गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

प्रवासाच्या वाटेने


जर्मन टुरिस्ट विसा मिळवल्यावर आम्हाला ताब्यातील समान एका बसपर्यंत घेऊन जायला सांगितले. बसच्या खाली लगेजमध्ये समान सर्वांनी जमा केलं.

आमच्या बरोबरील मराठी स्त्री कुटुंबीयांनी बरोबरीच्या bags लगेजमध्ये जमा केल्या आणि खांद्यावरची सामानाची bag आणि मुलाची बाबा गाडी (स्ट्रोलर) संभाळत संभाळत बस मध्ये जाऊन बसल्या.  

बस काही क्षणातच एका कोपऱ्यात येऊन थांबली आणि लोक पटापट खाली उतरू लागले. हॉटेलपर्यंत पोहोचल्याची ती खूण होती. काही समजायच्या आतंच बस रिकामी झाली. प्रत्येक माणूस स्वतःचे लगेज ताब्यात घ्यायला खाली उतरला. गर्दीमध्ये माझ्या bags ताब्यात घ्यायला खूप उशीर झाला. मागे वळून बघते तो जवळपासची माणसं कधी पांगून गेली ते समजलेच नाही. काहीसा अंधार पडायला लागलेला.

हातात तीन bags, खांद्यावर पर्स आणि बाजूला लहान मुलगा....

मला हे कुठे दिसेनात......

जवळपास ओळखीचं सुद्धा कुणीही नव्हते. दहा पावलांवर समोर हॉटेल दिसत होते....वाटेतील दोन तीन जर्मन लोक मला बघून ‘पाकिस्तान, पाकिस्तान’ बोलले.....ह्या पेक्षा भारतीय माणसाला दुसरी शिवी कुठलीही नसेल....परदेशात जाऊन ‘पाकिस्तानी’ म्हणवून घ्यावे? काहीश्या कावर्या बावर्या अवस्थेत भीत-भीत मी त्यांच्याकडे बघितलं. वाटलं समजवावं लोकांना...”मी पाकिस्तानी नाही, भारतीय आहे...पण माझी भाषा त्यांना समजेल का?”

विचार करे-करे पर्यंत ते लोक अदृश्य झाले सुद्धा....पुन्हा भानावर आले मी...’हे कुठे आहेत?...ह्या bags मला आता एकटीला न्यायला लागणार?....वाटेत मी एकटीच उभी होते आणि बरोबर समान आणि मुलगा....जवळ फोन वगैरे काहीही नाही. शेवटी जमेल तश्या अवस्थेत समान सांभाळत आणि मुलाला बरोबर यायला सांगत हॉटेलच्या दिशेने चालायला सुरुवात केली....

दोन पावले चालले असेन इतक्यात हे समोरून आले. मला काही समजायच्या आत म्हणाले मी आलोच, म्हणून पुन्हा काही समान घेऊन निघून गेले...

स्त्री कुटुंबीयांनी स्वतःच्या सर्व bags ह्यांच्या कडून हॉटेल पर्यंत पोहोचवून घेतल्या...एका खेपेत समान नेणं  शक्य नव्ह्तं म्हणून ह्यांनाही दोन खेपा घालायला लागल्या त्यांचे समान पोहोचवायला.

मला खूप राग आला...”स्वतःला झेपणार नाही इतक्या गोष्टी लोक बरोबर कुठल्या हिशोबाने घेतात?....घरच्या लोकांनी सुद्धा ह्याचा विचार करायला हवा का नाही? स्त्री-पुरुष समानता म्हणतात, मग स्वतःच्या मर्यादा सुद्धा ओळख ना....थोडी मेहनत स्वतःच्या सामानासाठी त्यांनी घ्यायला काही हरकत नव्हती, निदान चार पैकी दोन bags तरी घ्यायला हव्या होत्या? विमानाच्या सर्व प्रवासी bags ना चाके असतात, आणि छोट्या कॅबीन bags ची वजने सुद्धा मर्यादित असतात....लोकांनी स्वतःचं बघायचं का इतरांचं ....? विमानाचा पहिला प्रवास आमचा होता, ते तर तीन वर्षे अमेरिकेतच होते ना राहत?..........

फार चलाख होत्या दोघी माय लेकी....हॉटेल मध्ये पोहोचल्यावर त्या कुटुंबीयांनी ना स्वतःची खोली सांगितली ना तोंड दाखवली पुन्हा.

एक दुनियादारी म्हणून त्यांना मदत नाकारणे सुद्धा बरे झाले नसते परंतु त्यांना मदतीची खरी गरज आहे का हा सुद्धा विचार करण्याचा मुद्दा आहे.

असो!...लगेचंच आम्हाला आमच्या रूमची चावी ताब्यात दिली गेली. राहायची व्यवस्था चांगली असेल असे मी झालं गेलं सर्व बाजूला ठेवून मनाला समजावत होते.

जेमतेम समान आम्ही रूमवर ठेवले आणि जेवायचे आमंत्रण आले.

रात्र विमानात गेलेली. विमानातील प्रवासाच्या तीन bags आणि खांद्यावरची छोटी पर्स एवढेच सामान जवळ होते. त्यात आत काय आहे नी काय नाही हे समजायचा मार्ग नव्ह्ता. गोंधळात जे काही जसे काही मिळेल तशी त्याची मी व्यवस्था लावलेली. प्रश्न फक्त काही तासांचाच होता म्हणून विशेष विचार केला नव्ह्ता मी. त्यातून एवढ्या मोठ्या प्रवासाचा अनुभव सुद्धा नवीनच होता आमचा.

सामानात ठेवलेले टूथ ब्रश कुठे तरी गेलेले....अगदी मर्फीज law प्रमाणे....तसेच जमेल तसे फ्रेश होऊन जेवायला गेलो मग.

जेवायला बफे ची व्यवस्था होती. खूप सारे पदार्थं होते. स्त्री कुटुंबीय मजेत बश्या हलवत जेवताना दिसले. आमच्या जवळ जणू बोलायचं नाही असं काहीसं ठरवलेलं बहुधा...समोर आल्यावर काहीतरी एक दोन शब्द बोलल्या सारखं करुन पुन्हा आपल्या वाटेला निघून गेली ती. तिच्या आईची मराठी ची हौस सुद्धा पूर्ण भागलेली असावी. आमच्याकडे दुर्लक्ष करुन ते लोक जेवून आपल्या वाटेला निघून गेले.

लोक म्हणतात “नेकी कर दरिया मे डाल...” तशी मी सर्व रागलोभ मनातील दरिया मध्ये टाकून बफे ला दृष्टीक्षेपात आणले. अस्सल मांसाहारी कॉन्टीनेटल मेनू हॉटेलवाल्यांनी सर्वांना खुश करायला बनवला असावा. शाकाहारी म्हणण्यासारखे म्हणजे एक स्वीट corn सूप, ब्राऊन राईस आणि घासफूस (सलाड).

समोरचा मेनू बघून माझं अवसान पार गळून गेलं. आजूबाजूला नजर मारली तर सर्व लोक जेवण पटापट संपवून रूम वर निघण्याच्या घाईत दिसले. रात्र सुद्धा खूप झाली होती. हॉटेल मध्ये अजून जेवण ओर्डर करणे सुद्धा शक्य नव्हते. आता मी काय जेवले असेन हे शोधून काढायची जवाबदारी तुम्हा वाचकांची....

सकाळी नाश्त्याला हॉटेलवाल्यांनी रात्रीच्या माझ्या जेवणाची कसर भरून काढायचं  ठरवलेलं जणू...काही सिरेअल्स, फळे, केक्स, दूध, ज्यूस वगैरे, हयात जे काही गोड म्हणावे ते सर्व समाविष्ठ होते. मिष्ठान्नाचा नाश्ता म्हणाना!

केक हे प्रिय खाद्य असल्याने आदल्या दिवसाच्या मांसाहारी आहारावरून झालेली निराशा दूर झाली. जरा अतीच गोड होते सर्व पदार्थ....त्यात केक वरचा जाड ‘स्ट्रोबेरी जाम’ सारखा थर तर अगदी गुलाबजामना मागे टाकेल इतका गोड होता....काहीही असो मी खुश झाले!

बसं आता काही तास आणि मी पोहोचणार....

विमानाच्या पुढील प्रवासाला आम्ही तयार होतो. महाराष्ट्रीयन मायलेकी आधीच सर्व उरकून विमानात जागेवर जाऊन बसलेल्या. विमानातून उतरल्यावर पुढील प्रवासाच्या आमच्या वाटा वेगळ्या होणार होत्या.

आपण म्हणतो नाती जुळतात पण परदेशातील लोकांचा प्रकारच काही और असतो. अमेरिकेला पोहोचल्यावर मला ही स्त्री सोशल नेट्वर्किंग मध्ये माझ्या शिक्षण संस्थेच्या ग्रुप मध्ये भेटली. नावाने आणि चेहऱ्याने मी तिला लगेच ओळखले देखील. स्वतः हून तिने मला फ्रेंड व्हायला आमंत्रण सुद्धा पाठवले....मी ते स्वीकारले.

एक दिवस मी तिला विचारले तू आणि मी एका प्रवासात भेटलेलो तर म्हणाली,”ती मी नव्हेच....” परंतु मी तिला सोडले नाही. अखेर तिला कबूल करायला लागले.

आज तिची आई देखील माझ्या मित्राच्या यादी आहे. माहित नाही मी त्यांना यादीमध्ये का ठेवले आणि हे पण मला ठरवणे शक्य नाही कि मी त्यांना मित्रांच्या यादी मधून कोणत्या कारणाने का काढावे?....असो, कुठे तरी गेल्या जन्मी तिने माझी मदत केली असेल...

जर्मनीच्या विमानतळावरून आमच्या विमानाने पुन्हा एकदा उड्डाण घेतले...

-मधु निमकर
 (दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात ११/०८/२०१३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा