेली. होता-होता गर्द झाडीमध्ये अंधाराबरोबर थंडी वाढू लागली.

जंगलाचा काळाकुट्ट अंधार, वाढणारी थंडी.....प्रवासाचा थकवा घालवायला प्रत्येक जण आपापल्या तंबू जवळ प्रस्थान करू लागले.....खाली जात अखेर तापमान रात्री तीन डीग्रीच्या खाली पोहोचलेच...तोंडातून बोलतांना वाफा येऊ लागल्या..

भारतीय वेधशाळेप्रमाणे अमेरिकन वेधशाळांचे अंदाज कधीच चुकत नाहीत, आमच्यावर एक मोठा आयुष्याचा धडा घ्यायची वेळ होती ती....भरीत भर म्हणून कि काय सर्वांनी आपापल्या तंबूच्या खिडक्या कपडा आच्छादून बंद केल्या आणि आम्हाला सांगायला ते विसरून गेले.

मग काय...बाहेर तीन डीग्री तापमान आणि तंबूच्या आतही तीन डीग्री तापमान...बरोबर असलेली blanket वगैरे सुद्धा थंडी पासून रक्षण करायला अपुरी पडली आम्हाला. हातमोज्याच्या मधून देखील थंडी बाधू लागली. माझी गारठून कुल्फी जमायला लागली. मुलाला पुरेसे कपडे घातल्याने ‘हूड’मध्ये तो शांत झोपी गेलेला. ह्यांना सुद्धा थंडी विशेष लागत नव्हती. परंतु रात्र जशी जशी वाढत गेली, तशी तशी थंडीने देखील माझ्या सहन शक्तीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. अगदी हाडाच्या टोकापर्यत थंडी पोहोचणे म्हणजे काय हे मला त्या क्षणी पुरते समजले. गोडगुलाबी नाही तर जीवघेणी थंडी!!...हात पाय पुरते गारठले...शरीराचा आणि मनाचाही थरकाप उडवणारी थंडी!!!!

थंडीने इतके इतके बळी ह्या वर्षी गेले अश्या बातम्या अनेकदा वाचलेल्या मला आठवते. तो काय प्रकार असू शकतो ते मला त्या वेळी समजले. मनातून दुख सुद्धा होत होतं. एका सध्या थंडी पुढे आपलं काही चालू नये ह्या गोष्टीने काहीशी लाजिरवाणी अवस्था झाली!

बाहेर गाडीचा हीटर लावून स्वप्नीलच्या मित्राची बायको ३-४ महिन्याच्या लहान बाळाला घेऊन थंडी बाळाला बाधू नये म्हणून गाडीत बसलेली.  कुणाला बोलायला देखील अवघड जावं अशी वेळ होती. माझ्याकडे सांगायला काहीही सबब नव्हती. आपल्यामुळे लोकांची गैरसोय व्हावी हे मनाला पटतही नव्हतं. शेवटी निराश होऊन मी मनात म्हटले,” मी उद्याचा दिवस काही बघत नाही.आणि दुसर्या क्षणी रात्र कधी सरते ह्याची तंबूत थरथरत वाट बघत बसले. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही आमचा. माझ्यासाठी तर सर्वात मोठी रात्र होती ती. वाचेन किवा नाही ह्या द्विधा अवस्थेत रात्र एकदाची पार पडली. सूर्याचे आगमन झाले नसल्याने अजूनही चांगलीच थंडी जाणवत होती. सकाळी जवळच्या मार्केटमध्ये जाऊन गरम कपडे आणायचे नक्की करुनचं तंबू बाहेर पडलो आम्ही.

आमच्या प्रमाणेच बाकी दोन्ही कुटुंबे रात्रभर झोपली नव्हती. फक्त त्यांची कारणे भिन्न होती.

लहान बाळाला अशी थंडी चांगली नाही म्हणून स्वप्नीलच्या मित्राने माघारी फिरण्याचा निर्णय घेतलेला. सुलभाचीही प्रकृती खूप बिघडलेली. काहीश्या आजारपणाने तिला रात्री उलट्यांचा त्रास सुरु झालेला. म्हणून स्वप्नीलने देखील घरी परत जायचा विचार बोलून दाखवला.

सामानाची लवकरच बांधाबांध करुन आम्ही घरी परतलो...

दुर्दैवाने मला पुन्हा तिथे जायची कधी वेळ आली नाही!

एक मोठा धडा पहिल्याच सहलीला आम्हाला मिळालेला....निसर्ग आपले रूप दाखवणारच, परंतु माणसाने ते समजून घेतले, स्वीकारले तरचं त्याला आनंद मिळतो. 

-मधु निमकर

(दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात २२/०९/२०१३)

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा