रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

अमेरिकेतील 'तो' अविस्मरणीय प्रसंग!

हळू हळू इंडीकेश्न्स देत माझ्या फोनने एक दिवस पूर्ण राजीनाम्याचा अर्जच समोर ठेवला....आत्तापर्यंत आलेले वारंवार ‘हेंग’ होऊन बंद पडण्याच्या धमक्यांचे संकेत दुर्लक्षित केल्याच्या परिणामांना सामोरी जायची ही आलेली निर्वाणीची वेळ. संकेतांचा अन्वयार्थ न लागल्याने आपल्या मागण्यांवर अंमल बजावण्यासाठी बहुआयामी बंद पुकारून अखेर मला साष्टांग नमन करायला लावणाऱ्या माझ्या फोनने  मागण्यांची दिसायला किरकोळ परंतु वजनदार, भारीभक्कम यादी माझ्याकडे इंजिनियर्स कडून टोलावली. वर वार्षिक सुट्टीचा फायदा सुद्धा निमुटपणे मान्य करण्याव्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय राहिला नाही. त्यात देखील सतरा ठिकाणी धक्के खाऊन वाट चुकलेल्या जनावरागत एकदाची फोन दुरुस्तीच्या दुकानात warranty च्या कागदासकट पोहोचलेली मी!... त्यांनी दिलेला पत्ता चुकीचा, माणसे चुकीची, इतपत ठीक परंतु दोन दोन दिवस फेर्या मारून वर एक-दोन आठवडे फोन ताब्यात नसणे म्हणजे फारच झाले....

घरी परत आल्यावर जीवाची घालमेल झाली!....फोने नाही तर लाइफ ठप्प!!.....केलिफोर्निया व टेक्सास च्या आठवणींना पुन्हा नव्याने उमाळा आला..... चांगला दोन वेळा ह्यांचा व तीन वेळा माझा फोन अमेरिकेत मामुली कारणाने बिघडला असे घोषित झाले होते....फोनला चांगली दोन वर्षांची warranty होती, त्यामुळे कंपनीने तात्काळ माझा जुना फोन ताब्यात घेऊन काही मिनिटात नवाकोरा फोन बदलून आमच्या हातावर ठेवलेला. दोन्ही फोन ‘apple’ कंपनीचे असल्याने त्याच्या  दर्जात तृटी काढण्याची बिशाद कुणाची नव्हती. आत्ता तर विश्वास अजूनच दृढ झालेला!!

तंत्रन्यानाचा प्रचंड वेग, बाजारपेठेतील वेगाने होणारी उलथापालथ, व्यावसायिकपणा ह्यात अमेरिका किती पुढारलेली आहे ते एका फोन वरून देखील दिसून येते. तोच फोन बर्याच महिन्यांनी मुंबईत लौंच केला गेला. त्या वेळी आम्ही भारतात परत देखील आलो होतो.

तंत्रन्यानाबरोबरच अमेरिकन लोकांचे प्राणीजीवनावरचे अचाट प्रेम देखील जगप्रसिध्द आहे. त्याचा एक छोटा किस्सा....

दुपारच्या वेळी कधी ग्रोसरी मार्केट, कधी मॉलमध्ये शॉपिंगला, तर कधी मैत्रिणीच्या घरी गप्पा मारायला, पार्टीला, असा माझा दिनक्रम झालेला. लाडक्या मैत्रिणीने फोन करून,“तुझ्याकरीता strawberry milkshake बनवलंय घरी येच...!”, अशी गळ घातल्यावर न जाणे अवघड होते, आणि घर देखील जवळच दीड-दोन मैलावर होते. तिच्याकडे जायला मला कधीच कंटाळा यायचा नाही. त्यांची गाडी तिचा नवरा कामावर घेऊन जायचा, त्यामुळे तिला बाहेर जायचं असेल तेव्हा ती आमच्या एखादी बरोबर किवा नवर्याला गाडी घरी तिच्यासाठी ठेवायला सांगून बाहेर पडत असे. आमच्यात सर्वात उत्साही आणि सर्वात लहान म्हणून ती लाडकी होती, त्यात आम्ही दोघीही भटक्या!!!

तुरळक पावसाला चुकवत गाडीने तिच्या घरी मी पोहोचले....गप्पा रंगल्या...बाहेर हवा थंड होती, परंतु घरात हीटर चालू असल्याने सर्व काही ठीक वातावरण होते. २४ वर्षांची सर्वात मॉडर्न नॉर्थ इंडियन मैत्रीण, आणि तिला ‘के.जी.’ मध्ये शिकणारी मुलगी.... त्या छोट्या बाहुलीला घेऊन आम्ही खूप मजा करायचो. कधी तिच्या शाळेत पार्टी असायची, तेव्हा वर्गा बाहेर उभ्या राहून ती आणि वर्गातील लहान मुले काय ‘activity’ करतात ते बघायला खूप मजा यायची! शाळा सुटल्यावर टीचर मुलांचे किस्से भरभरून सांगायची!!!!.... आम्हाला बघून तिची मुलगी देखील धाव्वत येऊन गळ्यात मिठी मारायची दोघींच्या, तोच मोह मी तिथे भेट देण्यास कदाचित कारणीभूत होता ... माझ्या कॅलिफोर्नितील मैत्रिणीच्या मुलाला एका खाजगी शाळेत टाकलेलं, तो ‘प्री के. जी.’ मध्ये होता. त्त्याच्या बरोबर लंच घेणे, गाणी म्हणणे वगैरे पूर्ण वेळ आम्हाला जायला परवानगी होती!!

असो...”मम्मा, मम्मा” करणाऱ्या आमच्या बच्चाला घेऊन यायला अजून वीस मिनिटे बाकी होती. गप्पा अगदी रंगलेल्या, शाळेची वेळ व्हायचाच अवकाश होता निघायला!.... दारावर अचानक काही तरी ओरबाडल्याची जाणीव झाली..... काही मिनिटात त्या ओरबाडण्याचा आवाज तिव्र होऊन दारावर धडक मारल्याची जाणीव व्हायला लागली. दरवाजाच्या फटीतून मैत्रिणीने बघण्याचा प्रयत्न केला तर बाहेर कुणी तरी जनावर असल्याचे तिला दिसले. त्याचा कर्णकर्कश्य आवाज कानठळ्या बसवणारा आणि हिंस्त्रक होता. जनावराला वेड लागलेले असावे असेच वाटत होते अगदी ...

मुलीची शाळा सुटायला आता फक्त पंधरा मिनिटे शिल्लक होती. आजूबाजूला राहणाऱ्या मैत्रिणी आज उपलब्ध नव्हत्या व आमच्या पतीदेवानपैकी कुणीही एवढ्या कमी अवधीत ऑफिसमधून मदतीला येणे शक्य नव्हते. वेळ संपल्यावर एक मिनिटही अधिक कुणी अमेरिकेत काम करत नाहीत. वेळेत गेलो नाही तर शाळेला कुलूप लावले जाईल ह्या भीतीमध्ये भर म्हणून त्या जनावराच्या ओरबाडन्याने आणि किंचाळण्याने काहीही सुचत नव्हते. ब्लॉकच्या galleryमध्ये जाऊन मैत्रिणीने काहीतरी बाहेर भिरकावण्याचा दोन वेळा केलेला प्रयत्न साफ आपटला. एक तर नेम चुकला आणि दुसरे म्हणजे ते जनावर खालून gallery मध्येच चढून येण्याचा प्रयत्न करू लागले. घाबरून तिने gallery चे दार बंद केलं. म्हणून मला सुद्धा काही करणे शक्य झाले नाही.

ते पिसाळलेले जनावर ‘यमदुतासारखे आमचे काम आज तमाम करणारच’ ह्या इराद्याने आमचा पिच्छा सोडत नव्हते. त्याचा आक्रस्थाळेपणा शिगेला पोहोचलेला. तो सर्व आवाज अक्षरशः आमच्या कानात घुमू लागला व आमची बेचैनी वाढली.

वेळ कमी होत चाललेली....त्यात पिसाटलेले जनावर अगदी ऐकत नव्हते. त्या प्रकाराने सहनशक्तीच्या मर्यादा ओलांडल्या... आता मात्र मैत्रिणीची पुरती गाळण उडाली, घाम फुटला तिला, थरथरून तोंडातून शब्द बाहेर पडेना तिच्या, धीर एकवटून आम्ही पुन्हा दारातून ते  गेले का बघायला जायचो तर पुन्हा ते रानटी जनावर आमच्यावर प्राणघातक झेप घ्यायला झपाट्याने पुढे सरसावायचे, जोरात दरवाजावर धक्के मारायचे....थरकापाने शेवटी मैत्रीण ओक्साबोक्शी रडायला लागली....मी देखील चिंतेत पडले. माझा मुलगा यायला बराच उशीर होता म्हणून मला वेळेची चिंता नव्हती.

मुलीची शाळा सुटायला आता फक्त पाच मिनिटे शिल्लक होती....शेवटी मी ९११ ह्या अमेरिकेच्या   तत्काळ आपत्कालीन हेल्पलाईनची मदत घ्यायचं ठरवलं. फोनवर सर्व सविस्तर ऐकून घेतल्यावर, “असल्या कामांना आम्हाला नाही ‘एनिमल रेस्क्यू’ टीमला बोलवा..” म्हणून सांगून फोन कट झाला. त्यांची समजूत काढण्यावाचून आमच्याकडे तत्काळ कुठलाही पर्याय नव्हता....पुन्हा एकदा प्रयत्न करू ह्या विचाराने मी त्यांना अखेरचा फोन लावला व आमची समस्या ऐकवली...

अखेर कुठल्यातरी पुण्यायीने तो पोलीस अधिकारी अचानक आला आणि त्याने त्या जनावराला दरवाजातून क्षणात घालवले...उंच तगडा उतारवयीन गोरा अमेरिकन पोलीस घराचा दरवाजा ठोकून आत आला, व आम्हाला त्याने अधिकारवाणीत सांगितले....”एवढ्या शुल्लक कारणासाठी पोलिसांना कशाला बोलावलत तुम्ही? ते बघा एक लहान मांजरीचं पिल्लु आहे ते! एक ग्लास थंड पाणी ओतलं असतं अंगावर तरीही पळून गेलं असतं. बाहेर थंडी आहे म्हणून घरात ऊब घ्यायला यायचा प्रयत्न करत होतं.....!!” आम्ही त्याला काही समजावण्याच्या मनस्थितीत नव्हतो....शाळेची वेळ होऊन गेलेली!

एक भिजलेली  लहान मांजर दोन दिवस तिच्या दरवाजात बसत होतं, व शरणागती म्हणून घराच्या आश्रयाला येऊ पहात होतं. परंतु दारावरील लावलेल्या पत्र्याच्या आवरणामुळे त्याचा आवाज वाघाने नखाने दरवाजावर ओरबाडावे इतका मोठा येत होता.

अमेरिकेत अशी काही जंगली मांजरे आढळतात, परंतु भटके कुत्रा किंवा गायी गुरे अन्य कोणीही मला कधी तिथे आढळले नाही.

सिग्नल चुकवत-पाळत जमेल तसे करून आम्ही शाळेत जाऊन पोहोचलो एकदाचे....सुदैवाने शाळा अर्ध्या मैलावरच होती व मोक्याचे ठिकाण नसल्याने आडगल्लीत सिग्नलला केमेरा बसवलेला नव्हता.

मैत्रिणीने तशीच  धावत जाऊन रडत-रडत  मुलीला मिठी मारली व तिचे मुके घेतले....मुलीने आमच्या कडे खळखळते हास्य करून “मम्मा, आज हम ने ये किया....” सांगायला सुरुवात केली!!!!







-मधु निमकर
(दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात १४/०९/२०१४)

 

 

 

 

 

सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

"मेरी कोम "....फिल्म.

गरीब कुटुंबातली 'मेरी कोम' लहान वयात आपल्याला बॉक्सिंग मधेच आवड आहे आणि त्यात करियर करायची इच्छा आहे असे घरच्यांना सांगून टाकते. नाक मोडणारे, चेहेरा खराब करणारे बॉक्सिंग करियर म्हणून निवडू नये म्हणून तिचे वडील त्याला विरोध करतात. त्यांच्या विरोधाला न जुमानता ती बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेऊन स्टेट, नेशनल, तसेच इंटरनेशनल लेवल वर आपले स्थान प्रस्थापित करते. वेळ प्रसंगी घरातील कर्जापायी विकलेली गाय मेल बॉक्सरला चेलेंज करून पैशानसाठी मार खाऊन सोडवते.

"मुझे ब्रोन्झ पसंद नहीं आता..." सांगणाऱ्या तिच्या कोचचा,'तू मला केवळ पहिली आलेली पाहिजेस,' असा विश्वास त्यातून दिसतो. करीयरच्या एका उंचीवर आपल्या कोचच्या विरोधाला न जुमानता अचानक आपल्या मित्राच्या प्रेमात पडून ती लग्न करते व करियर सोडून स्वतःला संसारासाठी वाहून देते.
इतपर्यंतचा चित्रपट केवळ टिपिकल भारतीय धर्तीचा "कहानी घर घर की..." असे सांगत संपतो.

अचानकपणे लागलेली मातृत्वाची चाहूल तिच्या सर्व भविष्यातील योजनांवर विरजण टाकते. स्वतःची सर्व मेडल्स व प्रशस्तीपत्रके ती शोकेस मधून उचलून पेटीत बंद करते. त्या बरोबरच तिच्या मनातील बॉक्सिंग करियरवर सुद्धा ती एक प्रकारचे 'कफन' घालते. आपल्या मुलांसाठी जागा करायला पाहिजे म्हणून मी हे समान इथून दूर करते आहे हे सांगतांना तिच्या मनातले दुखः तिच्या डोळ्यातून तिच्या पतीना दिसते.

आपल्या दोन जुळ्या मुलांना घेऊन एक दिवस प्रवास करतांना एका मुलीचे पालक तिला सांगतात," तुम्ही मेरी कोम ची मैत्री आहात काय? आमच्या मुलीगी तिची मोठी फेन आहे. तिला मेरी कोम प्रमाणे बॉक्सर व्हायची इच्छा आहे. तुमची भेट होईल तेव्हा तिची स्वाक्षरी माझ्या मुलीला मिळवून द्याल काय?"....
मेरी कोम लोकांसाठी भूतकाळ आहे...... आपली गृहिणी आणि दोन मुलांची आई एवढीच आता ओळख आहे..... आपण कधी पुन्हा बॉक्सिंग करू शकणार नाही.... आपली फिटनेस राहिली नाही... ह्या विचाराने ती आधीच अस्वस्थ झालेली असते.

शेवटी दोघानपैकी एकाने तरी मुले व घर ह्यांकडे राहायला पाहिजे या जाणीवेने तिचे पती तिला घरच्या जबाबदारीतून मुक्त करून तिची व संपूर्ण घराची जवाबदारी एकट्याने स्वतःच्या अंगावर घेतात व तिला पूर्ण पाठींबा व योग्य परिस्थिती निर्माण करून देऊन पुन्हा उभे करतात.

आपल्या कोच गुरूनं शिवाय आपण बॉक्सिंगमध्ये विजयी होऊ शकत नाही हे 'मेरी' च्या लवकरच लक्षात येते.

लग्न, मुले, घरची जवाबदारी, अपयश ह्या सर्वांमुळे आत्मविश्वास गमावलेल्या मेरी मध्ये तिचे गुरु पुन्हा आत्मविश्वास आणतात. "मा बनने से औरत कि ताकत दुगनी होती है... " हे गुरूंचे शब्द ऐकुन तिच्यात धीर येतो. डबल ताकदीने 'मेरी कोम' आपल्या आयुष्याचा खरा लढा द्यायला बॉक्सिंगच्या रिंगणात पुन्हा एकदा उभी राहते.

ऐन कॉम्पिटीशन च्या वेळी तिच्या तान्ह्या मुलाच्या हृदयाला भोक आहे व त्याचे ओपेरेशन होत आहे हे ऐकून पुन्हा तिच्यातली भावूक स्त्री जागी होते. तिच्यातील नवचैतन्य संपून जाते, आणि ती कोलमडून पडते. आता नवीन कोच पुन्हा तिच्यात धीर आणतात, आणि शेवटच्या फेरीत ती स्पर्धा जिंकते. तिच्या बाळाचे हृदय ऑपरेशन मध्ये बंद पडलेले पुन्हा सुरु होते व ते वाचते.


.......आणि 'बोर्न टू वीन' खरे करून दाखवत 'मेरी कोम' चा पुनर्जन्म होतो!!!
- मधु निमकर.

शनिवार, ६ सप्टेंबर, २०१४

"नयनरम्य नायगारा "


 

 Pic by madhu nimkar
‘न्यूयॉर्क’ आणि ‘नायगारा फॉल्स’ ही ठिकाणे सुद्धा लवकरच बघून झाली.  मन ह्युस्टन मध्ये रमल्याने अजून एक वर्ष अमेरिकेत राहायला हरकत नाही अशी खात्री पटली.

“इतने साल अमेरिका में रेहके भी ‘न्यूयॉर्क’ नहीं देखा, तो क्या किया?” हा सवाल एकदाचा संपवून टाकायचा निर्णय घेऊन एकदाचा दौरा ठरवला आम्ही...

अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर, ग्लोबल पावर सिटी, तसेच अर्थशास्त्र, वित्तशास्त्र, प्रसारमाध्यमे, कला, fashion, संशोधन, तंत्रज्ञान, शिक्षण , आणि  मनोरंजन. युनायटेड नेशन्सची प्रमुख हेड क्वार्टर, तसेच इंटरनेशनल डिप्लोमसी चे प्रमुख केंद्र आणि जागतिक सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्राची राजधानी.  एकूण काय ‘न्यूयॉर्क’ विषयी किती हि लिहिला तर कमीच आहे...

आम्ही मात्र एक प्रेक्षणीय स्थळ म्हणूनच ते बघायला गेलेलो...

‘न्यूयॉर्क’ मध्ये जुने-नवीन पुरेपूर वास्तुशास्त्राचे नमुने दिसतात. अगदी ब्रुकलीन मधील १६५६ साली उभारलेलं “saltbox style Pieter Claesen Wyckoff House” असो नाही तर “One World Trade Center” ही गगनचुंबी इमारत असो...

एकूण पाहण्यायोग्य महत्वाची आणि प्रेक्षणीय स्थळे म्हणजे Midtown Manhattan, Times Square, the Unisphere, Brooklyn Bridge, Lower Manhattan with One World Trade Center, Central Park, United Nations Headquarters, आणि Statue of Liberty.

शहरात बर्याच जुन्या आणि कलात्मक बांधकामांनी नटलेल्या मोठ्या मोठ्या इमारती दिसतात. काही भागांत चकचकीत भपकेदार इमारती एखाद्या काचेच्या कारखान्याला शहरीकरणाची जवाबदारी दिल्याप्रमाणे बांधलेल्या आढळतात. एकूण शहराचा दिमाख काही औरच. फिरायला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सवड काढून जायला पाहिजे.

पायी सुद्धा फिरत असाल तर एक एक ऐतिहासिक इमारत कुठून न कुठून डोकावतच असते. सप्टेंबर २०११ च्या हल्यात जमीनदोस्त झालेल्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ चा सुद्धा झीरो ग्राउंड सर्व towers मध्ये एक आगळे वेगळे काहीसे त्या गजबजाटात खोल पोकळीप्रमाणे आभास देतो. खास वेळ काढून बघण्यासारखी महत्वाची ठिकाणे म्हणजे अर्थातच “टाईम स्क्वेर” आणि ”स्टेच्यू ऑफ लिबर्टी”. जबरदस्त सुरक्षा व्यवस्थेत असलेली ही दोन्ही ठिकाणे. 

स्वातंत्र्य देवतेचा पुतळा हिरव्या रंगात समुद्राच्या मध्यभागी बेटावर उभा आहे. त्या देवतेने पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल तेथील प्रत्येक लहान मोठ्यानच्या हृदयात स्वातंत्र्य जागते ठेवून आहे. आजही तिथे जन्माला  आलेली भारतीय असोत वा अमेरिकन...”इट इज माय लाईफ..” “माझ्या आयुष्याचे मी निर्णय घेईन...” असेच प्रत्येक जण खडसावून सांगत असतो.      
                                                      (pic by madhu nimkar)

“Times Square” च्या मध्यावरच आमचं हॉटेल होतं. हॉटेलच्या फिरत्या दरवाजातून समान संभाळत नेहमीचाच अमेरिकन पेहराव, आणि सोबत डोक्यावर टोपी आणि डोळ्यांना गोगल लावून शहर फिरायला सज्ज होतो आम्ही.  न्यूयॉर्क शहरांतला एक मध्यवर्ती मोठ्ठा चौक ज्यात पूर्ण इमारतीच्या इमारती दूरचित्रवाणींचा आभास देत होत्या. इमारतीच्या पहिल्या मजल्या पासून वर पर्यंत निरनिराळ्या चल जाहिरातींची भाऊगर्दी सर्वत्र नजरेस येत होती. कडत पोलीसी बंदोबस्तात त्या चौकटीचा कारभार डोळ्यात तेल घालून सांभाळला जात होता. ते पाहून कुठेतरी नाक्यावर जीप घेऊन पाळत ठेवणारे भारतीय हवालदाराचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले....बरीच छोटी-मोठी हॉटेल्स आणि भेटवस्तू विकणारी छोटी-छोटी दुकाने दिसत होती. काहीतरी आठवण घ्यावी म्हणून वीतभर लांबीची छोटी गिटार मुलासाठी आणि काही छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या. अकरा डॉलर खर्च करून घेतलेली गिटार पुढे मुंबईतील दुकानांमध्ये उपलब्ध आहेत हे बघून दुकानदाराला त्याची किंमत विचारायची पण मला भीती वाटलेली. परंतु त्यावेळी ती घेतांना मात्र मनाला काहीतरी आठवण घेऊन जात आहोत ह्यापेक्षा मोठे समाधान काहीही नव्हते.


“नायगारा फॉल्स” ला बघणे म्हणजे निसर्गाचा अवाढव्य आवाका एका छोट्याश्या(?) तुकड्यात बसवून  बनवलेलं एक प्रेक्षणीय स्थळ. इथे छोट्याश्या लिहिल्याने माझ्यावर नक्कीच मोठ्या-मोठ्या मुक्त टीका केल्या जातील... परंतु एक अतिविशाल पाण्याचा धबधबा न्यूयॉर्क,अमेरिका आणि ओन्तारिओ, कॅनडाच्या सीमेच्या मध्यावर आहे आणि आपण त्याला तंत्रन्यानाच्या आधारे जवळ जाऊन बघू शकतो, रंगीत दिवे लाऊन सुशोभित करु शकतो व कॅमेरात कैद पण करू शकतो.....ह्या करिता त्याला छोटा म्हणायचे धाडस केलं मी खरे तर!



दृष्टी जाईल त्यापलीकडे दूरवर पसरलेला अवाढव्य, विशालकाय, महाकाय, मनमोहक, अतिसुंदर, जणू स्वर्गातून थेट जमिनीवर त्याचे पाय लागले असतील इतका शक्तिशाली आणि तितकाच सुंदर धबधबा तो फक्त “नायगारा”च असू शकतो.
 
Pic by madhu nimkar

हा धबधबा तीन भागात विभागलेला आहे. ‘हॉर्स शू फॉल्स’ (२६०० फूट किंवा ७९२ मीटर) हा कॅनडाकडील बाजूचा, व अमेरिकन फॉल्स (१०६० फूट किंवा ३२३ मीटर) व ब्रायडल वेल फॉल्स हा अमेरिकेच्या बाजूकडील. त्याला पाणी नायगारा नदीतून मिळते.

मेड ऑफ द मिस्ट” आणि “केव्ह ऑफ द विंड” अश्या दोन सहलींच्या प्रकारे नायगाराला जवळून बघता येते. एवढ्या प्रचंड ताकदीच्या अवाढव्य धबधब्याला बघून तोंडात बोटे घातली तर नवल नाही. सेव्हन वंडर ऑफ द वर्ल्ड मध्ये त्याचा समावेश नाही, ह्याचे राहून राहून आश्चर्य मात्र वाटते...

त्याचे ते रूप कधीतरी जवळ जाऊन बघतांना मनात भीती पण आणते....मग डोळे घट्ट मिटून आपण त्याचे अंगावर उडणारे तुषार अनुभवतो व सर्व भीतीचा आपल्याला विसर पडतो.

नायगार्याच्या जवळ जायला तिथे रेनकोट व स्लीपर्स दिल्या जातात...लांबच लांब रांगेत उभे राहून आपली नायगारा जवळून बघायची उत्सुकता केवळ वाढीस लागते.

नायगारा साठी एक पूर्ण दिवस राखीव पाहिजे...

अमेरिकेची राजधानी कशी काय दिसते ह्याचं कुतूहल मनाला लागलं. ओबामा चं घर किती मोठं आणि राजेशाही आहे? ‘व्हाईट हाऊस’ आणि ‘वाशिंगटन डी सी’.....बस शेवटची दोन ठिकाणे बघितली की अमेरिका दर्शन पूर्ण झालं आमचं असं आम्ही ठरवलं होतं.

ओबामाच्या घरासमोर उभे राहून सर्वन प्रमाणेच फोटो घेतले, त्याचा बगीचा चौफेर फेरफटका मारून बघितला. फर्स्ट लेडी आपल्या मुलांना ह्या बागेत खेळायला आणते का? ओबामाचे ओझरते का होईना दर्शन व्हावे...अश्या बर्याच समजायच्या आणि अनुभवायच्या गोष्टी पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ‘व्हाईट हाऊस’च्या समोरील काही रस्ते बंद ठेवण्यात आले होते.

समोर कडक पोलीस बंदोबस्त आणि ‘व्हाईट हाऊस’च्या समोर धरणे देऊन घोषणा देणारे एक-दोन एक-दोन माणसांचे दोन संघ, हातात काही लिहिलेले कागद. समोर पोलीस उभे परंतु कुणीही त्यांना थांबवायला पुढे सरसावत नाही.

ह्यालाच बहुधा म्हणतात स्वातंत्र्य देवतेचे गाव...

--मधु निमकर