रविवार, १९ एप्रिल, २०१५

अमेरिकेतील 'मेनलेस' टोलनाके..






टोल नाके रद्द करावेत असा प्रस्ताव निर्णयाला पोहोचला आहे. परंतु मुळात टोल हाचमुळी नागरिकांवर टाकलेला अतिरिक्त बोजा आहे असं मी समजते...आपण नागरीकांकडून निरनिराळ्या माध्यमांतून कर वसुली करत असतो. हवा, पाणी, स्वच्छ परिसर ह्या ज्याप्रमाणे मुलभूत गरजा आहेत त्याप्रमाणे देशात बांधल्या गेलेल्या रस्त्यांना दुरुस्त करणे, महामार्ग खड्डे विरहित ठेवणे हे पण सरकारचे कामच नाही का?
जो नियमित कर भरतो त्याच्यावर अतिरिक्त बोझा, व जो भरीत नाही त्याच्याकडून प्रगतीच्या नावाने वसूल केलेला मोबदला असाच वाटतो मला हा ‘टोल’!
टोल नाके सगळीकडे असतात. त्याला अमेरिका देखील अपवाद नाही. टोल नाके सापडण्याचे मुख्य ठिकाण म्हणजे महामार्ग.
गर्दीतून मार्ग काढत उकाड्याच्या दिवसात लांब रांगा लागलेल्या टोल नाक्यासाठी घरातून निघतांनाच प्रत्येकजण ह्या टोलचा विचार करतो. इथून गेलो तर एवढा टोल पडेल व त्या मार्गाने गेलो तर इतका खर्च होईल! ह्याचा अर्थ आपण तो ‘टोल’ नाखुशीनेच स्वीकारतो ना?
“भारत म्हणजे सरकारी कामांच्या ठिकाणी लागलेल्या लांब रांगा. त्यात अजून भर म्हणून हे महामार्गांवरचे वेळकाढू टोल नाके...”हे आपले चित्र फिक्स!! फक्त कुठे जाऊ त्या ठिकाणाचे नाव त्याला लावा.. इथे कुठल्याही कामाचा सोप्पा अथवा कठीण मार्ग आपल्याला वेळेचा ‘टोल’ भरल्या शिवाय मोकळा होत नाही.
भारतात असलेला उकाडा आणि किचकट कार्यालयीन व्यवहार आपल्याला प्रत्येक गोष्टीकडील लक्ष स्वतःवर वळवण्यास मजबूर करतो. लांब रांगेतून घड्याळाच्या काट्यांवर डोळे लावत आपण स्वतःच्या सुटकेची याचना स्वतःशीच करीत असतो, कारण पुढची कामे आपली वाट पहात असतात..ही विचारांची चलबिचल अहोरात्र मनात चालूच असते, कारण “आपली न संपणारी कामे आणि कमी पडणारा वेळ!”
आज प्रत्येकाला पैसा आणि वेळ वाचवायचा मार्ग हवा आहे. किंबहुना फक्त वेळ वाचवायला म्हटलं तरीही पुरेसं ठरेल ते!!
आपण शिकून परदेशात स्थायिक होतो त्यामागे सिंहाचा वाटा ह्या रहदारीचाच म्हटला जातो. अन्य बरीच करणे त्यापुढे दुय्यम आहेत कारण ती थोडी फार तरी टाळता येऊ शकतात.
आपल्याकडे नियमात बांधून घेणे कुणाला मान्य नाही. मग ते रहदारीचे नियम असोत वा कचेर्यांचे नियम...आणि पकडले गेलो तर दादारीगी आहेच!
परवा एका मोठ्या सुपरमार्केट मध्ये पाहिलं कॅश counter वर कोण पहिलं जाणार ह्यासाठी खडाजंगी चालू होती. कुणीही ऐकेना...पुढे घुसणारा धमकावायला लागला तुला माहित आहे का मी कोण आहे ते? मी ह्या ह्या व्हीआयपीला फोन लावतो...त्यांच्यावर स्टोरमधील कुणीही ताबा मिळवू शकले नाही. त्यामुळे त्यांची आणि पर्यायी बर्याच लोकांची रखडपट्टी देखील झाली. हे चित्र तर रोजचेच आहे...निव्वळ ५ मिनिटांच्या कामासाठी इतकं गंभीर वळण घेण्याइतके आपण ह्या सर्वांना कंटाळलो आहोत का खरंच? ह्याचं उत्तर एकजात ‘होच’ येणार!
ह्या सगळ्याचे देखील मुख्य कारण वेळ वाचवणे आहे हेच निष्पन्न होते....कामांना उशीर, नको तितक्या खेपा, लंच टाईम्स ह्या अडचणी आता आपण पुढाकार घेऊन दूर केल्या पाहिजेत.
अमेरिकेत मोठ्या स्टोर्स मध्ये स्वतःच्या वस्तू स्कॅन करून स्वतः बिले चुकती करायची देखील सोय आहे. परंतु ज्यांना मदतीची गरज असते त्यांच्यासाठी कॅश counters ची देखील तिथे सोय केलेली असते!
आपल्या देशात उपलब्ध असलेले तंत्रज्ञान जो पर्यंत दैनंदिन व्यवहारात सर्रास वापरले जात नाही तो पर्यंत परदेशात जाणाऱ्या उच्च शिक्षित भारतीयांचा लोंढा थांबवणे शक्य नाही. स्वच्छता, गलेलठ्ठ पगार ह्या पर्यायाने येणाऱ्या गोष्टी आहेत मग..! आपली संस्कृतीची पाळेमुळे सोडून सुखाच्या शोधात जाणारा माणूस खुशिखुशीने जात नसतो नेहमी.
आजचा मुख्य मुद्दा चेक नाक्यांचाच असल्याने आता त्या विषयी बोलूया..
अमेरिकेत विशिष्ट इंटरनेटच्या साईटवर आपण काही पैसे जमा करून टोलची आगाऊ रक्कम जमा करतो. पोष्टाने त्याची पोचपावती व एक गाडीवर लावायचा ‘इलेक्ट्रोनिक tag’ आपल्याला घरी पाठवला जातो. गाडीच्या समोरच्या  बाजूला काचेवर सांगितलेल्या नेमक्या ठिकाणी तो आपल्याला लावायला लागतो.
अमेरिकन टोलनाक्याच्या वरील बाजूस एक स्कॅनर बसवलेला असतो. तिथे फाटक नसते. तुमची गाडी भरधाव वेगाने महामार्गावर टोलनाके ओलांडून जाते. तुमच्या गाडीवर लावलेला ‘इलेक्ट्रोनिक tag’ चेकनाक्यावरील  स्कॅनर रिड करतो. तुमच्या जमा केलेल्या आगाऊ टोलच्या रकमेतून तो टोल वजा केला जातो. ह्या व्यतिरिक्त  वैयक्तिक पैसे भरून सुद्धा टोलनाका पास करणे शक्य असते. इतकेच काय पण ‘शिकागो’ सारख्या डाऊनटाऊन मध्ये तुम्ही उधारीवर सुद्धा टोलनाके पार करू शकता.
टोलनाके पार करून तुम्ही त्यांच्या वेबसाईट वर जाऊन केलेल्या प्रवासाचा टोल एका आठवड्यात जमा करू शकता.
सुरक्षितता आणि वसुलीसाठी तुमच्या गाडीची नोंद टोलनाक्यावर केली जाते. त्यामुळे तुम्ही टोल चुकवलात तरी तुमच्या घरी त्याचं बिल येते. वर व्यवहार सुद्धा पारदर्शक राहतो. मग झालं न कामं? अजून काय पाहिजे....
अमेरिकेत चेकनाके, पेट्रोलपंप हे मेनलेस म्हणजे माणूसविरहित आहेत. कारण तिथे मनुष्यबळ कमी आहे. हेच नाही बर्याच गोष्टी तिथे तश्या चालतात. त्या विषयी आपण पुढील स्तंभात बोलूया.

--मधु निमकर. (दै.कृषीवल, मोहोर पुरवणी, १९-०४-२०१५)


शनिवार, ११ एप्रिल, २०१५

ओर्कुटची ओळख





सोशल नेटवर्किंग हा आत्ता जगाचा आत्मा जरी बनला असला तरीही त्याची पायमल्ली खर्या अर्थाने झाली ती ऑर्कुटमुळेच असं माझं स्पष्ट मत आहे!!
ही गोष्ट आहे मी भारतातून अमेरिकेत स्थानांतरीत झाल्यावर लगेचची...
इंटरनेटवर संवाद साधण्याबरोबर सोशल नेट्वर्किंगला सुद्धा त्यावेळी चांगलाच पेव फुटलेला. त्यात माझ्यामते ओर्कुट सर्वात अग्रेसर समजले जात असावे. फेसबुक सुद्धा होतेच. परंतु ओर्कुटवर जो काही जिवंतपणा होता तो फेसबुकवर कधी आढळला नाही, किंबहूना अजूनही नाही असं सुद्धा मी म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही!
माझी कॅलिफोर्नियाची एक मैत्रीण नेहमी सांगायची, “मधु, आपण सर्व एकमेकांशी ओर्कुटवर कायम संपर्कात राहू. आजूबाजूच्या मैत्रिणी आहेत ओर्कुटवर... तू सुद्धा ये!!” वर्षभर मागे लागून शेवटी कुठून तरी अनवधानात मला ओर्कुटचं आलेलं आमंत्रण मी स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने सोशल नेट्वर्किगमध्ये माझा प्रवेश झाला!
अश्याच जुन्या-नवीन मित्र-मैत्रिणींमध्ये एक जुनी मैत्रीण ओर्कुटवर भेटली! माझ्या खास मोजक्या दोस्तांपैकी एक होती ती! त्या मित्रांच्या समुदायातील एकमेव श्रीमंत म्हणायची ती स्वतःला...साधी राहणी आणि उलाढाली स्वभाव ठासून भरलेला तिच्यात!
माझ्यापेक्षा ती एक-दोन वर्षांनी मोठी, परंतु तरीही समवयस्कच..! आता तिला देखील एक मुलगी होती. मी अमेरिकेत होती आणि ती जपानमध्ये एवढाच माझ्या दृष्टीने फरक होता.
आपल्याला जगात कुठेही कितीही मोफत कॉल्स करायला मुभा आहे हे तिने आठवडाभर माझ्यासमोर घोळवलं. परंतु तिने लावलेला कॉल माझ्यापर्यंत एकदाही पोहोचला नाही. त्याचे उत्तर तिचं जाणे!!..असो...माझी मैत्रीण ती, मला तरीही तिचं कौतुकच भारी असायचं!! शिकायची, वाचायची आणि उद्योगांची भरपूर आवड असल्याने विषयाला तोटा नसायचा कधी तिच्याकडे....मग तिने मला तिच्या बंगल्याचे ती दीड लाख येन भाडं भरते असं सांगितलं.
जगातल्या सर्वात श्रीमंत देशात, सर्वात महागड्या शहरात तिचा बंगला होता. त्याचं भाडं देखील तिच्या मते सर्वात उच्च आहे हे ती वारंवार मला सांगे. पैसा असला तरी दुर्दैवातून ती वर आलेली मी तिला बघितलेली. तिने नशीब काढले म्हणून मी खूप खुष होते, आणि ती सुद्धा माझ्यावर तितकीच खूष असायची!
ती राहायची बंगल्यात आणि मी राहायची तीन खोल्यांच्या अपार्टमेंटमध्ये....! दीड लाख येन भाडं होतं तिच्या घराचं आणि माझे आपले पंधराशे डॉलरचे लहान (तिच्यासाठी) घर....तरीही मला तिचा हेवा वाटायचे कारण देखील नव्हते. माझे जे काही होते ते स्वर्गापेक्षा कमीही नव्हते!!
तिचा घरच्या भाड्याचा हिशोब रोज ऐकून-ऐकून मी एक दिवस मिलिंद जवळ  (पती) कौतुकाने त्याचा विषय काढला....
ते ऐकून मिलिंद माझ्यावर चांगलेच डाफरले!!...म्हणाले,”तुला माहित आहे का त्या देशात सर्व हिशोब फक्त येनमध्ये मोजले जातात?? आणि येनची तुलना भारतीय पैशाशी केली जाते. जपानी करन्सीमध्ये येन पेक्षा काही मोठं देखील नाही. डॉलर्स, पौंड अशी काही गोष्ट नाही तिथे. एक येन म्हणजे एक रुपया सुद्धा नाही....तिच्या दीडलाख येन पेक्षा जास्त भाडं आपण डॉलरमध्ये ह्या घरासाठी मोजतो आहोत...”
ह्यांनी लगेच करन्सीजचा मला तोंडी हिशोब मांडून सांगितला....वर म्हणाले,”जा आणि सांग हे तुझ्या मैत्रिणीला!! तुझ्या बंगल्यापेक्षा महाग अपार्टमेंटसमध्ये आम्ही राहतो...हिशोब शिकव तिला जरा!!”
ह्यांनी सांगितलेल्या हिशोबाप्रमाणे तिच्या जगातल्या सर्वात महागड्या देशातील, सर्वात महागड्या शहरातील मोठ्या बंगल्याचे भाडे माझ्या तीन खोल्यांपेक्षा तुलनेत कमी निघालेले...!! (दीड लाख येनची किंमत सुमारे बाराशे डॉलर्स होत होती. आणि मी पंधराशे डॉलर्स भाडे दरमहा भरत होते.)
प्रत्येक बाबतीत तिची स्वतःला वरचढ सिध्द करायची हौस तिला ह्यावेळी भागवता आली नाही.
स्वतःला उच्च शिक्षित, खानदानी, ऐश्वर्यवान, भाग्यवान समजणारी बिचारी ती हा धक्काचं सहन करू शकली नाही..
“अगं नाही गं तसं!! ते शक्यच नाही”...असचं काहीसं बरळत ती तात्काळ निघून गेली!!
नेहमीप्रमाणेच औपचारिक गप्पा समजून मी देखील आपल्या कामात पुन्हा व्यग्र झाले..
ओर्कुटवरच्या माझ्या मित्रांच्या यादीवर मर्यादित अंकामुळे माझं चांगलं लक्ष असायचं. दोन दिवसात माझ्या प्रोफाईल मधून ती निघून गेल्याचे माझ्या लक्षात आले. मी लगेच तिला निरोप पाठवून त्याविषयी विचारले देखील.!!
...चुकून झाले ना डिलीट? असा माझा पहिला निष्पाप प्रश्न तिला होता... तर ती वैतागून म्हणाली, “कशाला हवी ओर्कुटमध्ये मी?...तुझ्याजवळ इमेल आहे ना गरज पडली तर संवाद साधायला? त्यावर निरोप पाठवत जा..!” तिच्या जवळ जास्त वायफळ वाद घालण्यात आता तथ्य उरलेले मला दिसले नाही...
पुरोगामी, उच्च शिक्षित, सधन कुटुंबातील मुलगी, बाल मैत्रीण असून देखील मनात कसल्या चढाओढी घेऊन बसलेली होती ती ते तिलाच माहित! तिच्या ह्यापेक्षा देखील इतर अनेक वैयक्तिक, सामाजिक समस्या मी ऐकलेल्या होत्या. त्याविषयी मी न बोललेलेच बरे! असो!! कुणाला ती भेटली तर जरूर सांगा मी तिची अजूनही आठवण काढते म्हणून!!

--मधु निमकर. (दै. कृषीवल, मोहोर, ५/४/२०१५)

शुक्रवार, २७ मार्च, २०१५

महिला सुरक्षित आहेत का?



‘निर्भया’च्या डॉक्युमेन्ट्रीच्या निमित्ताने आणि ‘जागतिक महिला दिनाच्या’ निमित्ताने महिला आणि सामाजिक मानसिकता ह्यावर बरीच चर्चा झाली. निर्भायाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जगातील पुरुषप्रधान संस्कृती, तसेच भारतीय संस्कृती महिलांकडून काय अपेक्षा करते ह्यावर बरीच काथ्याकूट झाली, आणि ह्या सर्व गोष्टींचे निष्पन्न म्हणण्यासारखं काहीही झालं नाही.
प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारतात महिला सुरक्षित नाही, बलात्कारी लोकांचा देश वगैरे विशेषणे लावण्याचा प्रयत्न देखील झाला. त्यानिमित्ताने मला देखील भूतकाळातील मी पाहिलेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या गावातील गोष्टींच्या आठवणींना उजाळा मिळाला!
सर्वप्रकारे जगाच्या पुढे असलेल्या अमेरिकेची देवी, म्हणजेच ‘स्वातंत्र्य देवता’ (statue of liberty) हातात व्यक्तिस्वातंत्र्याची मशाल घेऊन अमेरिकेला व बलशाली असल्याने जगाला प्रकाशाची वाट मोकळी करून द्यायला उभी आहे.
मग काय चालू आहे या स्वातंत्र्य देवतेच्या गावात? आहेत का तेथील महिला भारतापेक्षा सुरक्षित?  
ह्याचे उत्तर नक्कीच नाही.....तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, पुरुषांची मानसिकता कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत तिच असते. त्याचा तुमच्या जात, धर्म, रंग, नागरिकत्व, काही अंशी वय ह्याचा देखील काही संबंध नसतो.
मी आधी सांगितल्याप्रमाणे माझी मैत्रीण मोनिका...तिच्या पासूनच सुरुवात करायला लागेल! गांधीजींच्या शिस्तीत वाढलेली गुजराती डॉक्टरची ही सुंदर मलगी. दिसायला स्मार्ट परंतु अभ्यासात मागे, तरीही एक उत्तम गृहिणी, माता, विश्वासू मैत्रीण! दहा वर्षे अमेरिकेत राहून सकाळी ५ च्या अंधारात मला विश्वासाचा हात देऊन मोर्निंग वॉकला घेऊन जाणारी मोनिका...जिमच्या दारावर अनेकवेळा पाहटे त्रास देणारे भुरटे चोर, गुंड तरुण ह्यांना बिनधास्त परतवून लावणारी पण तिचं! पुढे अनेकवेळा पहाटे अमेरिकेच्या सुनसान अंधाऱ्या रस्त्यांवरून एकटीने गाडी हाकीत ‘मिशन पीक’चा उंच डोंगर बिनधास्त करणारी पण तिचं. वाटेत रेस लावायला मागे लागलेल्या अमेरिकन पुरुषांना योग्यप्रकारे मार्गी लावणारी पण तीच. उंची पाच फुट पण नाही, इंग्रजी भाषा बोलायला अवघड, परंतु निडर, निर्भय अशी स्त्री.
आमच्या कॉलनीत रोज संध्याकाळी पाय मोकळे करायला मी जायचे. अशी देखील दिवसा उजेडी सुनसान असलेली सोसायटी माणसांच्या गजबजाटात कधी सणावारी पूल पार्टी करतांनाच फक्त दिसायची. त्यामुळे इमारतींच्या मागील बाजूंनी जाणार्या पायवाट अगदीच सुन्न असायच्या. घरात माणसं आहेत का नाही ह्याची देखील चाहूल लागायची नाही. माणूस म्हणून अस्तित्व सांगणारी गोष्टं म्हणजे पपई आणि पीचच्या झाडाच्या जवळ किर्रर रातकिड्यांच्या आवाजात, अगदी मागच्या बाजूला कसला तरी गैरव्यवहार चालवा त्याप्रमाणे एका घरात खूप पक्षी, प्राणी भरलेले असायचे. पिंजर्यातल्या पक्षांचे ओळखीचे आवाज बाहेर ऐकू यायचे. जवळून जातांना उग्र दर्प देखील यायचा. काहीसे चेटूक किवा तस्करी करणार्यांचा एकूण भास व्हायचा...
दृष्टी आड सृष्टी म्हणावी त्याप्रमाणे मोनिकाच्या संगतीत राहून भीती म्हणजे काय हे मी पण विसरून गेलेले...
मला अशी एकटीला फिरतांना पाहून माझी दक्षिण भारतीय मैत्रीण मला नेहमी ओरडायची. अमेरिकेत वेडसर वागणारी लोक आहेत, तू अशी एकोशीच्या भागात फिरत जाऊ नकोस एकटीने. तुला धोका आहे. कधी मेलेले पाणसाप देखील वाटेत बाजूला पडलेले दिसायचे, त्यावेळी मात्र माझं शहरी मन आतून थोडं घाबरायचं! मग तो रस्ता दोन दिवस सोडून पुन्हा त्याच वाटेने पाय वळायचे सर्व विसरून!
दाक्षिणात्य मैत्रिणीचे घर अगदी गेटच्या जवळच होते. संध्याकाळचे ४:३० वाजले की जवळच्या बिल्डींगमधील पेइंग गेस्ट राहणाऱ्या मुलांचं टोळकं बियर वा तत्सम उत्तेजक पेय घेत बंद galleryमध्ये रिकामटेकडे उद्योग करत बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या बायकांची छेड काढत बसलेली असायची. दंगा, पार्ट्यांमध्येच त्यांची संध्याकाळची सुरुवात व शेवट व्हायचा!
मी ऐकलेला तेथील एक महिलांच्या सुरक्षिततेचा किस्सा इथे आज शेअर करावासा वाटतो. अमेरिकेत राहणाऱ्या माय-लेकींचा हा किस्सा आहे. रोज रात्री नाईट ड्युटी करायला जाणाऱ्या तरुण मुलीला तिची आई कारने आणायला जायची. रात्रीचे दोन वाजता ह्या नेहमी ये-जा करणाऱ्या स्त्रिया काही वाईट लोकांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. एक दिवस त्या दोघींचा बलात्कार करून प्रेते नग्न अवस्थेत रस्त्याच्या मध्ये टाकलेली आढळली, त्यांची वस्त्रे झाडावर भिरकावून दिलेली सापडली.
व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता अमेरिका, तेथील कामगार वर्गातील लोक बिनधास्त पैसे देऊन बाईच्या मागे लागलेली सुद्धा मी पाहिलेली आहेत. अगदी सतरा-अठरा वर्षाचा कोवळा मुलगा साठीच्या बाईच्या गळ्यात हात घालून रस्त्याने चाळे, लगट करून जातांना देखील मी बघितलेलं आहे. अर्थातच ती बाई वेश्याचं होती ह्यात शंका नाही. हा शहरी भागापेक्षा दूर असलेल्या ठिकाणी माझ्या बघण्यात आलेला किस्सा सांगितला..
ह्याच प्रमाणे सभ्य, आणि सरळ अमेरिकन लोकांची देखील तिथे नक्कीच कमी नाही. चारित्र्यवान स्त्री-पुरुष देखील तिथे सर्रास दिसतात, किंबहुना जास्तीच दिसतात.
कुठल्याही बागीच्यानमध्ये, व सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक कपड्यात मी अमेरिकन बाईला बघितलेले नाही. कुठलाही अमेरिकन पुरुषदेखील रस्त्याने येणार्याजाणार्या बायकांची छेड काढतांना मला आढळला नाही. अगदी साधी कुठलाही मेकप, भपका नसलेलीच तेथील स्त्री दिसते, परंतु नीट-नेटकी.
प्रत्येक टीनेजरच्या बगलेत स्वतःची मैत्रीण, विवाहीताच्या हातात छोटं मुल व बरोबर बायको व जे एकटे असतील ते स्वतःच्या कामात मश्गुल!
हीच आहे अमेरिका..
देश कुठलाही असो....चांगले आणि वाईट ह्या नाण्याच्या दोन बाजू असतात. गुन्हा प्रत्येक ठिकाणीच आहे. स्त्री ही अमेरिकेतली असो व अन्य जगातली, स्वतंत्र आहे पण सुरक्षित आहेच असे नाही!!
-  
 --  मधु निमकर. (दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, १५ मार्च २०१५)


शुक्रवार, १३ मार्च, २०१५

“आय विल बी रीस्पोन्सिबल”



अमेरिकन पालकांचे राहून राहून एक मला पडलेलं कोडं म्हणजे त्यांच्या मुलांना मारायला बंदी असून देखील त्यांची मुलं आपल्या मुलांसारखी गोंधळ घालत आहेत, ओक्साबोक्शी रडत बसलेली आहेत, हट्ट करत आहेत, पालकांची डोकेदुखी बनलेली आहेत (फक्त लहान मुलांविषयी इथे बोलत आहे) असे सामाजिक ठिकाणी मला सहसा आढळून आलेलं नाही. कितीही गर्मी असो, हे आणि ह्यांची मुले आपली कुलचं वाटतात! स्ट्रोलर (बाबा गाडी) मध्ये बसून, कधी आई-वडिलांच्या कडेवर बसून स्वारी मजेत हातातला खाऊ खातांना दिसते. सहसा ते मुलांना कधी भरवतांना देखील आढळणार नाहीत! एवढेच काय, आपली मुलं सुद्धा तिथे रडतांना, किवा भरवतांना भारतीय पालकांना मी विशेष पाहिलेलं आठवत  नाही. हा तिथल्या वातावरणाचा असर म्हणावा आणखीन काय?
मुलं लवकरात लवकर स्वावलंबी व्हावीत हेच त्या मागचे मुख्य कारण असावे. त्यामुळे पालक देखील मुलांचं करून चिडचिडे होत नाहीत व मुलांच्या देखील सुरुवातीपासून त्यांच्याकडून अतिरिक्त अपेक्षा वाढत नाहीत.

अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांना देखील तुमच्या मुलाने गृहपाठ केला नाही म्हणून तिथे जवाबदार ठरवलं जात नाही!

माझा मुलगा कधीतरी असाच गृहपाठ न करता तिथल्या शाळेत जायचा. त्याच्या डायरीमध्ये सुद्धा अभ्यास लिहिलेला नसायचा, त्यामुळे मला समजायचं नाही. मुलगा अभ्यासात ठीक-ठाक म्हणावा इतका नक्कीच होता. कधीही त्याची तक्रार घरी कुठल्या बाबतीत आलेली नव्हती. अभ्यासू मुलांपैकी एक म्हणून वर्गात त्याचं नाव होतं.

“शाळेतील गृहपाठ लिहून घ्यायची काही गरज नाही, आपल्या सर्व लक्षात असते”....अश्या मताचा तो! विचारलं तर सर्व माहित असायचं, पण गृहपाठ लिहून घ्यायची त्याची तयारी नव्हती.
एकूण दोन ते तीन वेळा असाच विसरून गृहपाठ न करता तो शाळेत गेला. ‘मुलांना मारायचं नाही, ओरडायचं नाही, प्रेमाने वागायचं, हवं ते मोकळं वातावरण द्यायचं, त्यांच्यावर कुठला ताण पडता कामा नये, परंतु शिस्त सुद्धा लागली पाहिजे.......?’- आता हे कसब फक्त अमेरिकन्सच आपल्याला देऊ शकतात. वर पालकांना सुद्धा तक्रार सांगायची नाही, तर मुलं सुधारणार कशी?? अगदी गांधीवाद अंगी आणून अहिंसेच्या मार्गाने मुलांना शिस्त लावण्यात अमेरिकन शिक्षक पारंगत असतात. हाच नियम सामाजिक बाबतीतही आपल्याला तेथे आढळतो, आणि हीच अमेरिकेची खरी ब्युटी म्हटली पाहिजे!!

माझ्या मुलाला शिक्षिकेने बसवून त्यावेळी “आय विल बी रीस्पोन्सिबल” (मी जवाबदार बनेन) हे वाक्य प्रत्येक वेळी इतके घोटवून घेतले, त्याच्याकडून वहीमध्ये लिहून घेतले की माझा मुलगा काही समजो अगर नाही, परंतु तो ह्या लिहायच्या शिक्षेला कंटाळून गेला. म्हणतात ना, ‘सोनाराने कान टोचणे’ ते ह्यालाच!!
असो!! भारतात असतांना माझ्या एका मैत्रिणीने निनादच्या वयाच्या स्वतःच्या मुलाला  पहिलीत  हुशार, अभ्यासू असून देखील जवळ म्हणून बाजूच्या घरी ट्युशनला घातले.  
मुलासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून तिने स्वतःचे बिझनेस मधील लक्ष काढून मुलावर केंद्रित केलेले. मुलगा अभ्यासात हुशार होता. तिच्या बरोबर गोष्टीची पुस्तकं देखील वाचायचा, वर्गात चांगले मार्क घेऊन यायचा.
मला देखील तिने निनादला त्या ट्युशनला पाठवायला सुचवले. घरी चार ओळी लिहायला सोंग करणारा ६-७ पाने तिथे मात्र तासाभरात लिहून काढायचा! त्यामुळे मी समाधानी होते.
एक दिवस त्या माझ्या मैत्रिणीला जाग आली. गृहपाठ करतांना मुलाने तिला विचारले, “आई ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून मी धड्यातली कुठली ओळ लिहू? वरची ओळ, का खालची ओळ?”......झाले.....तिचा पारा असा काही चढला!!! आपल्या मुलाने धडे वाचायचे सोडून दिले आहे, तो सर्व प्रश्नाची उत्तरे ट्युशन टीचर सांगेल ती बघून फक्त नक्कल (कॉपी) करायचा हे तिच्या चांगले लक्षात आले. तेव्हा पासून तिने स्वतःचा मुलगा तिथे पाठवायचा बंद केले व मला देखील पाठवू नको म्हणून सांगितले.
तेव्हा पासून मी देखील ‘मुलाला स्वतःचा अभ्यास स्वतः करू दे’ हे मनाला पटवले. जोपर्यंत मुलं स्वतः धडे मन लाऊन वाचत नाहीत, अभ्यास समजून घेत नाहीत, तो पर्यंत त्यांच्याकडून तुम्ही गुणवत्ता अपेक्षित धरू शकत नाहीत.
मुलाचे घाणेरडे अक्षर शिक्षिका रागवेल म्हणून आपण सुधारावे, त्याची चित्रे काढून द्यावीत, प्रोजेक्ट्स करून द्यावेत ह्या गोष्टी बर्याच मी केल्या. परंतु बाकी पालक म्हणायचे त्यांच्या वयाला जे येतं ते स्वीकारायला पाहिजे. मी मदत करून देखील मुलाला त्याचा फायदा कधी देखील झाला नाही. त्यापेक्षा त्याला स्वतःच्या पद्धतीने स्वतःचा शालेय शिक्षणाचा भार पेलू देणे योग्य होते!
मी तर सांगेन आत्ताच्या काळात दिले जाणारे अनाठायी, कठीण वाटणारे प्रोजेक्ट्स पालकांच्या मदतीमुळेच बोकाळलेले आहेत. एकदा शाळांना मुलांची कुवत समजली तर अनाठायी आणि कुवती बाहेरचे विषय देखील देण्याचे धाडस शाळा करायचे सोडून देईल....असो!!


अमेरिकन शिक्षिकेने मुलाला दिलेल्या शिक्षेचा मी सुद्धा स्वीकार केला. “मुलाचा अभ्यास त्याची वैयक्तिक जवाबदारी,” असे म्हणून मी त्याच्या अंगावर अभ्यासाचा भार टाकून मोकळी झाले!! मुलाने स्वतःच्या गृहपाठ, व अन्य गोष्टींची जवाबदारी स्वीकारली! जमले नाही तिथे मदत मागितली, मी दिली! त्यामुळे शाळेत त्याची एकाग्रता वाढली. शालेय शिक्षण ही पहिली जवाबदारी मुलाची येते हे मी अमेरिकेत शिकले!!
-  
 -- -- मधु निमकर. (दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, ३ मार्च २०१५)









रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

अमेरिकेतील 'तो' अविस्मरणीय प्रसंग!

हळू हळू इंडीकेश्न्स देत माझ्या फोनने एक दिवस पूर्ण राजीनाम्याचा अर्जच समोर ठेवला....आत्तापर्यंत आलेले वारंवार ‘हेंग’ होऊन बंद पडण्याच्या धमक्यांचे संकेत दुर्लक्षित केल्याच्या परिणामांना सामोरी जायची ही आलेली निर्वाणीची वेळ. संकेतांचा अन्वयार्थ न लागल्याने आपल्या मागण्यांवर अंमल बजावण्यासाठी बहुआयामी बंद पुकारून अखेर मला साष्टांग नमन करायला लावणाऱ्या माझ्या फोनने  मागण्यांची दिसायला किरकोळ परंतु वजनदार, भारीभक्कम यादी माझ्याकडे इंजिनियर्स कडून टोलावली. वर वार्षिक सुट्टीचा फायदा सुद्धा निमुटपणे मान्य करण्याव्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय राहिला नाही. त्यात देखील सतरा ठिकाणी धक्के खाऊन वाट चुकलेल्या जनावरागत एकदाची फोन दुरुस्तीच्या दुकानात warranty च्या कागदासकट पोहोचलेली मी!... त्यांनी दिलेला पत्ता चुकीचा, माणसे चुकीची, इतपत ठीक परंतु दोन दोन दिवस फेर्या मारून वर एक-दोन आठवडे फोन ताब्यात नसणे म्हणजे फारच झाले....

घरी परत आल्यावर जीवाची घालमेल झाली!....फोने नाही तर लाइफ ठप्प!!.....केलिफोर्निया व टेक्सास च्या आठवणींना पुन्हा नव्याने उमाळा आला..... चांगला दोन वेळा ह्यांचा व तीन वेळा माझा फोन अमेरिकेत मामुली कारणाने बिघडला असे घोषित झाले होते....फोनला चांगली दोन वर्षांची warranty होती, त्यामुळे कंपनीने तात्काळ माझा जुना फोन ताब्यात घेऊन काही मिनिटात नवाकोरा फोन बदलून आमच्या हातावर ठेवलेला. दोन्ही फोन ‘apple’ कंपनीचे असल्याने त्याच्या  दर्जात तृटी काढण्याची बिशाद कुणाची नव्हती. आत्ता तर विश्वास अजूनच दृढ झालेला!!

तंत्रन्यानाचा प्रचंड वेग, बाजारपेठेतील वेगाने होणारी उलथापालथ, व्यावसायिकपणा ह्यात अमेरिका किती पुढारलेली आहे ते एका फोन वरून देखील दिसून येते. तोच फोन बर्याच महिन्यांनी मुंबईत लौंच केला गेला. त्या वेळी आम्ही भारतात परत देखील आलो होतो.

तंत्रन्यानाबरोबरच अमेरिकन लोकांचे प्राणीजीवनावरचे अचाट प्रेम देखील जगप्रसिध्द आहे. त्याचा एक छोटा किस्सा....

दुपारच्या वेळी कधी ग्रोसरी मार्केट, कधी मॉलमध्ये शॉपिंगला, तर कधी मैत्रिणीच्या घरी गप्पा मारायला, पार्टीला, असा माझा दिनक्रम झालेला. लाडक्या मैत्रिणीने फोन करून,“तुझ्याकरीता strawberry milkshake बनवलंय घरी येच...!”, अशी गळ घातल्यावर न जाणे अवघड होते, आणि घर देखील जवळच दीड-दोन मैलावर होते. तिच्याकडे जायला मला कधीच कंटाळा यायचा नाही. त्यांची गाडी तिचा नवरा कामावर घेऊन जायचा, त्यामुळे तिला बाहेर जायचं असेल तेव्हा ती आमच्या एखादी बरोबर किवा नवर्याला गाडी घरी तिच्यासाठी ठेवायला सांगून बाहेर पडत असे. आमच्यात सर्वात उत्साही आणि सर्वात लहान म्हणून ती लाडकी होती, त्यात आम्ही दोघीही भटक्या!!!

तुरळक पावसाला चुकवत गाडीने तिच्या घरी मी पोहोचले....गप्पा रंगल्या...बाहेर हवा थंड होती, परंतु घरात हीटर चालू असल्याने सर्व काही ठीक वातावरण होते. २४ वर्षांची सर्वात मॉडर्न नॉर्थ इंडियन मैत्रीण, आणि तिला ‘के.जी.’ मध्ये शिकणारी मुलगी.... त्या छोट्या बाहुलीला घेऊन आम्ही खूप मजा करायचो. कधी तिच्या शाळेत पार्टी असायची, तेव्हा वर्गा बाहेर उभ्या राहून ती आणि वर्गातील लहान मुले काय ‘activity’ करतात ते बघायला खूप मजा यायची! शाळा सुटल्यावर टीचर मुलांचे किस्से भरभरून सांगायची!!!!.... आम्हाला बघून तिची मुलगी देखील धाव्वत येऊन गळ्यात मिठी मारायची दोघींच्या, तोच मोह मी तिथे भेट देण्यास कदाचित कारणीभूत होता ... माझ्या कॅलिफोर्नितील मैत्रिणीच्या मुलाला एका खाजगी शाळेत टाकलेलं, तो ‘प्री के. जी.’ मध्ये होता. त्त्याच्या बरोबर लंच घेणे, गाणी म्हणणे वगैरे पूर्ण वेळ आम्हाला जायला परवानगी होती!!

असो...”मम्मा, मम्मा” करणाऱ्या आमच्या बच्चाला घेऊन यायला अजून वीस मिनिटे बाकी होती. गप्पा अगदी रंगलेल्या, शाळेची वेळ व्हायचाच अवकाश होता निघायला!.... दारावर अचानक काही तरी ओरबाडल्याची जाणीव झाली..... काही मिनिटात त्या ओरबाडण्याचा आवाज तिव्र होऊन दारावर धडक मारल्याची जाणीव व्हायला लागली. दरवाजाच्या फटीतून मैत्रिणीने बघण्याचा प्रयत्न केला तर बाहेर कुणी तरी जनावर असल्याचे तिला दिसले. त्याचा कर्णकर्कश्य आवाज कानठळ्या बसवणारा आणि हिंस्त्रक होता. जनावराला वेड लागलेले असावे असेच वाटत होते अगदी ...

मुलीची शाळा सुटायला आता फक्त पंधरा मिनिटे शिल्लक होती. आजूबाजूला राहणाऱ्या मैत्रिणी आज उपलब्ध नव्हत्या व आमच्या पतीदेवानपैकी कुणीही एवढ्या कमी अवधीत ऑफिसमधून मदतीला येणे शक्य नव्हते. वेळ संपल्यावर एक मिनिटही अधिक कुणी अमेरिकेत काम करत नाहीत. वेळेत गेलो नाही तर शाळेला कुलूप लावले जाईल ह्या भीतीमध्ये भर म्हणून त्या जनावराच्या ओरबाडन्याने आणि किंचाळण्याने काहीही सुचत नव्हते. ब्लॉकच्या galleryमध्ये जाऊन मैत्रिणीने काहीतरी बाहेर भिरकावण्याचा दोन वेळा केलेला प्रयत्न साफ आपटला. एक तर नेम चुकला आणि दुसरे म्हणजे ते जनावर खालून gallery मध्येच चढून येण्याचा प्रयत्न करू लागले. घाबरून तिने gallery चे दार बंद केलं. म्हणून मला सुद्धा काही करणे शक्य झाले नाही.

ते पिसाळलेले जनावर ‘यमदुतासारखे आमचे काम आज तमाम करणारच’ ह्या इराद्याने आमचा पिच्छा सोडत नव्हते. त्याचा आक्रस्थाळेपणा शिगेला पोहोचलेला. तो सर्व आवाज अक्षरशः आमच्या कानात घुमू लागला व आमची बेचैनी वाढली.

वेळ कमी होत चाललेली....त्यात पिसाटलेले जनावर अगदी ऐकत नव्हते. त्या प्रकाराने सहनशक्तीच्या मर्यादा ओलांडल्या... आता मात्र मैत्रिणीची पुरती गाळण उडाली, घाम फुटला तिला, थरथरून तोंडातून शब्द बाहेर पडेना तिच्या, धीर एकवटून आम्ही पुन्हा दारातून ते  गेले का बघायला जायचो तर पुन्हा ते रानटी जनावर आमच्यावर प्राणघातक झेप घ्यायला झपाट्याने पुढे सरसावायचे, जोरात दरवाजावर धक्के मारायचे....थरकापाने शेवटी मैत्रीण ओक्साबोक्शी रडायला लागली....मी देखील चिंतेत पडले. माझा मुलगा यायला बराच उशीर होता म्हणून मला वेळेची चिंता नव्हती.

मुलीची शाळा सुटायला आता फक्त पाच मिनिटे शिल्लक होती....शेवटी मी ९११ ह्या अमेरिकेच्या   तत्काळ आपत्कालीन हेल्पलाईनची मदत घ्यायचं ठरवलं. फोनवर सर्व सविस्तर ऐकून घेतल्यावर, “असल्या कामांना आम्हाला नाही ‘एनिमल रेस्क्यू’ टीमला बोलवा..” म्हणून सांगून फोन कट झाला. त्यांची समजूत काढण्यावाचून आमच्याकडे तत्काळ कुठलाही पर्याय नव्हता....पुन्हा एकदा प्रयत्न करू ह्या विचाराने मी त्यांना अखेरचा फोन लावला व आमची समस्या ऐकवली...

अखेर कुठल्यातरी पुण्यायीने तो पोलीस अधिकारी अचानक आला आणि त्याने त्या जनावराला दरवाजातून क्षणात घालवले...उंच तगडा उतारवयीन गोरा अमेरिकन पोलीस घराचा दरवाजा ठोकून आत आला, व आम्हाला त्याने अधिकारवाणीत सांगितले....”एवढ्या शुल्लक कारणासाठी पोलिसांना कशाला बोलावलत तुम्ही? ते बघा एक लहान मांजरीचं पिल्लु आहे ते! एक ग्लास थंड पाणी ओतलं असतं अंगावर तरीही पळून गेलं असतं. बाहेर थंडी आहे म्हणून घरात ऊब घ्यायला यायचा प्रयत्न करत होतं.....!!” आम्ही त्याला काही समजावण्याच्या मनस्थितीत नव्हतो....शाळेची वेळ होऊन गेलेली!

एक भिजलेली  लहान मांजर दोन दिवस तिच्या दरवाजात बसत होतं, व शरणागती म्हणून घराच्या आश्रयाला येऊ पहात होतं. परंतु दारावरील लावलेल्या पत्र्याच्या आवरणामुळे त्याचा आवाज वाघाने नखाने दरवाजावर ओरबाडावे इतका मोठा येत होता.

अमेरिकेत अशी काही जंगली मांजरे आढळतात, परंतु भटके कुत्रा किंवा गायी गुरे अन्य कोणीही मला कधी तिथे आढळले नाही.

सिग्नल चुकवत-पाळत जमेल तसे करून आम्ही शाळेत जाऊन पोहोचलो एकदाचे....सुदैवाने शाळा अर्ध्या मैलावरच होती व मोक्याचे ठिकाण नसल्याने आडगल्लीत सिग्नलला केमेरा बसवलेला नव्हता.

मैत्रिणीने तशीच  धावत जाऊन रडत-रडत  मुलीला मिठी मारली व तिचे मुके घेतले....मुलीने आमच्या कडे खळखळते हास्य करून “मम्मा, आज हम ने ये किया....” सांगायला सुरुवात केली!!!!







-मधु निमकर
(दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात १४/०९/२०१४)

 

 

 

 

 

सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

"मेरी कोम "....फिल्म.

गरीब कुटुंबातली 'मेरी कोम' लहान वयात आपल्याला बॉक्सिंग मधेच आवड आहे आणि त्यात करियर करायची इच्छा आहे असे घरच्यांना सांगून टाकते. नाक मोडणारे, चेहेरा खराब करणारे बॉक्सिंग करियर म्हणून निवडू नये म्हणून तिचे वडील त्याला विरोध करतात. त्यांच्या विरोधाला न जुमानता ती बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेऊन स्टेट, नेशनल, तसेच इंटरनेशनल लेवल वर आपले स्थान प्रस्थापित करते. वेळ प्रसंगी घरातील कर्जापायी विकलेली गाय मेल बॉक्सरला चेलेंज करून पैशानसाठी मार खाऊन सोडवते.

"मुझे ब्रोन्झ पसंद नहीं आता..." सांगणाऱ्या तिच्या कोचचा,'तू मला केवळ पहिली आलेली पाहिजेस,' असा विश्वास त्यातून दिसतो. करीयरच्या एका उंचीवर आपल्या कोचच्या विरोधाला न जुमानता अचानक आपल्या मित्राच्या प्रेमात पडून ती लग्न करते व करियर सोडून स्वतःला संसारासाठी वाहून देते.
इतपर्यंतचा चित्रपट केवळ टिपिकल भारतीय धर्तीचा "कहानी घर घर की..." असे सांगत संपतो.

अचानकपणे लागलेली मातृत्वाची चाहूल तिच्या सर्व भविष्यातील योजनांवर विरजण टाकते. स्वतःची सर्व मेडल्स व प्रशस्तीपत्रके ती शोकेस मधून उचलून पेटीत बंद करते. त्या बरोबरच तिच्या मनातील बॉक्सिंग करियरवर सुद्धा ती एक प्रकारचे 'कफन' घालते. आपल्या मुलांसाठी जागा करायला पाहिजे म्हणून मी हे समान इथून दूर करते आहे हे सांगतांना तिच्या मनातले दुखः तिच्या डोळ्यातून तिच्या पतीना दिसते.

आपल्या दोन जुळ्या मुलांना घेऊन एक दिवस प्रवास करतांना एका मुलीचे पालक तिला सांगतात," तुम्ही मेरी कोम ची मैत्री आहात काय? आमच्या मुलीगी तिची मोठी फेन आहे. तिला मेरी कोम प्रमाणे बॉक्सर व्हायची इच्छा आहे. तुमची भेट होईल तेव्हा तिची स्वाक्षरी माझ्या मुलीला मिळवून द्याल काय?"....
मेरी कोम लोकांसाठी भूतकाळ आहे...... आपली गृहिणी आणि दोन मुलांची आई एवढीच आता ओळख आहे..... आपण कधी पुन्हा बॉक्सिंग करू शकणार नाही.... आपली फिटनेस राहिली नाही... ह्या विचाराने ती आधीच अस्वस्थ झालेली असते.

शेवटी दोघानपैकी एकाने तरी मुले व घर ह्यांकडे राहायला पाहिजे या जाणीवेने तिचे पती तिला घरच्या जबाबदारीतून मुक्त करून तिची व संपूर्ण घराची जवाबदारी एकट्याने स्वतःच्या अंगावर घेतात व तिला पूर्ण पाठींबा व योग्य परिस्थिती निर्माण करून देऊन पुन्हा उभे करतात.

आपल्या कोच गुरूनं शिवाय आपण बॉक्सिंगमध्ये विजयी होऊ शकत नाही हे 'मेरी' च्या लवकरच लक्षात येते.

लग्न, मुले, घरची जवाबदारी, अपयश ह्या सर्वांमुळे आत्मविश्वास गमावलेल्या मेरी मध्ये तिचे गुरु पुन्हा आत्मविश्वास आणतात. "मा बनने से औरत कि ताकत दुगनी होती है... " हे गुरूंचे शब्द ऐकुन तिच्यात धीर येतो. डबल ताकदीने 'मेरी कोम' आपल्या आयुष्याचा खरा लढा द्यायला बॉक्सिंगच्या रिंगणात पुन्हा एकदा उभी राहते.

ऐन कॉम्पिटीशन च्या वेळी तिच्या तान्ह्या मुलाच्या हृदयाला भोक आहे व त्याचे ओपेरेशन होत आहे हे ऐकून पुन्हा तिच्यातली भावूक स्त्री जागी होते. तिच्यातील नवचैतन्य संपून जाते, आणि ती कोलमडून पडते. आता नवीन कोच पुन्हा तिच्यात धीर आणतात, आणि शेवटच्या फेरीत ती स्पर्धा जिंकते. तिच्या बाळाचे हृदय ऑपरेशन मध्ये बंद पडलेले पुन्हा सुरु होते व ते वाचते.


.......आणि 'बोर्न टू वीन' खरे करून दाखवत 'मेरी कोम' चा पुनर्जन्म होतो!!!
- मधु निमकर.

शनिवार, ६ सप्टेंबर, २०१४

"नयनरम्य नायगारा "


 

 Pic by madhu nimkar
‘न्यूयॉर्क’ आणि ‘नायगारा फॉल्स’ ही ठिकाणे सुद्धा लवकरच बघून झाली.  मन ह्युस्टन मध्ये रमल्याने अजून एक वर्ष अमेरिकेत राहायला हरकत नाही अशी खात्री पटली.

“इतने साल अमेरिका में रेहके भी ‘न्यूयॉर्क’ नहीं देखा, तो क्या किया?” हा सवाल एकदाचा संपवून टाकायचा निर्णय घेऊन एकदाचा दौरा ठरवला आम्ही...

अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर, ग्लोबल पावर सिटी, तसेच अर्थशास्त्र, वित्तशास्त्र, प्रसारमाध्यमे, कला, fashion, संशोधन, तंत्रज्ञान, शिक्षण , आणि  मनोरंजन. युनायटेड नेशन्सची प्रमुख हेड क्वार्टर, तसेच इंटरनेशनल डिप्लोमसी चे प्रमुख केंद्र आणि जागतिक सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्राची राजधानी.  एकूण काय ‘न्यूयॉर्क’ विषयी किती हि लिहिला तर कमीच आहे...

आम्ही मात्र एक प्रेक्षणीय स्थळ म्हणूनच ते बघायला गेलेलो...

‘न्यूयॉर्क’ मध्ये जुने-नवीन पुरेपूर वास्तुशास्त्राचे नमुने दिसतात. अगदी ब्रुकलीन मधील १६५६ साली उभारलेलं “saltbox style Pieter Claesen Wyckoff House” असो नाही तर “One World Trade Center” ही गगनचुंबी इमारत असो...

एकूण पाहण्यायोग्य महत्वाची आणि प्रेक्षणीय स्थळे म्हणजे Midtown Manhattan, Times Square, the Unisphere, Brooklyn Bridge, Lower Manhattan with One World Trade Center, Central Park, United Nations Headquarters, आणि Statue of Liberty.

शहरात बर्याच जुन्या आणि कलात्मक बांधकामांनी नटलेल्या मोठ्या मोठ्या इमारती दिसतात. काही भागांत चकचकीत भपकेदार इमारती एखाद्या काचेच्या कारखान्याला शहरीकरणाची जवाबदारी दिल्याप्रमाणे बांधलेल्या आढळतात. एकूण शहराचा दिमाख काही औरच. फिरायला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सवड काढून जायला पाहिजे.

पायी सुद्धा फिरत असाल तर एक एक ऐतिहासिक इमारत कुठून न कुठून डोकावतच असते. सप्टेंबर २०११ च्या हल्यात जमीनदोस्त झालेल्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ चा सुद्धा झीरो ग्राउंड सर्व towers मध्ये एक आगळे वेगळे काहीसे त्या गजबजाटात खोल पोकळीप्रमाणे आभास देतो. खास वेळ काढून बघण्यासारखी महत्वाची ठिकाणे म्हणजे अर्थातच “टाईम स्क्वेर” आणि ”स्टेच्यू ऑफ लिबर्टी”. जबरदस्त सुरक्षा व्यवस्थेत असलेली ही दोन्ही ठिकाणे. 

स्वातंत्र्य देवतेचा पुतळा हिरव्या रंगात समुद्राच्या मध्यभागी बेटावर उभा आहे. त्या देवतेने पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल तेथील प्रत्येक लहान मोठ्यानच्या हृदयात स्वातंत्र्य जागते ठेवून आहे. आजही तिथे जन्माला  आलेली भारतीय असोत वा अमेरिकन...”इट इज माय लाईफ..” “माझ्या आयुष्याचे मी निर्णय घेईन...” असेच प्रत्येक जण खडसावून सांगत असतो.      
                                                      (pic by madhu nimkar)

“Times Square” च्या मध्यावरच आमचं हॉटेल होतं. हॉटेलच्या फिरत्या दरवाजातून समान संभाळत नेहमीचाच अमेरिकन पेहराव, आणि सोबत डोक्यावर टोपी आणि डोळ्यांना गोगल लावून शहर फिरायला सज्ज होतो आम्ही.  न्यूयॉर्क शहरांतला एक मध्यवर्ती मोठ्ठा चौक ज्यात पूर्ण इमारतीच्या इमारती दूरचित्रवाणींचा आभास देत होत्या. इमारतीच्या पहिल्या मजल्या पासून वर पर्यंत निरनिराळ्या चल जाहिरातींची भाऊगर्दी सर्वत्र नजरेस येत होती. कडत पोलीसी बंदोबस्तात त्या चौकटीचा कारभार डोळ्यात तेल घालून सांभाळला जात होता. ते पाहून कुठेतरी नाक्यावर जीप घेऊन पाळत ठेवणारे भारतीय हवालदाराचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले....बरीच छोटी-मोठी हॉटेल्स आणि भेटवस्तू विकणारी छोटी-छोटी दुकाने दिसत होती. काहीतरी आठवण घ्यावी म्हणून वीतभर लांबीची छोटी गिटार मुलासाठी आणि काही छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या. अकरा डॉलर खर्च करून घेतलेली गिटार पुढे मुंबईतील दुकानांमध्ये उपलब्ध आहेत हे बघून दुकानदाराला त्याची किंमत विचारायची पण मला भीती वाटलेली. परंतु त्यावेळी ती घेतांना मात्र मनाला काहीतरी आठवण घेऊन जात आहोत ह्यापेक्षा मोठे समाधान काहीही नव्हते.


“नायगारा फॉल्स” ला बघणे म्हणजे निसर्गाचा अवाढव्य आवाका एका छोट्याश्या(?) तुकड्यात बसवून  बनवलेलं एक प्रेक्षणीय स्थळ. इथे छोट्याश्या लिहिल्याने माझ्यावर नक्कीच मोठ्या-मोठ्या मुक्त टीका केल्या जातील... परंतु एक अतिविशाल पाण्याचा धबधबा न्यूयॉर्क,अमेरिका आणि ओन्तारिओ, कॅनडाच्या सीमेच्या मध्यावर आहे आणि आपण त्याला तंत्रन्यानाच्या आधारे जवळ जाऊन बघू शकतो, रंगीत दिवे लाऊन सुशोभित करु शकतो व कॅमेरात कैद पण करू शकतो.....ह्या करिता त्याला छोटा म्हणायचे धाडस केलं मी खरे तर!



दृष्टी जाईल त्यापलीकडे दूरवर पसरलेला अवाढव्य, विशालकाय, महाकाय, मनमोहक, अतिसुंदर, जणू स्वर्गातून थेट जमिनीवर त्याचे पाय लागले असतील इतका शक्तिशाली आणि तितकाच सुंदर धबधबा तो फक्त “नायगारा”च असू शकतो.
 
Pic by madhu nimkar

हा धबधबा तीन भागात विभागलेला आहे. ‘हॉर्स शू फॉल्स’ (२६०० फूट किंवा ७९२ मीटर) हा कॅनडाकडील बाजूचा, व अमेरिकन फॉल्स (१०६० फूट किंवा ३२३ मीटर) व ब्रायडल वेल फॉल्स हा अमेरिकेच्या बाजूकडील. त्याला पाणी नायगारा नदीतून मिळते.

मेड ऑफ द मिस्ट” आणि “केव्ह ऑफ द विंड” अश्या दोन सहलींच्या प्रकारे नायगाराला जवळून बघता येते. एवढ्या प्रचंड ताकदीच्या अवाढव्य धबधब्याला बघून तोंडात बोटे घातली तर नवल नाही. सेव्हन वंडर ऑफ द वर्ल्ड मध्ये त्याचा समावेश नाही, ह्याचे राहून राहून आश्चर्य मात्र वाटते...

त्याचे ते रूप कधीतरी जवळ जाऊन बघतांना मनात भीती पण आणते....मग डोळे घट्ट मिटून आपण त्याचे अंगावर उडणारे तुषार अनुभवतो व सर्व भीतीचा आपल्याला विसर पडतो.

नायगार्याच्या जवळ जायला तिथे रेनकोट व स्लीपर्स दिल्या जातात...लांबच लांब रांगेत उभे राहून आपली नायगारा जवळून बघायची उत्सुकता केवळ वाढीस लागते.

नायगारा साठी एक पूर्ण दिवस राखीव पाहिजे...

अमेरिकेची राजधानी कशी काय दिसते ह्याचं कुतूहल मनाला लागलं. ओबामा चं घर किती मोठं आणि राजेशाही आहे? ‘व्हाईट हाऊस’ आणि ‘वाशिंगटन डी सी’.....बस शेवटची दोन ठिकाणे बघितली की अमेरिका दर्शन पूर्ण झालं आमचं असं आम्ही ठरवलं होतं.

ओबामाच्या घरासमोर उभे राहून सर्वन प्रमाणेच फोटो घेतले, त्याचा बगीचा चौफेर फेरफटका मारून बघितला. फर्स्ट लेडी आपल्या मुलांना ह्या बागेत खेळायला आणते का? ओबामाचे ओझरते का होईना दर्शन व्हावे...अश्या बर्याच समजायच्या आणि अनुभवायच्या गोष्टी पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ‘व्हाईट हाऊस’च्या समोरील काही रस्ते बंद ठेवण्यात आले होते.

समोर कडक पोलीस बंदोबस्त आणि ‘व्हाईट हाऊस’च्या समोर धरणे देऊन घोषणा देणारे एक-दोन एक-दोन माणसांचे दोन संघ, हातात काही लिहिलेले कागद. समोर पोलीस उभे परंतु कुणीही त्यांना थांबवायला पुढे सरसावत नाही.

ह्यालाच बहुधा म्हणतात स्वातंत्र्य देवतेचे गाव...

--मधु निमकर