गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

...आणि तो क्षण जवळ आला



छोट्या-मोठ्या बिझनेस ट्रिपा सोडल्या तर एकट्याने इतके दिवस दूर राहायची आमच्या नवराबायकोची ही पहिलीच वेळ होती. नाही नाही म्हणत ह्यांच्या मदतीची जाणीव जबाबदारी आल्यावरच मला आली.....कसलीही कुरबुर करायलाच आता वाव नव्हता.

जातांना ह्यांनी इंटरनेट वरून जमतील तितकी कामं स्वतःच्या ताब्यात घेतलेली. उदाहरणार्थ मेन्टेनन्स, इलेक्ट्रिक, फोनची बिलं भरणं वगैरे.....त्यामुळे बरेच निश्चिंत होतो आम्ही दोघेही.

इथे माझा दिवस कसा मुलामागे निघून जायचा हेच समजायचं नाही...आमच्या पासपोर्ट विसाची कामं सुरु करायची होती. दहा वर्षं रखडलेली जुन्या घराची कागदपत्रं सरकारी दफ्तरातून मिळवायचा पैजेचा विडा सुद्धा मी घेतलेला होता.

अमेरिकेविषयी कुतूहल मनांत होतंच. मी ह्यांना म्हणायची सुद्धा कि आपण अमेरिकेला स्थायिक होणार का? होऊया ना? वगैरे...परंतु ह्यांनी मला ठामपणे सांगून ठेवलेलं कि आपण फक्त तीन वर्षं तिथे राहणार आहोत. मग परत येणार...काहीही झालं तरीही. मला माहित होतं हे ह्यांचा शब्द खरा करणारच. म्हणून मी सुद्धा त्या प्रमाणेच स्वप्नं पाहिलेली ज्यांनी माझा कधी अपेक्षाभंग होणार नाही.

मुलगा लहान असल्याने तो वडिलांची आठवण काढेल अशी मला भीती होती. पण सर्व ठीक झालं. मुलगा नवीन मोठ्या शाळेत रमला होता. नवीन मित्र आणि वर भरपूर उद्योगांमध्ये मी त्याला गुंतवून ठेवलेलं. शाळेनंतर स्केटिंग क्लास, मग मनसोक्त पोहायला जायचा. पूल मधून बाहेरच यायची तयारी नसायची त्याची. मग थकून घरी येऊन लगेचंच झोपून जायचा.

अमेरिकेला जायच्या एक आठवडा आधी, एक दिवस ह्यांनी मला जवळ बोलावले आणि इंटरनेट शिकायला बसवलं.... म्हणाले,”.माझ्या जवळ तू इंटरनेट वरून बोल”.

एक छोटेखानी कॉम्पुटर कोर्स झालेला माझा कोण्या एकेकाळी तो सुद्धा काळाप्रमाणे कालबाह्य!..... हे सांगतात म्हणून काहीसं मज्जेखातरचं शिकलेले. अजून काही बोलले ह्या विषयी तर माझा अडाणीपणा म्हटलात तरीही मला स्वीकार आहे.....परंतु सत्य स्थिती तीच होती.

त्याचं कारण सुद्धा वाजवीच होतं....आमच्या घरी कॉम्पुटर फक्त मुलाचं मनोरंजन म्हणून घेतलेला. कॉम्पुटर गेम आणि ऑफिसचे काम ह्याशिवाय मला उपयोग माहीत नव्ह्ता. मध्यंतरी एक इंटरनेट चा कोर्स केलेला पुसटसा आठवत आहे. पण त्याचा उपयोग कधीच करू शकले नाही.

एका दिवसात तत्काळ सेवेप्रमाणे कॉम्पुटर आणि इंटरनेट माझ्या आयुष्यात येऊन दाखल झालं. एखादं कुरिअरचं पाकीट उत्सुकतेने उघडावं त्याप्रमाणे मला त्याचं कौतुक वाटलं.

मग काय म्हणून विचारता...इंटरनेट चा जिंनी माझ्या मर्जीप्रमाणे २४ तास ह्यांना माझ्या समोर आणून बसवायचा.

माझ्याबरोबर मुलगा सुद्धा तयार झाला इंटरनेटसाठी..... कॉम्पुटरची ही एक जमेची बाजूचं आहे कि लहान मुलांना तोः पटकन समजतो. आणि मोठी लोकं पैसे टाकून शिकायला जातात...

संशोधकाप्रमाणे संध्याकाळी हे घरी आल्यावर आमच्या दिवसभराच्या इंटरनेट वरच्या संशोधनाच्या गप्पा रंगायच्या. एक दिवस चुलत नणंदेच्या मदतीने नेट वरून बोलायचं कसं हे सुद्धा समजलं. 

एखाद्या सराईत प्रोफेसर सारखी मी कॉम्पुटर ह्या विषयात तयार झाले.                

 तिकडे ह्यांची सुद्धा घडी आत्तापर्यंत चांगली बसू लागली होती. ह्यांच्या एका मित्राच्या चुलत बहिणी शिक्षणाच्या निमित्ताने  सेन फ्रान्सिस्को येथे राहत होत्या. अमेरिकेला उतरताच विमानतळावरून थेट हॉटेल गाठल्यावर पहिलं काम त्यांनी करुन दिलं ते ग्रोसरी खरेदी करुन द्यायचं. अमेरिकेचं हेचं विशेष बरं का....काम कुठला ही असो तुम्हाला मदतीचा हात ना मागता मिळणारच!

दुध, आणि आवश्यक ते सामानसुमान विकत घेऊन  देऊन मित्राच्या भाच्या त्यांना संध्याकाळी सेन फ्रान्सिस्कोच्या किनार्यावर संध्याकाळी फिरायला घेऊन सुद्धा गेल्या.

शांत आणि स्वच्छ वातावरणात चित्रविचित्र माणसांची भरगच्च गर्दी...स्वच्छ निळ्या आभाळावर गुलाबी रंगाच्या छटा...आणि माणसांच्या पसार्यात कुठे तरी स्वतःला सावरत सावरत बसलेले हे दोन परदेशी. घरची आठवण, पुढची चिंता, आणि बरेच काही विचार मनात घेऊन मंडळी रात्री बाहेर जेऊन हॉटेल मध्ये परतली.

तिसऱ्या मित्राचे नातेवाईक मात्र येऊन त्याला स्वतःच्या घरी घेऊन गेलेले. त्याची साली बरेच वर्षं तिथे राहत होती. आपली बहिण आणि जिजू आपल्या बरोबर इथे स्थापित व्हावेत असा तिचा मनसुबा होता. आल्या आल्या त्यांनी जीजूंना एक आपली जुनी गाडी भेट दिली.

अमेरिकेला स्थानापन्न व्हायच्या तयारीनेच तो आलेला. मनाचा पक्का निर्धार असल्याने आणि नातेवाईकांचा पाठींबा असल्याने जणू त्याला कुणाचीच गरज उरलेली नव्हती.

अमेरिकेत गाडी नाही तर काही नाही. बाजूला सुपरमार्केट असेल तर गोष्टं वेगळी, परंतु असा विचार करणे सुद्धा एक दिवा स्वप्नाचं म्हटलं पाहिजे.

गाडी शिवाय तुम्ही तिथे पूर्णपणे परावलंबी किंवा काहीसे अधू आहात. कारण एक काडेपेटी सुद्धा घ्यायला तुम्हाला पायी जाणं शक्य नसतं. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे वेगचं प्रचंड असतात...पादचार्यांना चालायला सोय मोजक्या ठिकाणीच असते कारण कुणीही तिथे पायी चालत नाही. माणशी एक गाडी असं तिथलं समीकरण आहे.

अमेरिकेवरून सुखरूप पोहोचल्याचा ह्यांचा फोन आला आणि काहीशी चिंतामुक्त नी काहीतरी मोठं घडतं आहे अशी भीती अश्या मिश्र भावना मनात आल्या. स्वतःला प्रुव करायची ही दोघांची खरी वेळ होती.आणि ते सिद्ध करुन दाखवणं हाच एक पर्याय राहिलेला होता.

मी लहान मुलाबरोबर एकटीने राहणार म्हणून माझी आई सोबतीला येऊन राहिली माझ्या बरोबर. बहिण सुद्धा मी एकटी पडणार नाही ह्याची पूर्ण काळजी घेत होती.

एक दिवस ह्यांचा मला फोन आला कि पासपोर्ट तुझा हातात पडला का नाही? तुमच्या दोघांच्या व्हीझाची तयारी चालू करायची आहे.

--मधु निमकर
 (दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात १०/०३/२०१३)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा